हणार आहोत धाराशिव  जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाबद्दल.  धाराशिव जिल्ह्यामध्ये चार विधानसभा मतदारसंघ आहेत. उस्मानाबाद,  तुळजापूर,  उमरगा आणि भूम परांडा असे चार विधानसभा मतदारसंघ आहेत. 2014 मध्ये धाराशिव आणि परंडा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे तर तुळजापूर काँग्रेस आणि उमरगा शिवसेनेकडे गेले होते. म्हणजेच राष्ट्रवादीला दोन तर काँग्रेस आणि शिवसेनेला प्रत्येकी एकेक असे आमदार निवडून आले होते.  2019 मध्ये भाजप आणि शिवसेना यांची युती होती तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती होती.  2019 मध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये भाजप पक्षाचे एक आणि शिवसेना पक्षाचे तीन आमदार येथून निवडून आले होते. चला तर पाहुयात येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी या चार मतदारसंघांमध्ये नक्की काय चाललंय?
पहिला विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे तुळजापूर
धार्मिक केंद्र शक्तीपीठ म्हणून देशभर खाती असणारा हा तुळजापूर मतदारसंघ. तुळजापूर येथे निवडून येतात ते म्हणजे धोतर घालणारे आमदार अशी एक परंपरा होती.  हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघ क्रमांक २४१ आहे.  तुळजापूर मतदारसंघात धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुका आणि उस्मानाबाद तालुक्यातील बेंबली, पाडोळी आणि तेर ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो.  तुळजापूर हा विधानसभा मतदारसंघ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात मोडतो. भारतीय जनता पक्षाचे राणा जगजितसिंग पद्मसिंह पाटील हे तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा पक्षाचे राणा जगजितसिंह पद्मसिंहा पाटील 99,034 मते मिळवून विजयी झाले. काँग्रेस पक्षाचे चव्हाण मधुकरराव देवराव यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.  विजयाचे अंतर: 23,169 मते एवढे होते
2014 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे चव्हाण मधुकरराव देवराव 70,701 मते मिळवून विजयी झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे गोरे जीवनराव विश्वनाथराव यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये तुळजापूरचे विद्यमान आमदार भाजपचे दिग्गज नेते राणा जगतसिंह पाटील हे थोडे पिछाडीवर गेलेले दिसतात. कारण नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदारकीसाठी राणा जगत जीत सिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा पराभव झालेला आहे.  तसेच स्वतःच्या पतीच्या विधानसभा मतदारसंघांमधून अर्चना पाटील यांना खूपच कमी लीड मिळाले होते. तर तुळजापूर या विधानसभा मतदारसंघांमधून शिवसेना उद्धव ठाकरे गट या पक्षाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना येथून तब्बल 52000 मिळाले आहे आणि ओमराजे निंबाळकर यांचा लोकसभा निवडणुकीमध्ये विजय झाला आहे. त्यामुळे येथील शिवसेना उद्धव ठाकरे गटातून इच्छुकांची गर्दी वाढू लागली आहे कारण त्यांना  आता जिंकण्याचा आत्मविश्वास आला आहे. परंतु तुळजापूर येथे महाविकास आघाडीमध्ये तीनही पक्ष या जागेवरती दावा करताना दिसत आहेत. तसे पहिले तर इथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षाचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. 2019 मध्ये प्रथमच जगतजीत सिंह यांनी भाजपाचे कमल तुळजापूर मध्ये फुलवले होते. परंतु आता ते कमळ 2024 च्या निवडणुकीमध्ये उमलणार की कोमजणार हे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये समजेल.
आता पाहूया दुसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे उमरगा
उमरगा  हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. उमरगा विधानसभा मतदारसंघ क्रमांक २४० आहे. उमरगा मतदारसंघात धाराशिव जिल्ह्यातील लोहारा आणि उमरगा या दोन तालुक्यांचा समावेश होतो. उमरगा हा विधानसभा मतदारसंघ धाराशिव लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती – SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे. शिवसेनेचे ज्ञानराज धोंडिराम चौगुले हे उमरगा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. 2009 मध्ये 99 मतदारसंघ झाल्यानंतर उमरगा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. तेव्हा प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून नोकरी करणाऱ्या साध्या मध्यमवर्गीय माणसावर शिवसेनेने विश्वास टाकला तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून ते म्हणजे ज्ञानराज चौगुले. ज्ञानराज चौगुले हे उमरगा येथे सलग तीन टर्म आमदार राहिलेले उमेदवार आहेत. उमरगा हा 1995 नंतर शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. माझी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या शिष्य विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले अशी यांची ओळख आहे.  रवींद्र गायकवाड खासदार झाल्यानंतर चौगुले आमदार बनले ते कायमचेच. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे चौघुले ज्ञानेराज धोंडिराम 86,773 मते मिळवून विजयी झाले. तर काँग्रेस पक्षाचे भालेराव दत्तू रोहिदास यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.  विजयाचे अंतर 25,586 मते एवढे होते.  2014 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे चौघुले ज्ञानेराज धोंडिराम 65,178 मते मिळवून विजयी झाले. काँग्रेस पक्षाचे किसन नागनाथ कांबळे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. ज्ञानराज चौगुले हे 2009 ते 2019 असे इथे सलाम तीन  टर्म आमदार राहिले आहेत. शिवसेनेने सामान्य माणूस म्हणून ज्ञानराज चौगुले यांच्या वरती विश्वास टाकला होता परंतु शिवसेना फुटी नंतर ज्ञानराज चौगुले यांनी शिवसेना शिंदे गट यांना साथ दिली.
 उमरगा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे इथे असणारे निष्ठावंत शिवसैनिक ज्ञानराज चौगुले यांच्या वरती नाराज असल्याच्या चर्चा आहेत. याचा फटका यांना येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणूक मध्ये बसू शकतो.  तसेच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराला जास्त लीड भेटले आहे. त्यामुळे इथे अजूनही असंच दिसत आहे की उमरगा हा जरी शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी उमरगा येथील मतदारसंघ निष्ठावंत शिवसैनिक आहे त्यामुळे तो शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचं दिसून आले आहे. त्यामुळे आता उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाने त्यांच्या हक्काची जागा असल्याचे सांगत निवडणूक लढण्याचा दावा केला आहे. दुसरीकडे या जागेवर काँग्रेसने दावा केला आहे. आतापर्यंत या मतदारसंघात काँग्रेसने निवडणूक लढवली आहे. एकेकाळी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. येथील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी ही जागा काँग्रेसलाच मिळायला हवी, अशी आग्रही मागणी तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
आता पाहूया तिसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे भूम परंडा
परांडा हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे.  परांडा विधानसभा मतदारसंघ  २४३ आहे. परांडा मतदारसंघात उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा, भूम आणि वाशी या तालुक्यांचा समावेश होतो.  परांडा हा विधानसभा मतदारसंघ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात मोडतो. शिवसेनेचे तानाजी जयवंत सावंत हे परांडा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. तानाजी सावंत हे शिवसेना शिंदे गट या पक्षाचे उमेदवार आहेत.  2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे तानाजी जयवंत सावंत 1,06,674 मते मिळवून विजयी झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे मोटे राहुल महारुद्र यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.  2014 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे मोटे राहुल महारुद्र 78,548 मते मिळवून विजयी झाले होते. भूम परंडा हा तसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचा बालेकिल्ला मानला जायचा.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असणारे तानाजी सावंत यांना संधी मिळत नसल्यामुळे 2016 च्या आसपास यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना रामराम करून त्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला.
त्यामुळे ते शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्यासाठी काम करू लागले. थोड्या दिवसात तानाजी सावंत हे उद्धव ठाकरे यांच्या फारच जवळचे झाले.  त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांना विधान परिषदेवर घेतले. परंतु तानाजी सावंत यांना लोकांची मतदान घेऊन त्यांना निवडून यायचं होतं त्यासाठी त्यांनी 2019 मध्ये भूम परंडा येथे शिवसेनेकडून तिकीट मिळवले आणि ते भूम परंडा येथे जिंकून सुद्धा आले. तानाजी सावंत यांच्या रूपात शिवसेना  या पक्षाला भूम परंडा येथे एक संधी मिळाली. परंतु शिवसेना फुटी नंतर तानाजी सावंत यांनी एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचे ठरवले आणि ते शिंदे यांच्या पक्षात सहभागी झाले.
चला तर पाहुयात भूम परांडा येथील राजकीय  इतिहास. भूम परंडा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा .राहुल मोटे हे  सलग तीन टर्म आमदार म्हणून राहिलेले आहेत. फक्त 1995 साली शिवसेनेचे ज्ञानेश्वर पाटलांनी या मतदारसंघात आमदारकी मिळवत भूम परंडा येथे शिवसेनेने पहिल्यांदा आपला झेंडा फडकवला. राहुल मोटे आमदार असताना देखील ज्ञानेश्वर पाटलांनी त्यांच्या हातात सत्ता नसून देखील मतदारसंघावरची पकड सैल होऊ दिली नव्हती. तर ज्ञानेश्वर पाटलांना उमेदवारी मिळून सुद्धा राहुल मोटे यांना मात देता येत नव्हती. या सर्वच गोष्टींचा फायदा घेत तानाजी सावंत यांनी शिवसेना या पक्षात प्रवेश करत विधानपरिषदेची आमदारकी मिळवली. त्यानंतर त्यांनी कॅबिनेट मंत्री पदही मिळवले. या सर्व गोष्टींमुळे भूम परंडा येथे ज्यांनी शिवसेनेचा पहिल्यांदा झेंडा फडकवला असे ज्ञानेश्वर पाटील राजकारणात मागे पडत गेले. तर तानाजी सावंत यांच्या चेहरा समोर येत गेला.  त्यामुळे 2019 मध्ये ज्ञानेश्वर पाटील यांचे तिकीट कट करून शिवसेना या पक्षाने तानाजी सावंत यांना तिकीट दिले होते. त्यामुळे 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे तानाजी सावंत विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल मोठे अशी लढत झाली होती.  सलग तीन टर्म आमदार राहुल मोटे यांचा पराभव करत तानाजी सावंत यांनी मागील विधानसभेला बाजी मारली. कारण राहुल मोठे हे पंधरा वर्षे आमदार असून देखील त्यांनी विकास काम,  पाणी प्रश्न, रस्ते अशा समस्या सोडवण्यात ते कुठेतरी कमी पडले होते. याचाच फायदा तानाजी सावंत यांनी उचलला त्यांनी शिवजल क्रांतीच्या माध्यमातून सिंचनाची कामे केली. परंतु शिवसेना फुटी नंतर तानाजी सावंत यांनी एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचे ठरवले आणि ते शिवसेना एकनाथ शिंदे या गटामध्ये सामील झाले. त्यामुळे भूम परंडा येथील मतदार नाराज दिसत आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकी मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना भूम परांडा या मतदारसंघाने सर्वात मोठे लीड  दिले आहे. यावरून समजत आहे की येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणूक मध्ये तानाजी सावंत यांना मतदारांकडून किती मते भेटतील ? असा प्रश्न पडू लागला आहे. तर शिवसेना ठाकरे गटाकडून ज्ञानेश्वर पाटील हेही विधानसभेची तयारी करत आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून राहुल मोठे हे आघाडीवर आहेतच . तसेच या तीनही पक्षांमध्ये अनेक उमेदवार इच्छुक असल्याचे चर्चा आहेत .परंतु आता भूम परंडा ही जागा महाविकास आघाडीमध्ये कोणाला भेटेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  तसेच महायुतीमध्ये आता शिवसेना शिंदे गटाकडून तानाजी सावंत हे विद्यमान आमदार आहेत . परंतु येथे श्रीकांत शिंदे यांचे वर्गमित्र राहुल घुले हेही या मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे . त्यामुळे आता महायुतीकडून ही जागा कोणाला सुटते आणि ते कोणत्या उमेदवाराला तिकीट भेटेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भूम-परंडा-वाशी मतदारसंघाची जागा ही शिवसेना उद्धव ठाकरे गटाची होती. त्यामुळे या जागेवर शिवसेना उद्धव ठाकरे गटांनी दावा केला आहे.  तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून या मतदार संघावर दावा करण्यात आला आहे.  या ठिकाणी खासदार ओमराजे निंबाळकर यांना सर्वाधिक 80 हजाराची आघाडी आहे. त्यामुळे या मतदारसंघावरती महाविकास आघाडीतील दोन पक्षाचे लक्ष आहे.
आता पाहुयात शेवटचा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे उस्मानाबाद
हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ  क्रमांक २४२ आहे. उस्मानाबाद मतदारसंघात उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुका आणि उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी व उस्मानाबाद महसूल मंडळ आणि उस्मानाबाद नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो.  उस्मानाबाद हा विधानसभा मतदारसंघ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात मोडतो. शिवसेनेचे कैलास बाळासाहेब पाटील (घाडगे) हे उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे कैलास बाळासाहेब घाडगे पाटील 87,488 मते मिळवून विजयी झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संजय प्रकाश निंबाळकर यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राणाजगजितसिंह पद्मासिन्हा पाटील 88,469 मते मिळवून विजयी झाले होते. शिवसेना पक्षाचे ओमप्रकाश भूपालसिंह (पवनराजे) राजेनिंबाळकर यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाचे ओमप्रकाश राजे निंबाळकर यांची खासदार म्हणून निवड झाली आहे.  तसेच ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना उस्मानाबाद या ठिकाणी चांगले लीड भेटले आहे. त्यामुळे उस्मानाबाद येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कैलास पाटील हे आमदार आहेत.  त्यांनी ठाकरे गटाच्या पडत्या काळात ठाकरे गटाची साथ सोडली नाही. त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित असून तेच याठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाचा दावा कायम आहे. त्यामुळे उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ येथे महाविकास आघाडी कडून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कैलास पाटील यांच्याविरुद्ध महायुतीकडून आता कोणत्या नवीन चेहऱ्याला संधी भेटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
तसेच धाराशिव विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे त्यामुळे येथे महायुतीला शिवसेनेचा बालेकिल्ला तोडण्यात यश भेटणार का हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.  तसे पाहता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून तर असंच वाटत आहे की येथे कैलास पाटील यांचे पारडे जड राहणार आहे.  कारण नुकतेच झालेले खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर हे इथे कैलास पाटील यांना साथ देणार आहेत.  तर असा आहे संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा लेखाजोखा.
तर मंडळी धाराशिव जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ येथे कोण आमदार होतील असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून सांगा.

By satta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *