ब्राह्मणांची ताकद दाखवून देऊ?
एकीकडे छावा चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरू आहे, तर त्यावरून वादाची मालिकाही संपायला तयार नाही. आता यात नाव जोडलं गेलंय ते इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांचं. छावा चित्रपटावर बोलताना ब्राह्मणद्वेषी विचार मांडल्याचा आरोप करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचं समोर आलं आहे.
विशेष म्हणजे, ही धमकी देणाऱ्या व्यक्तीने संभाजी महाराजांच्या इतिहासावरून सावंत यांच्यावर जातीय टीका केली आणि ब्राह्मण समाजाविरोधात काहीही बोलल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला. या प्रकरणात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर पोलिस अधिक्षकांना तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
धमकी देणाऱ्या व्यक्तीने आपल्या संभाषणात मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांचा उल्लेख केला.”छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशभर पोहोचवण्यात भालजी पेंढारकर यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी ऐतिहासिक चित्रपटांच्या माध्यमातून शिवरायांचा लौकिक वाढवला, नाहीतर शिवाजी महाराजांचे नावच कुणाला माहिती झाले नसते,” असे वक्तव्य धमकीत करण्यात आले.
त्यामुळे आता हे भालजी पेंढारकर कोण होते? त्यांच्यामुळे खरच देशाला शिवरायांचा इतिहास समजला का? असे प्रश्न सर्वाना
पडत आहेत. चला तर याबद्दल सविस्तर माहिती पाहू.
मुद्दा क्रमांक १) इंद्रजीत सावंत यांना कोणती धमकी दिली,?
इंद्रजित सावंत यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाउंटवरुन त्यांना आलेल्या फोन कॉलच्या संभाषणाची ऑडिओ क्लीप पोस्ट केली आहे.
यामध्ये एक व्यक्ती इंद्रजित सावंत यांना धमकावत आहे. “तुम्ही कोल्हापूरात जिथे असाल तिथे लक्षात ठेवा, ब्राह्मणांची ताकद कमी लेखू नका. तुम्हाला हा महाराष्ट्र मराठमोळा वाटत असेल पण ब्राह्मणांची काय ताकद होती, ते शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात बघा. तुम्ही जास्त बोलू नका. एक दिवस तुम्हाला ब्राह्मणांची औकात दाखवून देऊ. छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचवणारा भालाजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता. नाहीतर तुमचे छत्रपती कुठे गेले असते काही माहिती पडल नसत. बाबासाहेब पुरंदरे ब्राह्मण होता. तुम्हाला ब्राह्मणांविषयी इतका द्वेष का आहे. ब्राह्मणांना काही बोललात तर घरात घुसून मारू, अशी धमकी देत संबंधित व्यक्तीने इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ केली होती.
मुद्दा क्रमांक २) धमकीमध्ये नाव घेतलेले भालजी पेंढारकर कोण होते?
भालजी पेंढारकर यांचा जन्म ३ मे १८९८ रोजी कोल्हापुरात झाला. ऐतिहासिक आणि देशभक्तिपर चित्रपटांच्या निर्मितीमध्ये त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले. त्यांनी ‘छत्रपती शिवाजी’ (१९५२), ‘नेताजी पालकर’ (१९३९), ‘थोरातांची कमला’ (१९४१) यांसारख्या चित्रपटांद्वारे ऐतिहासिक पात्रे जिवंत केली.
त्यांच्या चित्रपटांमधून छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि मराठा इतिहास यांचा महत्त्वाचा ठसा उमटतो. १९४८ मध्ये गांधीजींच्या हत्येनंतर झालेल्या दंगलीमध्ये कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओ जाळला गेला, मात्र पेंढारकरांनी तो पुन्हा उभा केला.
भालजी पेंढारकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचे नाव आहे. त्यांनी मराठा साम्राज्य, स्वातंत्र्यलढा आणि भारतीय संस्कृती यावर अनेक उत्तम चित्रपट निर्माण केले. मात्र, काही लोकांचा असा दावा आहे की त्यांनी ऐतिहासिक चित्रपटांमध्ये काही गोष्टी एकतर्फी दाखवल्या आणि काही प्रसंगांचा विपर्यास केला.
मुद्दा क्रमांक ३) इतिहासाच्या मांडणीवरून वाद का?
इंद्रजीत सावंत हे एक इतिहास संशोधक आहेत.
इंद्रजित सावंत यांनी संभाजी महाराजांच्या इतिहासा संदर्भात काही नवी तथ्ये मांडली होती, जी धमकी देणाऱ्या व्यक्तिला न पटल्याने त्यांने धमक्या दिल्या. यामध्ये जातीविषयक चर्चा झाली असून, भालजी पेंढारकर यांची ऐतिहासिक चित्रपटांमधील भूमिका ही संभाजी महाराजांच्या इतिहासाबाबत कशी प्रभावी होती, यावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
इंद्रजित सावंत यांना आलेल्या धमकीच्या घटनेमुळे इतिहासाच्या मांडणीवरून समाजात अजूनही वाद कसे आहेत, हे स्पष्ट झाले आहे. भालजी पेंढारकर हे एक महान दिग्दर्शक होते, पण त्यांच्यावर इतिहासाची एक विशिष्ट बाजू दाखवल्याचा आरोपही वेळोवेळी झाला आहे. त्यानुसार, इंद्रजित सावंत यांनी इतिहासाच्या नव्या दृष्टिकोनातून केलेल्या मांडणीला विरोध झाला आणि त्यांना धमक्या आल्या. या प्रकरणाचा पुढील तपास काय निष्कर्ष काढतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना तातडीने तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. धमकी देणारी व्यक्ती कोण होती, तिचे हेतू काय होते आणि इंद्रजित सावंत यांना का लक्ष्य करण्यात आले, याचा तपास सुरू आहे.
मुद्दा क्रमांक ४) इंद्रजीत सावंत यांची तक्रार नेमकी काय आहे?
इंद्रजीत सावंत म्हणाले की, “मी मला आलेला फोन त्याची डिटेल्स दिली आहे. हा फोन कोठून आला होता, कोणी केला होता याची तपासणी पोलिसांनी करावी. मला मिळालेल्या धमकीपेक्षा छत्रपती संभाजीराजे आणि शिवाजी महाराज यांच्याबद्दल वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दबाबत मी तक्रार दिली आहे. माझ्या धमकीबाबत पोलिसांनी सुमोटो कारवाई करावी. कोरटकर यांनी इंस्टाग्राम वरूनही मला धमकी दिली आहे. याच्या पाठीमागे कोण आहे हे तपासण्याची गरज आहे. पोलिसांनी छत्रपतींबाबत आक्षेपार्ह बोलणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करावी. पुन्हा कोणी धाडस करणार नाही अशी कारवाई करावी.”
प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीनं ही धमकी दिल्याची माहिती स्वत: इंद्रजीत सावंत यांनी दिली.
तर तो आवाज आपला नसल्याचा कोरटकरांनी दावा केला आहे.
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंतांना आलेला धमकीचा फोन माझा नसल्याचं स्पष्टीकरण प्रशांत कोरटकरांनी दिलं आहे. इंद्रजीत सावंतांशी काही देणंघेणं नसून, त्यांनी शहानिशा न करता केलेल्या आरोपामुळे मनस्ताप झाल्याचं कोरटकर म्हणाले. ऑडिओ क्लिपमधील आवाज आपला नाही असं स्पष्टीकरण प्रशांत कोरटकर यांनी दिलं.
प्रशांत कोरटकर म्हणाले की, “फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जी कॉल रेकॉर्डिंग इंद्रजीत सावंत यांनी पोस्ट केली आहे, त्या कॉल रेकॉर्डिंग मधील आवाजही माझा नाही. इंद्रजीत सावंत यांनी फेसबुक पोस्ट करून माझं नाव वापरण्यापूर्वी किमान माझ्याशी संपर्क साधायला हवा होता. किंबहुना त्यांना आलेला कॉल मीच केला आहे की नाही याची शहानिशा करायला हवी होती. त्यांनी असं काहीही न करता फेसबुक पोस्ट करून माझी बदनामी तर केलीच आहे, सोबतच मला सकाळपासून अनेक धमकीचे कॉल येत आहेत. त्यामुळे मी इंद्रजीत सावंत यांच्या विरोधात पोलिसांकडे आणि सायबर सेलमध्ये तक्रार करणार आहे.”
तर मंडळी या सर्व प्रकरणामागे नक्की कोणाचा हात आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आणि शिवरायांबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरणाऱ्यांना कोणती शिक्षा दिली पाहिजे हे आम्हाला कमेंट्स करून सांगा