शासकीय नोकरी घोटाळा 
नमस्कार आज आपण मोठ्या प्रमाणात फसवणुकीच्या बातम्या पाहत असतो. मग ती फसवणूक कोणत्याही क्षेत्रात असो. तसेच आज नोकरीसाठी मोठे कॉम्पिटिशन निर्माण झाले आहे.  त्यामुळे प्रत्येक जण नोकरीच्या शोधात आहे. अशातच काहीजण नोकरी लागण्यासाठी एजंट लोकांना पैसे देतात. तर एजंट लोकही त्यांना नोकरी लावून देण्याचं अमिष दाखवतात.नोकरी लावून देण्याचे काम करणारे एजंट सर्व क्षेत्रात दिसतात. नोकरीचे आमिष दाखवून पैसे लुटण्याचा प्रकार बुलढाणा जिल्ह्यामध्ये समोर आला आहे.
चला तर पाहू नक्की प्रकरण काय आहे?
बुलढाणा जिल्हा आणि प्रशासनाचे मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरात शासकीय नोकरीचा महाघोटाळा उघडकीस आला आहे.भपकेबाज वागणूक, बोलणे, मंत्रालयाचे बनावट शिक्के, नियुक्तीपत्रे याचा वापर करीत चौघा जणांनी तब्बल ६२ जणांना शासकीय नोकरी लावून देण्याच्या नावाखाली जवळपास दोन कोटी रुपयांनी गंडवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
यामध्ये निलेश गवळी वय वर्ष 31, याने याची पत्नी कोमल,  वडील विजय आणि चुलत भाऊ अंकुश यांच्यासह नोकरीचा महाघोटाळा केला आहे. गवळी कुटुंबियांनी बनावट कागदपत्रे आणि खोट्या प्रतीक्षा यादींच्या आधारावर एक कोटी 96 लाख 67 हजार रुपयांची फसवणूक केली आहे.
नोकरी देण्याचे खोटे आमिष दाखवण्याचा प्रकार 2019 पासून चालू झाला होता. हे लोक नोकरीचे आमिष दाखवून  वेळोवेळी रोख, चेक व ऑनलाईन व्यवहारांद्वारे पैसे घेत होते. जिल्हाधिरी कार्यालयातील कनिष्ठ लिपिक आरोग्य सेवक तसेच इतर सहकारी पदांसाठीच्या खोट्या जाहिरातींद्वारे आरोपींनी लोकांना फसवले आहे. यासाठी त्यांनी शासकीय बनावट नियुक्तीपत्रे,  मंत्रालयाचे खोटे शिक्के आणि दस्ताऐवज तयार केला होता.
यासंदर्भात मुख्य तक्रारदार विश्वनाथ गव्हाणे आणि इतर फसवणुक झालेल्या लोकांनी पोलिसांना सांगितले की निलेश गवळी  याने मंत्रालयातील सचिव कक्ष अधिकाऱ्यांचे बनावट शिक्के तयार केले होते. परंतु पैसे भरल्यानंतरही नोकरी न मिळाल्याने अनेक पीडितांनी मंत्रालयाच्या फेऱ्या मारल्या. तरीदेखील मंत्रालयातून काहीच रिस्पॉन्स मिळाला नाही. त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झाली आहे. ही झालेली फसवणूक जवळपास दोन कोटीच्या घरात आहे.
या प्रकारामध्ये भरपूर लोक फसले गेल्याचे  बोलले जात आहे. परंतु इतर लोक अजून समोर आलेले नाहीत. तर बुलढाणा जिल्ह्यातील विश्वनाथ गव्हाणे यांनी निलेश गवळी यांच्याविरुद्ध तक्रार केली आहे. तर मंडळी नोकरी मिळत नाही म्हणून आम्ही नोकरी लावून देतो आम्हाला पैसे द्या अशा भुलथापा देणाऱ्या लोकांवरती विश्वास ठेवू नका.

By satta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *