वाल्मिक कराड याची चौकशी सीआयडी
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर या हत्येसंबधी खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या वाल्मिक कराड याचे कारनामे दररोज बाहेर येत आहे. वाल्मिक कराड याची चौकशी सीआयडी (CID) करीत आहे.
या प्रकरणात नवीन माहिती समोर येत आहे. वाल्मिक कराडला अटक होण्यापूर्वी त्याच्यावर 14 गुन्हे दाखल असतानाही त्याची एका सरकारी समितीवर नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.
बीडचे तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारशीवरून वाल्मिक कराडला शासकीय समितीवर घेण्यात आलं होतं. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना लोकसभा निवडणुकीनंतर राज्य सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशीसंबंधित काम वाल्मिक कराडला देण्यात आलं होतं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या परळी मतदारसंघाच्या समिती अध्यक्षपदी वाल्मिक कराड होता. याबाबत आजही वाल्मिक कराडच्या फेसबुक पेजवर उल्लेख आहे.
त्याच्यावर 14 गुन्हे दाखल असतानाही त्याची सरकारी समितीवर नियुक्ती कशी झाली, अशी विचारणा आता करण्यात येत आहे. यामुळे नव्या वादाचा तोंड फुटलं आहे. बीड जिल्हा नियोजन समितीचा तो सदस्य होता.
गुन्हे दाखल असलेले कराड याच्या समितीवर झालेल्या नियुक्त्यांबाबत आता तो अटकेत असताना चर्चा सुरु झाल्या आहेत. या प्रकरणात कराड याची चौकशी होणार का, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.