‘टोरेस’ खाजगी कंपनीनं गुंतवणूकदारांना लाखो रुपयांचा गंडा घातला


‘टोरेस’ खाजगी कंपनीनं गुंतवणूकदारांना लाखो रुपयांचा गंडा घातला

कमीत कमी वेळेत जास्त पैसे कुणाला नको असतात? असंच आमिष दाखवत एका आर्टिफिशिअल डायमंड बनवणाऱ्या खाजगी कंपनीनं गुंतवणूकदारांना लाखो रुपयांचा गंडा घातला.

 कमी दिवसात भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशाच प्रकारचा पॉन्झी घोटाळा मुंबईत देखील समोर आला आहे. रुपया-रुपया जोडून संसाराचा राहाट गाडा चालवणाऱ्या गोरगरिबांची शेकडो कोटींची फसवणूक झाली. टोरेस कंपनीच्या घोटाळ्यामध्ये लाखो सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. नागरिकांनी त्यांच्या मेहनतीने कमवलेले पैसे जास्त परतावा मिळवण्याच्या नादात या कंपनीत गुंतवले होते. मात्र, नागरिकांना यातून कोणताही परतावा मिळाला नाही.
या कंपनीने जवळपास तीन हजार कोटींची फसवणूक केली आहे. फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर नागरिकांनी या प्रकरणी तक्रार नोंदवली होती. अखेर तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी कारवाई करत या प्रकरणात 3 आरोपींना अटक केली आहे. या घोटाळ्याचे धागेदोरे परदेशापर्यंत पोहोचले आहेत.
चला तर पाहूया टोरेस घोटाळा नक्की काय आहे?
फेब्रुवारी 2024 मध्ये मुंबईतील काही भागांमध्ये टोरेस नावाने काही दुकाने उघडली. कंपनीच्या मालकांनी या दुकानांच्या माध्यमातून हिरे दागिन्यांची विक्री करत असल्याचे दाखवले. तसेच, काही बोनस योजना देखील सुरू केल्या. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 10 हजार रुपयांचे मोईसॅनाईट स्टोनचे पेडंट मोफत देण्याची घोषणा केली. याशिवाय, गुंतवणुकीच्या रक्कमेवर 52 आठवड्यामध्ये 6 टक्के व्याजदराने परतावा देणार असल्याचेही सांगितले. पुढे व्याजदराची रक्कम वाढवून 11 टक्के करण्यात आली. गुंतवणुकीवर नागरिकांना परदेशी हिरे, खडे व दागिने स्वस्त दिले जात होते. मोठ्या प्रमाणात फायदा होईल या उद्देशाने गुंतवणूकदारांनी लाखो रुपये यात गुंतवले होते.
सुरुवातीचे काही महिने नागरिकांना परतावा देखील मिळाला. मात्र, मागील दोन महिन्यांपासून कंपनीने गुंतवणूकदारांना पैसे देणे बंद केले. या स्कॅममध्ये जे आर्टिफिशियल स्टोन हिरे म्हणून दिले गेले , व्हाउचर दिले ते खोटे होते. अलिशान दुकानात बोलवून सेमिनार घेऊन लोकांना गंडा घातला गेला. दादर, माहीम परिसरात राहणाऱ्या अनेक लहानमोठ्या व्यवसाय करणाऱ्या लोकांनी यात लाखो रूपये गुंतवले. दादरमध्ये भाजी विक्रेते असलेल्या कृष्णाचे ४ लाख यात बुडाले. सध्या त्यांच्याकडे टोरेस कंपनीने दिलेले २० खोटे हिरे आहेत, व्हाऊचर आहेत. ॲपमध्ये गुंतवणूक दिसते. परंतु त्यांच्या मेहनतीचे पैसे मात्र परत मिळविण्याची शक्यता नाही. रमेश ह्या चहा विक्रेत्याने ६० हजार गुंतवणूक केली त्याचा अनेक महिन्यांचा पगार त्याने गुंतवला. आता पुढे घर चालवण्यासाठी पैसे नसल्यामुळे तो हतबल झाला आहे. कोपरखैरणे येथे घंटा गाडीवर काम करणाऱ्या संजुने २ लाख पीएफ मधून काढून गुंतवणूक केली त्यांना घर घ्यायचे होते. घरकाम करणाऱ्या सुमनचे मुलांच्या शिक्षणासाठी साठवलेले ३ लाख तीने गुंतवणूक केली. परंतु आज ती त्याच दादरमधील शोरूममध्ये आर्टिफिशियल स्टोन आणि पैसे भरल्याची पावती घेऊन आली. परंतु खोट्या हिऱ्यांप्रमाणे ही कंपनीचं खोटी असल्याचं तिला समजलं.
 चला तर पाहूया ‘टोरेस’ घोटाळ्याचं मॉडेल कसे होते
दादरसह मुंबईत आलिशान स्टोअर्स
सोने, हिरे, चांदीत गुंतवणुकीसाठी ऑफर
कमीत कमी गुंतवणुकीची ऑफर
गुंतवणुकीच्या बदल्यात आर्टिफिशिअल हिरे
गुंतवणूकदारांना व्हाऊचर्सचं वाटप
आठवड्याला 4-11% परताव्याचं आमिष
कमीत कमी रकमेवर 4% परतावा
6 लाखांहून अधिकच्या रकमेवर 11% परतावा
अनेकांना नफा मिळवून दिल्याची बतावणी
घर, हिरे, कार, दागिन्यांच्या परताव्याचं आमिष
यांनी या गुंतवणुकीसाठी एक चैन तयार केली होती यामध्ये एका गुंतवणुकी दाराने जर दुसरा गुंतवणूकदार जोडला तर त्याला २० टक्के कमिशन देण्यात येत होते. आणि ते वीस टक्के कॅश रक्कम मध्ये देण्यात येत होते.
कंपनीच्या शहरात ६ शाखा असून कांदिवलीची शाखा काही दिवसांपूर्वीच सुरू झाली होती. ४ हजार रुपयांपासून गुंतवणूक करण्याची सोय व दर आठवड्याला परतावा मिळत असल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कंपनीत पैसे गुंतविले.
चला तर पाहूया कशा पद्धतीने झाली फसवणूक?
कंपनीकडून विक्री होणारे दागिने बनावट होते. आर्टिफिशियल स्टोन जे कोणी विकत घेत नाही, असे हिरे म्हणून दिले याबाबत गुंतवणूकदारांना संपूर्ण माहिती होती. मात्र, अधिक परतावा मिळत असल्याने अनेकांनी केवळ लालसेपोटी गुंतवणूक सुरू ठेवल्याचे समजते . कंपनीने आतापर्यंत अनेकांना नफा मिळवून दिला. उच्चभ्रू परिसरातील इमारतीत घरे, गाड्या, दागिने असा आकर्षक परतावा देऊन कंपनीने गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला. नवीन वर्षाच्या सुरुवातीला परतावा वाढल्याने गुंतवणूकदारांची संख्या वाढली. सहा लाखांपेक्षा अधिक रक्कमेवर ११ टक्के आणि त्यापेक्षा कमी रक्कमेवर चार टक्के परतावा दिला जात असे. त्यामुळे अनेकांनी कंपनीत करोडो रुपये गुंतविले. कंपनीने अन्य ७ देशांमध्येही फसवणूक केल्याची माहिती आहे.
टोरेस कंपनीच्या या योजनेत गुंतवणूक करणारे बहुतांश नागरिक हे मध्यमवर्गीय आहेत. भाजी विक्रेते, लहान व्यापारी अशा लाखो लोकांनी या योजनेत कोट्यावधी रुपये गुंतवले होते. अवघ्या 4 हजार रुपयांपासून या योजनेत गुंतवणूक करता येत होती. या घोटाळ्यात जवळपास सव्वा लाख नागरिकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाली आहे.
11 टक्के व्याजदर व स्वस्त मिळणारे हिरे, खडे याला आकर्षित होऊन नागरिकांनी मेहनतीचे सर्व पैसे या बनावट योजनेत लावले होते. मात्र, अचानक कंपनीकडून मिळणारा परतावा बंद झाल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला. डिसेंबरपासून परतावा न मिळाल्याने नागरिकांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तसेच, कंपनीच्या ऑफिसला देखील भेट दिली. मात्र, कंपनीचे सर्व ऑफिस बंद असल्याचे लक्षात आल्यावर फसवणूक झाल्याचे समोर आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी कंपनीच्या ऑफिसबाहेर गर्दी केली.
चला तर पाहूया भाजी विक्रेत्यामुळे घोटाळा उघडकिस कसा आला?
एका भाजीविक्रेत्यामुळे हा घोटाळा उघडकीस आला. प्रदीपकुमार वैश्य या भाजी विक्रेत्याने टोरेस कंपनीच्या या बनावट योजनेत 4 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. सुरुवातीला गुंतवणुकीवर परतावा देखील मिळाला. त्यानंतर त्यांनी आणखी पैसे जमा करून या योजनेत गुंतवले. मात्र, अचानक परतावा येणे थांबवल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने पोलिसात तक्रार दाखल केली.
आतापर्यंत या प्रकारनात 3 जणांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत कंपनीची जनरल मॅनेजर तानिया सॅसातोवा उर्फ तझागल कारासॅनोव्हना सॅसातोवा, संचालक सर्वेश अशोक सुर्वे व स्टोअर इनचार्ज व्हॅलेंटिना गणेश कुमार यांना अटक केली आहे. यातील काहीजण परदेशी नागरिक आहेत. तर काही आरोपी फरार झाले आहेत.
त्यामुळे मंडळी स्वतःचा कष्टाने कमावलेला पैसा कोणत्या प्रकारे गुंतवणूक करायचा हे आपण ठरविले पाहिजे तसेच आता या प्रकरणांमध्ये पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment