आष्टी विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024, Aashti Beed Assembly Election


मराठा आंदोलन म्हटलं की आता आठवतात ते म्हणजे मनोज जरांगे. मध्यंतरी जे मराठा आरक्षण झालं त्याने सर्वांचाच लक्ष वेधून घेतलं होतं. तर या मराठा आंदोलनाची मनोज जरांगे यांनी जेथून सुरुवात केली तो विधानसभा मतदारसंघ म्हणजे आष्टी. जसे मराठा आंदोलन येथे पेटत आहे तसे आष्टी मधील राजकारणही बदलताना दिसत आहे. चला तर पाहूया आष्टी मधील येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नक्की वारे कसे वाहत आहे?  आमदारकी पासून तब्बल 57 वर्षे दूर राहिलेल्या आजबे घराण्यात 2019 मध्ये पुन्हा एकदा नव्याने आमदारकी मिळाली. आता 2024 मध्ये ही आमदारकी आजबे यांना टिकवण्यात यश येणार का? की मनोज जरांगे आजबे यांच्या विरोधात नवीन चेहरा उभा करणार?
आष्टी येथे पुन्हा एकदा मनोज जारांगे फॅक्टर चालणार का? चला तर पाहुयात या सर्व गोष्टींचा आष्टी विधानसभा बद्दल असलेला लेखाजोखा. आष्टी विधानसभा मतदारसंघ क्रमांक २३१ आहे.  आष्टी मतदारसंघात बीड जिल्ह्यातील आष्टी आणि पाटोदा ही तालुके आणि शिरुर तालुक्यातील शिरुर महसूल मंडळांचा समावेश होतो.  आष्टी हा विधानसभा मतदारसंघ बीड लोकसभा मतदारसंघात मोडतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब भाऊसाहेब आजबे हे आष्टी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. १९६२ साली आष्टी तालुक्यातील शिराळ सारख्या ग्रामीण भागातील शेतकरी घराण्यातील भाऊसाहेब आजबे हे काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आले होते.  तेव्हापासून आजपर्यंत आजबे घराणे राजकारणात असताना देखील आमदारकीपासून लांब राहायला लागले होते.  2019 च्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब आजबे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भाजपचे भीमराव धोंडे यांचा पराभव केला.  आणि तब्बल 57 वर्षानी आजबे या कुटुंबीयांनी आष्टीमध्ये आमदारकीचा गुलाल उधळला.
परंतु नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे बाप्पा सोनवणे यांनी गुलाल उधळला. तसे पाहिले तर बीड जिल्हा म्हटलं की मुंडे घराणे असं समीकरण परंतु नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र मराठा फॅक्टर याचा परिणाम मुंडे यांच्या मतदानावर झालेला दिसला.  त्यामुळे आता हाच परिणाम पुन्हा एकदा आष्टी या विधानसभा मतदारसंघांमध्ये दिसणार का असा प्रश्न सर्वांनाच पडू लागला आहे. आजबे या घराण्यात तब्बल 57 वर्षांनी आमदारकी मिळाली खरी परंतु राष्ट्रवादी काँग्रेस फुटी नंतर बाळासाहेब आजबे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना साथ दिली. त्यामुळे ते आता महायुतीमध्ये आहेत. आष्टी हा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जायचा. 2009 मध्ये सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत भाजपकडून निवडणूक लढवत असलेले बाळासाहेब आजबे यांचा पराभव केला होता. सुरेश धस हे आष्टी तालुक्यातील एक मोठे नाव आहे. सुरेश धस हे कायम सत्तेत होते.
 परंतु 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये बीड येथून त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली यामध्ये त्यांचा दीड लाख मतांनी पराभव झाला. त्यानंतर सुरेश धस यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये तिकीट मिळवले. परंतु 2014 मध्ये मोदी लाट होती तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये सुरेश धस यांचे नाव थोडेसे खराब झाले होते त्यामुळे 2014 मध्ये सुरेश धस यांच्याविरुद्ध उभे असलेले भाजपचे उमेदवार भीमराव धोंडे हे आमदार झाले. त्यानंतर बीड जिल्ह्यातील राजकारण चांगलेच बदलत गेले. 2014 मध्ये गोपीनाथ मुंडे यांचे निधनही झाले. त्यानंतर सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. सुरेश धस यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्यामुळे बाळासाहेब आजबे  यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप पक्षाला सोडचिट्टी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तसेच भाजप या पक्षाने सुरेश धस यांचे पुत्र जयदत्त धस यांना 2019 मध्ये तिकीट नाकारले आणि त्यांच्या ऐवजी भीमराव धोंडे यांना बाळासाहेब आजबे यांच्या विरोधात तिकीट दिले.
 2019 मध्ये बाळासाहेब आजबे हे निवडून आले. आणि त्यानंतर सुरेश धस यांची राजकारण पाठीमागे पडू लागले. परंतु राष्ट्रवादी फुटी नंतर आता तेही महायुतीमध्येच गेले आहेत. त्यामुळे हे तीनही प्रस्थ आता माहिती मध्येच आले. त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सुरेश धस, बाळासाहेब आजबे,  भीमराव धोंडे हे उमेदवार इच्छुक आहेत. जर महायुतीमध्ये  फॉर्म्युला ठरला की ज्याचा विद्यमान आमदार त्याला  तिकीट तर हे तिकीट महायुती मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना भेटू शकते.  परंतु या जागेवरती जर भाजपने दावा केला तरी इथून तिकीट कोणाला भेटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसे पाहिले तर महायुती मधून सध्या बाळासाहेबाचे भीमराव धोंडे आणि सुरेश धस यांच्यामध्ये सुरेश धस यांच्या नावाची चर्चा चांगलीच रंगलेली दिसत आहे. तसेच सुरेश धस यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपलेला आहे. त्यामुळे महायुतीकडून सुरेश धस यांचाही विचार यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी केला जाऊ शकतो. तसेच सध्या चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे मराठा आरक्षण.  त्यामुळे महायुतीकडून ही एक मराठा चेहरा असावा म्हणून सुरेश धस यांचा विचार करू शकतात. तर महाविकास आघाडी कडून मेहबूब शेख साहेबराव दरेकर यांची नावे चर्चेमध्ये आहेत. तर आता महायुतीकडून सुरेश धस यांना तिकीट मिळाले किंवा बाळासाहेब आजबे यांना तिकीट मिळाले तर भीमराव धोंडे हे काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  तसेच शरद पवार आष्टी येथे कोणत्या नवीन चेहऱ्याला संधी देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  तसेच मनोज जरांगे येथे नवीन कोणता चेहरा उभा करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  त्यामुळे आष्टी येथे एकंदरीत तिहेरी लढत यावेळेस पाहिला भेटेल असे चिन्ह दिसत आहे.
आष्टी विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाले तर इथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा आहे.  इथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी कोणताही उपाययोजना करताना दिसत नाहीये.  कुकडीचे पाणी आष्टी ला कधी येणार हा प्रश्न अजूनही सतावत आहे.  या भागामध्ये पाणीच नाहीये त्यामुळे औद्योगिक प्रकल्प असे काही या विधानसभा मतदारसंघांमध्ये दिसत नाही. तर मंडळी असा आहे आष्टी या विधानसभा मतदारसंघाचा लेखाजोखा.
तर मंडळी तुम्हाला काय वाटतं आष्टी येथून कोण आमदार व्हावा हे आम्हाला कमेंट्स करून कळवा.

Leave a Comment