वास्तवपट निर्मिती प्रक्रिया

‘माहितीपट’ या मराठी शब्दाचे इंग्रजीतील भाषांतर ‘डॉक्युमेंटरी’ असे आहे. माहितीपटातून माहिती मिळणे अभिप्रेत आहे. पण आज माहितीपट हा केवळ माहिती देणारा, कंटाळवाणा, एकसुरी आणि कोरडा माध्यम प्रकार राहिलेला नाही. तो अधिक सृजनशील आणि कलात्मक झालेला आहे. त्यामुळे माहितीपट हे भाषांतर आज पूर्णपणे अचूक वाटत नाही. मुंबई येथील फिल्म डिव्हीजनचे माहितीपटकार पुरूष बावकर यांनी त्यांच्या ‘अनुबोधपट : काल आणि आज’ या पुस्तकात माहितीपटाला ‘अनुबोधपट’ असा प्रतिशब्द वापरला आहे. अनुबोधपट हा शब्द ‘संदेश’ किंवा ‘बोध’ घेण्याशी निगडीत आहे. हेही तितकेच अक्षेपाहार्य आहे. कारण प्रत्येक माहितीपटातून बोध किंवा काही सकारात्मक किंवा नकारात्मक संदेश मिळतोच असे नाही. तर माहितीपटकार माहितीपटात वस्तुनिष्ठ पद्धतीने वास्तव मांडत असतो. म्हणजेच माहितीपट हा केवळ माहिती देत नाही किंवा त्याच्यातून प्रत्येकवेळी बोध होईलच असेही नाही. उदाहरणार्थ, हिस्टरी किंवा नॅशनल जिओग्राफी आदी वाहिन्यावरून प्रसारित माहितीपट हे केवळ माहिती देत नाहीत किंवा ते बोधपर काही संदेशही प्रत्येकवेळी देत नाहीत. तर ते माहितीपट वास्तव दाखवत असतात. कोणताही माहितीपट घटना, प्रसंग, व्यक्ती, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, पर्यावरणीय स्थिती आदी बाबतचे वास्तव प्रेक्षकांच्या समोर मांडतो. त्यामुळे माहितीपटाला ज्या पद्धतीने ‘माहितीपट’ किंवा ‘अनुबोधपट’ असे शब्द आहेत, तरीही या शब्दांची अधिक व्यापकता दर्शविण्यासाठी ‘वास्तवपट’ अधिक संयुक्तिक वाटतो. हा शब्द वस्तुनिष्ठता आणि वास्तव दर्शवितो. तो रियालीटी (Reality किंवा Real-Film) या इंग्रजी भाषेतील शब्दाचा मराठी प्रतिशब्द आहे. हे शब्द केवळ डॉक्युमेंटेशन दर्शवित नाहीत तर कोणत्याही प्रकारच्या वास्तवाशी किंवा ख-या गोष्टीशी निगडीत आहेत. त्यामुळे ‘माहितीपट’ किंवा ‘अनुबोधपट’ या शब्दाला प्रतिशब्द ‘वास्तवपट’ हा अधिक समर्पक असल्याचे दर्शवितो आहे.
जगात घडलेली किंवा घडत असणारी कोणतीही वास्तव घटना काळ आणि वेळेचा विचार करून वस्तुनिष्ठ, कलात्मक, सर्जनशील व रंजक पद्धतीने ज्या दृकश्राव्य माध्यमातून प्रेक्षकांसमोर सादर केली जाते, त्यास ‘वास्तवपट’ असे म्हणतात. वास्तवपट हा शब्द वास्तवाशी नाते सांगतो. वास्तव कायमच गंभीर असू शकत नाही. त्यामुळे माहितीपट या शब्दाऐवजी ‘वास्तवपट’ शब्द अधिक योग्य वाटतो. कोणतीही वास्तव घटना मांडणारे माध्यम म्हणून आपण वास्तवपटाकडे पाहू शकतो. आज आपण एम. एस. धोनी, २६/११, गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. प्रकाश बाबा आमटे आदी चित्रपट हे वास्तवपटच आहेत. त्याच बरोबर अतुल पेठे यांचे कचरा कोंडी व सेझ, आनंद पटवर्धन यांचे राम के नाम, जयभीम कॉम्रेड आदिही वास्तवपटच आहेत. हे वास्तवपट पाहिल्यास वास्तवाची जाणीव होतेच पण ते केवळ माहिती सांगणारे नव्हते. वास्तव अधिक ठळक व अधिक कलात्मक पद्धतीने सांगितले जाते.
वास्तवपट निर्मितीसाठी महत्त्वाचे घटक
१.चित्रण: व्यक्ती, ठिकाण, विविध गोष्टी, शब्द इ.
२.आवाज / ध्वनी: कथन, वेगवेगळे ध्वनी, संगीत, ध्वनी प्रभाव, पार्श्व आवाज
३.संकलन: आवाज आणि चित्रण याचा मेळ / संयोग वरील किमान महत्त्वाच्या बाबी हया वास्तवपट निर्मितीसाठी आवश्यक आहेत. वास्तवपट निर्मितीच्या संबंधित व्यक्ती: वास्तवपट निर्मितीसाठी अनेक व्यक्तींची आवश्यकता असते. त्यातील काही महत्त्वाच्या व्यक्ती पुढीलप्रमाणे.
४.कार्यकारी निर्माता – वास्तवपट निर्मितीवर प्रत्यक्ष नजर ठेवतो व खर्च करतो.
५.निर्माता – वास्तवपट निर्मितीला संपूर्ण जबाबदार
६.संशोधक – वास्तवपट चित्रीकरणापूर्वी वास्तवपटासंदर्भात सर्व तथ्ये जमवतो.
७.लेखक – वास्तवपटाची संहिता तसेच आवश्यक असल्यास कथन लिहितो.
छायाचित्रकार – संपूर्ण वास्तवपटाचे छायाचित्रण करतो.
९.संकलक – अत्यंत अवघड असे संकलनाचे काम तो करतो.
१०.कलाकार – विशेषत: डॉक्युड्रामा किंवा डॉक्यु-फिक्शन या वास्तवपट प्रकारासाठी कलाकारांची आवश्यकता असते.
११.दिग्दर्शक – चित्रपटाप्रमाणेच वास्तवपटाचे तो दिग्दर्शन करतो.
वास्तवपट निर्मितीच्या प्रकारानुसार किंवा विषय मांडणीच्या पध्दतीनुसार एकूण सहा प्रकार पडतात.
१. एक्स्प्लोरेटीव्ह वास्तवपट
या प्रकारामध्ये एखादा व्यक्ती पडदयावर जे काही दिसत आहे, त्याबद्दल अधिक माहिती किंवा त्या दृष्यांचे विश्लेषण करुन प्रेक्षकांना सांगत असतो. म्हणजेच सदर प्रकारच्या वास्तवपटासाठी कथन हा महत्त्वाचा भाग असतो. उदा. ‘प्रकाशवाटा’ नावाचा वास्तवपट.
२. निरीक्षणात्मक वास्तवपट
या प्रकारच्या वास्तवपटामध्ये विषयाला अनुसरुन जे दिसते आहे ते सर्व चित्रित केले जाते. अत्यंत कमी सुचना, प्रकाश योजनेचा नगण्य वापर, तसेच पुढे जे घडतंय त्याबद्दल कोणतीही त्यांना एखादी गोष्ट अशीच करा अशी न दिलेली सुचना या बाबी लक्षात घेवून याचे चित्रिकरण केलेले असते. यामध्ये ज्यांच्यावर वास्तवपट बनवतो आहोत, त्यांना कोणत्याही पूर्वसूचना न देता चित्रण करण्यात येते, आणि तसेच ते पडदयावरही येते. उदा. आनंद पटवर्धन यांचा ‘जयभीम कॉम्रेड’ हा वास्तवपट.
३. सहभागी/सहभागात्मक वास्तवपट
अशा प्रकारच्य वास्तवपटामध्ये वास्तवपट दिग्दर्शक/ निर्माता हा सातत्याने वास्तवपट निर्मितीच्या प्रक्रियेत स्वत: दिसतो. तो विषयाला अनुसरुन पुढील व्यक्तीस प्रश्न विचारतो, आपले अनुभव सांगतो आणि त्यांनाही सांगायला लावतो. या पध्दतीचा वास्तवपट हा जास्त वस्तुनिष्ठ आणि प्रत्यक्ष पुराव्यावर लोकांना विश्वास ठेवायला मदत करतो. उदा. ‘इंडिया अनटच्ड’ हा स्टॅलिनचा के. वास्तवपट.
४. सादरीकरणात्मक वास्तवपट
विशेषत: आत्मकथनात्मक वास्तवपटांचा समावेश या प्रकारात होतो. यामध्ये भावनात्मक विषय मांडला जातो. विषयाला अनुसरुन वेगवेगळया लोकांनाही त्या ठिकाणी सादर केले जाते. त्यांच्या मुलाखती घेतल्या जातात. उदा. ‘बबई’ हा वास्तवपट.
५. काव्यात्मक वास्तवपट
एखादया ऐतिहासिक गोष्टीचे गाणी, ताल आणि भावना याच्या माध्यमातून मांडणी केली जाते. यामध्ये लयबद्धता व संगिताचा वापर केला जातो. उदा. अतुल पेठे यांचा ‘बहिणाई’ हा वास्तवपट.
वास्तवपट निर्मिती प्रक्रिया
वास्तवपट किंवा चित्रपट निर्मिती प्रक्रियांमध्ये बरेचसे साम्य आहे. संहिता, निर्माता, संशोधक, लेखक, छायाचित्रकार, संकलन, दिग्दर्शक तसेच डॉक्युड्रामा या प्रकारासाठी कलाकारांचीही आवश्यकता असते. डॉक्यु-फिक्शन/ डॉक्युड्रामा प्रकार वगळता कोणत्याही प्रकारचे अवास्तव किंवा काल्पनिक सेटची आवश्यकता नसते.
वास्तवपट किंवा चित्रपटाची पटकथा / संहिता
पटकथा म्हणजे नाटक, चित्रपट किंवा दूरचित्रवाणी कार्यक्रमाची लिखित साहित्य होय. विशेषत: चित्रपटाची संहिता / पटकथा म्हणजे संवाद आणि सेटचा विचार करुन भूमिकांचे केलेले वर्णन होय. पटकथा किंवा संहिता हे चित्रपट, वास्तवपट किंवा दूरचित्रवाणी कार्यक्रमासाठीचे लेखन होय. हे लेखन स्वत:चे मूळ काम असते किंवा इतर लिखित साहित्यावरुन माध्यामांवर (अॅडाप्शन) केलेले असते. पटकथेमध्ये हालचाली, घटना, भावभावना तसेच संवाद वर्णनात्मक / कथनात्मक पध्दती लिहिलेले असतात. दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमाच्या लिहिलेल्या पटकथेला ‘टेले प्ले’ असे म्हणतात.
२. चित्रपट व वास्तवपट संहिता व संशोधनातील मूलभूत फरक
वृत्तपत्रसाठी केलेले लेखन हे चित्रपट, मालिका व वास्तवपटसाठी केलेल्या लेखनापेक्षा वेगळे असते. वास्तवपट हा वस्तुस्थिती व सत्य मांडतो आणि हीच त्याची प्रमुख ताकद आहे.
३. चित्रपट हे दृष्य माध्यम
चित्रपट पाहताना प्रेक्षक लेखकाने लिहिलेली पटकथा किंवा त्यातील शब्द पाहत नसतो, हे फक्त दृश्य आणि आवाज पडदयावर बघत असतो. पटकथा लेखकाचे सर्वात महत्त्वाचे कौशल्य म्हणजे त्याने दृष्यात्मक पध्दतीने लिहिले पाहिजे. म्हणजेच पटकथा लेखकाला जे सांगायचे असते ते कसे दृष्यात्मक होईल याची काळजी पटकथा लेखक घेत असतो.
४. चित्रपटाला गती असते.
पडदयावरील दृश्ये ही सातत्याने हालणारी असतात. त्या छायाचित्रासारख्या एकाच जागेला थांबलेल्या नसतात. म्हणजेच पटकथा लेखक हा चित्रपटाची कथा ही गतीशील पध्दतीनेच लिहित असतो. म्हणजेच कथानक पुढे जात असते.
५. कधी न बघितलेल्या बाबी चित्रपट दाखवतो
पटकथा लेखक हा ब-याचवेळा माणसाने न अनुभवलेले किंवा कमी प्रमाणात अनुभवलेले प्रसंग मांडण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी तो कल्पनेचा उपयोग करतो. पण कल्पनेला वास्तवाची साथ असतेच.
६. चित्रपट हा वेळ आणि जागा यांच्या पुढे जातो
चित्रपट हा प्रेक्षकांना वेळ आणि जागा यांच्या बंधनात आडकवत नाही. प्रेक्षक ज्या स्थितीत आहेत त्याच्याही पलिकडील चित्रपट दाखवतो. चित्रपट पटकथा लेखकाने जीवनाबद्दलची गोष्ट अत्यंत वेगळया पध्दतीने व वेगळया ढंगात सांगितली पाहिजे. तसा त्याचा पटकथेतून प्रयत्न असतो.
७. चित्रपटाला एक विषय असतो.
कॅमे-यातून कथा उलघडत असते. कॅमेरा हाच पटकथेला योग्य दिशेला घेऊन जातो. तो विषयावर केंद्रीकरण करतो. जे सांगायचे आहे, ते दाखविण्यासाठी विषय महत्त्वाचा असतो.
८. चित्रपट त्याचा प्रेक्षक निवडतो
जशी चित्रपटाची कथा असते, त्याला अनुसरुनच त्याचा एक प्रेक्षकवर्ग असतो, हे पटकथा लेखकाने ध्यानात ठेवले पाहिजे. पटकथेमध्ये वैविध्य तर असावेच लागते, पण चित्रपट बघणा-यांना ही आपलीच कथा आहे असे वाटले पाहिजे व शेवटी तसा आनंदही मिळाला पाहिजे.
९. चित्रपटाचा कॅमेरा वास्तव दाखवतो
चित्रित केलेले चित्रण (फुटेज), हे कॅमे-याला जे दिसले तेच असते, चित्रण केलेल्या कोणत्याच बाबी लपवता येत नाहीत, त्या खोटया नसतात. कॅमे-याला जे दिसले ते सर्व काही प्रेक्षकांना दिसू शकते. त्यामुळे दिग्दर्शक त्याला जे दाखवायचे आहे तेवढेच चित्रित करण्यास सांगतो बाकी कॅमे-यापासून लपवून ठेवता येते.
१०. चित्रपट हा मुलत: दृकश्राव्य तर असतोच पण तो रंगीत ही असतो
चित्रपट म्हणजे केवळ हलणा-या किंवा पुढे सरकणा-या प्रतिमा नसतात. तर त्यांच्या सोबत आशय व आवाज आणि प्रतिमांचे योग्य रंग असतात. जाणीवपूर्वक वापरायचे रंग, आवाज व दृष्ये याबाबत पटकथालेखक आपल्या पटकथेमध्ये लिहू शकतो / लिहित असतो.
११. वेगवेगळया भावभावनांचे दर्शन घडवू शकतो
दिग्दर्शक चित्रपट किंवा वास्तवपट यामध्ये प्रेक्षकांनाही सामिल करुन घेतो. ते पाहून प्रेक्षक भावनिक बनतात, रडतात, त्यांना राग येऊ शकतो. तसेच चित्रपटातून मानवी मूल्याच्या जपवणूकीचा संदेशही घेवून जावू शकतात. अशा प्रकारे चित्रपटाची संहिता / पटकथा ही कल्पना व वास्तव याचे मिश्रण असते. पण या कल्पनेला मानवतेची, त्याच्या भावभावनांची जोड दयावीच लागते.
-डॉ. बापू चंदनशिवे
माजी विभाग प्रमुख
संज्ञापन अभ्यास विभाग
(Mass Communication)
न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहिल्यानगर
माजी विभाग प्रमुख
संज्ञापन अभ्यास विभाग
(Mass Communication)
न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहिल्यानगर