भारतीय वास्तवपटाचा थोडक्यात इतिहास
  भारतीय वास्तवपटाची सुरुवात विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात झाली. अगदी छोटे छोटे वास्तवपट त्या दरम्यान भारतीय दिग्दर्शकांनी निर्माण केले. अनेकांनी हे वास्तवपट प्रयोग म्हणूनच निर्माण केले होते. भारतातील वास्तवपटकार व त्यांनी निर्माण केलेल्या वास्तवपटाचा थोडक्यात इतिहास पुढीलप्रमाणे सांगता येईल.
सन १९४६ मध्ये इंग्रजांनी भारत सोडून जाण्याबाबतच्या गतिविधी वाढवल्या. त्यामुळे वास्तवपट निर्माण करणा-या फिल्म अॅडव्हायजरी बोर्ड, द इन्फॉर्मेशन सोसायटी ऑफ इंडिया व इंडियन न्यूज परेड या तिन्ही संस्था बंद केल्या. याचा परिणाम म्हणजे १९४७ रोजी ब्रिटीशांकडून सत्तेचे हस्तांतरण भारताकडे होत असतानाचे अधिकृत किंवा सरकारी चित्रण उपलब्ध नाही. जे १० मिनिटांचे नेहरूंच्या भाषणाचे चित्रिकरण आहे ते एका अमेरिकन नागरिकाने स्वत:साठी केलेले चित्रण आहे. याची दखल भारत सरकारने घेतली. डिसेंबर १९४७ मध्ये केंद्राच्या अर्थखात्याच्या स्थायी समितीने वास्तवपट निर्मिती आणि प्रसार-प्रचार मोहिमेला पुन्हा सुरु करण्यासाठी मान्यता दिली. १९४८ मध्ये फिल्म डिव्हीजन ऑफ इंडियाची स्थापना झाली. वास्तवपटांची निर्मिती करणे व निर्मिती करण्यास प्रोत्साहन देणे हा या संस्थेचा उद्देश होता. केंद्र सरकारच्या अखत्यारित काम करणा-या ‘फिल्म डिव्हीजन बोर्डाचे’ डेप्युटी कंट्रोलर म्हणून मोहन भावनानी यांची नेमणूक झाली. १९४८-४९ मध्ये फिल्म्स डिव्हीजनने जवळपास ९७ वास्तवपट तयार केले. त्याचे सबटायटलिंग व निवेदन जवळपास भारतीय सात भाषामध्ये केले व देशभर दाखविले गेले. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीश सरकारने सुरु केलेल्या आय.एफ.आय. सारख्या संस्था बंद पडल्या. या संस्थामध्ये काम करणारे अनेक वास्तवपटकार स्वत: वास्तवपट निर्मिती करु लागले.
पॉल झिल्स, डॉ. प्रमोद पथी, फली बिलिमोरिया यांनी एकत्रित येऊन ‘डॉक्युमेंटरी फिल्म युनिट ऑफ इंडिया’ या संस्थेची स्थापना केली. ‘बर्माशेल’ नावाची वास्तवपट निर्मितीच्या संदर्भातील संस्था याच दरम्यान स्थापन झाली. बर्माशेल संस्थेतील वास्तवपटकारांनी प्रवासवर्णनात्मक व सांस्कृतिक विषयावर अनेक प्रभावी वास्तवपट बनविले. डॉ. विजय पथी, विजयकर व बाप्टिस्टा या वास्तवपटकारांनी बर्माशेल कंपनीसाठी ‘लॉरी ड्रायव्हर’ नावाचा वास्तवपट बनवला. तो सर्वसामान्य वाहतुक करणा-या लॉरी ड्रायव्हरच्या दैनंदिन कामकाजावर आधारित होता. त्यावेळी तो खूपच गाजला. फली बिलिमोरिया, डॉ. प्रमोद पथी व पॉल झिल्स यांनी मिळून ‘अ टाइनी थिंग ब्रिंग डेथ’ नावाचा देवीच्या रोगा संदर्भात माहिती सांगणारा वास्तवपट बनवला. त्याला एडिनबर्ग, लोकॅर्नो, बर्लिन सारख्या नावाजलेल्या चित्रपट महोत्सवामध्ये पारितोषिकेही मिळाली. फिल्म डिव्हीजनने १९५२ ते १९५६ या कालावधीमध्ये ४०० हून अधिक वास्तवपटांची निर्मिती केली. त्यावेळी इर्झा मीर हे फिल्म्स डिव्हीजनचे प्रमुख निर्माता म्हणून काम करीत होते.
१९६५ ते १९७० या कालावधीमध्ये फिल्म्स डिव्हीजनने अनेक दर्जेदार, सृजनात्मक व आशयघन वास्तवपट बनवले. याच दरम्यान वास्तवपट निर्मितीकडे एक चळवळ म्हणून पहायला सुरुवात झाली. त्यावेळी अनेक भारतीय चित्रपट दिग्दर्शकांनी वास्तवपट बनविण्याचे प्रयत्न केलेले दिसतात. १९६७-६८ च्या दरम्यान एस.एन.एस. शास्त्री यांचा ‘आय अॅम ट्वेन्टी’, एम.एफ हुसेन यांच्या कार्यावरील ‘द आइज ऑफ अ पेन्टर’ फली बिलिमोरिया यांचा ‘द हाऊस दॅट आनंदा बिल्ट’, सुखदेव यांचा ‘इंडिया १९६७’ यासारखे वास्तवपट त्या काळात ब-याच प्रमाणात लोकांच्या पसंतीला उतरलेले दिसतात. सी.टी. बाप्टिस्टा यांनी बर्माशेलची स्पॉन्सरशिप घेवून ‘हुनार फिल्म्स’ च्या वतीने ‘लूक टू द स्काय’ हा भारतातील पावसाळया संदर्भात माहिती देणारा वास्तवदर्शी व सृजनात्मक पातळीवरचा वास्तवपट बनविला.
कांतीलाल राठोड यांनी हुनार फिल्म्सच्या वतीने कार्टुन वास्तवपटांचा पाया घातला. त्यांनी कार्टुनचा वापर करुन प्रबोधनात्मक वास्तवपट तयार करण्याची संकल्पना कांतीलाल राठोड यांनी भारतामये प्रथम रुजवली. विमल रॉय प्रॉडक्शन निर्मित व राजबन्स खन्ना दिग्दर्शित ‘गौतम बुध्दा’ च्या जीवनावरील दीर्घ लांबीचा वास्तवपट बनवला. त्यास अनेक महोत्सवामध्ये पारितोषिकेही मिळाली. दरम्यान हरी दासगुप्ता यांनी कोणार्क मंदिरातील शिल्पावर दोन वास्तवपट बनवले. डॉ. प्रमोद पथी यांचे काव्यमय अनुभव देणारे कावेरी नदीवरील ‘द गोल्डन रिव्हर’ व ‘पृथ्वी व पाणी’ हे वास्तवपटही बरेच गाजले. त्यांना राष्ट्रपती पुरस्कारही मिळाला. वास्तवपट निर्मितीच्या क्षेत्रात माहिलाही मागे राहिल्या नाहीत. ‘परित्यक्तेची कहाणी’ हा वास्तवपट दुर्गा खोटे यांनी स्त्रियांचे प्रश्न मांडण्याच्या दृष्टीने बनवला. दरम्यानच्या काळात म्हणजेच १९६० नंतर अनेक व्यक्तीचरित्रात्मक माहितीपटांच्या निर्मितीस भारतामध्ये प्रारंभ झाला. लोकमान्य टिळक (विश्राम बेडेकर), विनेाबा भाने (विश्राम बेडेकर) डॉ. रघुनाथ कर्वे (नील गोखले), डॉ. विश्वेश्वरैया (नील गोखले), जगदीशचंद्र बोस (तपन सिन्हा), आचार्य प्रफुल्लचंद्र राय (हरी दासगुप्ता) आदी व्यक्तीचरित्रात्मक वास्तवपट बनविले गेले. याचबरोबर मंदिरे, लेणी, शिल्पे, किल्ले, कलात्मक वास्तू, नृत्य, संगीत, आदी बाबीवरही वास्तवपट निर्मितीला प्रारंभ झाला.
भरत नाटयासंदर्भात जगत मुरारी, कथकलीवर मोहन वाधवान, लोकनृत्यावर भास्करराव, बालसरस्वतींवर सत्यजित राय, यक्षगान वर अदूर गोपालकृष्णन, बिरजू महाराजांवर चिदानंद गुप्ता, रवि शंकररांवर डॉ. प्रमोद पथी, उस्ताद अमीर खान वर एस.एन.एस. शास्त्री, बेगम अख्तरवर इस्सार, सितारा देवीवर मणी कौल, इ. वास्तवपट निर्माण केले गेले. मुंबई स्थित फिल्म्स डिव्हीजनने यासाठी मेाठया प्रमाणात प्रोत्साहन दिलेले दिसते. दरम्यान दक्षिण भारतात लघुपट किंवा वास्तवपटाचा फारसा प्रचार झालेला दिसत नाही. पण एस.टी. भास्कर यांनी लिहिलेल्या एका लेखात मद्रास राज्यात २० व्या शतकाच्या पहिल्या दोन दशकात ३८ अनुबोधपट अर्थात वास्तवपट व लघुपट बनल्याचा उल्लेख आहे. मद्रासमध्ये के. सुब्रमण्यम, आर. प्रकाश आणि रंगय्या यांनी लघुपट व वास्तवपटांची निर्मिती केली. सुब्रमण्यम यांनी प्रवासवर्णणात्मक व रेल्वेवर खूप वास्तवपट व लघुपट बनविल्याची माहिती मिळते. (भारतीय अनुबोधपट: काल आणि आज, पुरुष बावकर)
काही भारतीय वास्तवपटांची थोडक्यात ओळख
१. इंडिया अनटच्ड (दिग्दर्शक – स्टॅलिन के.)
स्टॅलिन के. हे भारतातील एक नामवंत वास्तवपटकार आहेत. जात व जातीयता हे भारतातील वैशिष्टये व वास्तव आहे. २१व्या शतकात जागतिकीकरण जात व धर्म नाममात्र राहतील व जात व धर्म संपतील असे म्हणणा-या व मानणा-या विचारवतांना चपराक बसावी अशा पद्धतीने चित्रण व वास्तविकता  ‘इंडिया अनटच्ड’ या वास्तवपटामध्ये दिग्दर्शकाने मांडलेली दिसते. भारतातील प्रगत व अप्रगत राज्यांमध्येही तसेच भारतातील प्रमुख चार धर्मांमध्ये जातीय विषमता आजही कशी जिवंत आहे याचे चित्रण या वास्तवपटामध्ये येते.
२. हे राम (दिग्दर्शक – गोपाल मेनन)
फेब्रुवारी – मार्च २००२ गुजरातमध्ये हिंदू-मुस्लिम दंगल झाली. भारतातील मोठ्या दंगलींपैकी एक दंगल. दिग्दर्शक गोपाल मेनन हे जाहिरात क्षेत्रातील दिल्लीमधील मोठी नामांकित व्यक्ती. त्यांनी गुजरात दंगलीच्या वेळी जवळपास १५ तासांचे चित्रीकरण केले. कॅमे-यापुढे ज्यांनी दंगलीचे वर्णन केले किंवा आपली दु:खे मांडली, ते ऐकून गोध्रा हत्याकांड व नंतर उसळलेल्या दंगलीची भयानकता समजू लागते. मानवी क्रुरता आणि एकमेकांच्या जात-धर्माविषयी असलेली तेढ किती भयानक आहे याची जाणीव होते.
३. गुह्य (दिग्दर्शिका – किर्तनाकुमारी)
भारतीय समाज हा रुढी आणि परंपराचा खजिना असलेला देश आहे. या रुढी, परंपरा, अवास्तव, अमानवी, अनैतिक असूनही त्यांचे लोक मनोभावे पालन करताना दिसतात. देवदासीही अशीच एक प्रथा. देवदासी म्हणजे देवाची सेविका, पुढे ती देवाला सोडल्यानंतर केवळ देवाची दासी न राहता समाजातील स्त्रीयांना भोगवस्तू समजणा-या पुरूषांच्या लैंगिक अत्याचाराला बळी पडते. कीर्तनाकुमारी यांनी सदर वास्तवपटातून भारतीय संस्कृतीमध्ये समलैंगिक संभोगांनाही मोठे स्थान असल्याचे लक्षात आणून दिले आहे. पती-पत्नीच्या नात्यापेक्षा पुरूषांची लैंगिक भूक भागवणा-या संभोगाबद्दलचे लैंगिक संबंध, त्यांच्यातील समानतेची भावना हेही पाहून व ऐकून आश्चर्य वाटते.
४. जुनुन के बढते कदम (दिग्दर्शक – गौहर रजा)
जगाला वांशिक संहार हा काही नवीन नाही. जर्मनीमधील ज्युंच्या हत्याकांडापासून ते गोध्रा – मुज्जफरनगर दंगली पर्यंत इतिहास हा वांशिक संहाराच ध्वनित करतो. भारतामध्ये हिंदू किंवा मुस्लिम धर्मातील मूलतत्ववादी लोक एकमेकांना संपविण्यासाठी योजनाबद्ध कार्यक्रम राबवताना दिसतात. ते दंगली घडवतात, बॉम्बस्फोट करतात, लोकांना धर्मांध बनविण्यासाठी प्रशिक्षण देतात, तरूणांचा बुद्धीभेद करून त्यांना धार्मिक कट्टरतेचे बाळकडू देतात. अशाप्रकारे काम करणा-या शेकडो संघटना भारतामध्ये आहेत. ‘जुनून के बढते कदम’ या वास्तवपटामध्ये दिग्दर्शक गौहर रजा यांनी धार्मिक संघटना भारतामध्ये वांशिक – धार्मिक व जातीय संघर्ष वाढीस लावण्यासाठी कशा पद्धतीने कार्यरत आहेत, याचे समर्पक चित्रण केलेले आहे.
५. द फायर विदीन (दिग्दर्शक – श्रीप्रकाश)
भारतामध्ये कोळसा खाणीशी संबंधीत अनेक जीवघेण्या घटना घडलेल्या आहेत. कोळसा खाणीत काम करणा-या कामगारांचे जीवन म्हणजे जिवंतपणे राख झालेले जीवन होय. काळवंडलेले चेहरे, उदास जीवन आणि खाण माफियांचा धाक व अन्याय-अत्याचार हे खाण कामगार म्हणून काम करणा-या लोकांच्या जीवनात सातत्याने घडते. याचे भयानक चित्रण अनेक चित्रपटातही आलेले आहेच. पण अत्यंत वास्तवपणे चित्रण श्रीप्रकाश यांनी ‘दि फायर विदीन’ या वास्तवपटात केलेले आहे. खाणीतील गुदमरणारा श्वास, धुळ, फुफ्फुसाचे रोग, प्रचंड प्रमाणातील खाणीतील उष्णता, घातक रसायने यामुळे होणारे चर्मरोग याचे यथार्थ चित्रण श्रीप्रकाश यांनी आपल्या वास्तवपटात केलेले आहे.
६. जरीमरी ऑफ क्लॉथ अँड अदर स्टोरीज (दिग्दर्शक – सुरभी शर्मा)
सुरभी शर्मा यांनी आपल्या वास्तवपटामध्ये मुंबईतील कामगारांच्या दयनीय स्थितीबद्दलचे चित्रण केलेले आहे. जरीमरीमध्ये मुंबईतल्या संघटीत कामगारांचा असंघटीत क्षेत्राकडे होणारा प्रवास चित्रीत केलेला आहे. कामगारांच्या आठवणी व त्यांचे दु:ख मुलाखतीतून पुढे येत राहते. कामाचे अधिकाधिक तास, अत्यंत कमी रोजगार व पिळवणूक याचे चित्रण या वास्तवपटात येते. लहानांपासून ते म्हाता-यांपर्यंत काही न काही पिळवणूक व शोषण असणारे काम लोक करत राहतात, याचे वास्तव चित्रण सदर वास्तवपटात येते.
७. रिमेन्स ऑफ यस्टरडे (दिग्दर्शक – शाजी डॉमनिक)
भारतामध्ये १९७५ ते १९७७ दरम्यान इंदिरा गांधी प्रधानमंत्री असताना आणीबाणीची अंमलबजावणी केलेली होती. या दरम्यान भारतामध्ये राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वातावरण पूर्णतः ढवळून निघाले. ‘रिमेन्स ऑफ यस्टरडे’ या वास्तवपटामध्ये शाजी डॉमनिक या केरळच्या पत्रकाराने आणीबाणीच्या दरम्यान तुरूंगातून अदृष्य झालेल्या सहा तरूणांची कथा मांडलेली आहे. सदर वास्तवपटामध्ये लबाड, ढोंगी, सत्तापिसासू, राजकीय व्यवस्थेबद्दल निराशा व्यक्त करतो. कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखालील दडपशाही, तरूणावरील नक्षलवादाचे खोटे आरोप, सामान्य, गरीब लोकांचे भरडले जाणे आणि तरीही लोकशाहीवर देशावर प्रेम करायला सांगणा-या ढोंगी व्यवस्थेवर हा वास्तवपट अत्यंत मार्मिक पद्धतीने भाष्य करतांना दिसून येतो.
८. तू जिंदा है (दिग्दर्शक – शबनम वीरमणी)
मध्य प्रदेशातील बस्तर आणि बाजूच्या जिल्हयामध्ये स्त्रीयांसाठी ‘एकता परिषद’ नावाची संघटना काम करते. जाचाला कंटाळलेल्या, व्यवस्थेमधून तावून सुलाखून निघालेल्या स्त्रीयांच्या कथा व्यस्था ‘तू जिंदा है…।‘ या वास्तवपटात दिग्दर्शिकेने अत्यंत प्रभावीपणे चित्रित केलेल्या आहेत. आपल्या सभोवताली असलेली एकांगी व अन्यायकारक समाजव्यवस्था बदलण्यासाठी सदर स्त्रीया काम करताना दिसतात. आपल्या जीवनात वाटयाला आलेली दु:ख त्या एकमेकींना सांगतात आणि ते वाटून घेवून त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करतात. वास्तवपटातील स्त्रीयांचे दु:ख पाहून वेदना तर होतातच पण आपल्या आयुष्यातले दु:ख विसरुन पिडीत भगिनीसाठी काम करताना त्यांचा आत्मविश्वास ओसंडून वाहताना दिसतो.
९. येरवडा सेंट्रल प्रिझन (दिग्दर्शक – अंजली मॉन्टेरो व के.पी. जयशंकर)
अंजली मॉन्टेसे आणि के.पी. जयशंकर हे दोघे मुंबई येथील ‘टाटा इन्स्टीटयुट ऑफ सोशल सायन्सेस’ मध्ये माध्यमाशी निगडीत विभागात प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. ‘येरवडा सेन्ट्रल प्रिझन’ या वास्तवपटात पुणे येथील येरवडा कारागृहात कविता लिहिणा-या कैद्याच्या कवितांच्या आधारे हा वास्तवपट व्यथा सांगत राहतो. कारागृहातील कैदी आपापल्या व्यथा कवितेच्याद्वारे मांडत राहतात आणि दिग्दर्शक अत्यंत कल्पकतेने त्यांच्या चेह-यावरील भाव, अवतीभवतीचे गंजलेले वातावरण आणि ९५ टक्के कैद्याच्या मनातील अपराधीपणाची भावना टिपत राहतात. बहुतेक सर्वच कैद्यांच्या हातून घडलेले गुन्हे हे तत्कालीक रागातून घडलेले आहेत, आणि त्यांचे दु:ख त्यांना आहे. त्याचा पश्चातापही कैद्यांना कसा होतोय हे त्यांच्या बोलण्यातून कवितांमधून दिग्दर्शकांनी अत्यंत प्रभावीपणे मांडलेला आहे.
१०. बुध्दा विप्स इन जादूगोडा (दिग्दर्शक – श्री प्रकाश)
भारतामधील झारखंडमध्ये युरेनियमच्या खाणी आहेत. जादूगोडा या ठिकाणी युरेनियमवर प्रक्रिया करणारे केंद्रही आहे. युरेनियम हे किरणोत्सर्गी धातू अर्थात खनिज आहे. युरेनियमच्या प्रयोगामुळे व संपर्कामुळे मानवी जीवनावर काय परिणाम होऊ शकतो हे जपानवरील अणुबॉम्ब हल्यानंतर तिथे जन्मलेली बालके व कॅन्सरग्रस्त लोक यावरुन स्पष्ट होते. जादूगोडा येथे खाणीत काम करणा-या आदीवासींची परिस्थितीही फारशी वेगळी नाही. यातील कामगार हे कोणतेही संरक्षक कवच न बाळगता काम करताना दिसतात. त्यातील बहुतांश कामगार हे कॅन्सरनेच मरतात. पण त्यांच्या मरणाकडे शासन, भांडवलदार किंवा कंत्राटदार यापैकी कोणाचेही लक्ष नसल्याचेच दिसून येते. या कामगारांच्या अपत्यांवरही मोठा परीणाम होतो. ते मंदबुध्दीचे, विकलांग व कमजोर जन्माला येतात. हे वास्तव किती भयानक आहे हे सदर वास्तवपटातून प्रकर्षाने दिसून येते.
-डॉ. बापू चंदनशिवे
माजी विभाग प्रमुख
संज्ञापन अभ्यास विभाग
(Mass Communication)
न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहिल्यानगर

By satta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *