नाटक माणसाला मानवतेच्या बाजूने उभे करते – अरुण कदम


राज्यस्तरीय सप्तरंग नाटय गौरव पुरस्काराचे वितरण
अहील्यानगर: नाटक ही जुनी कला असून नाटकाने कायम समाजातील सामाजिक, राजकीय प्रश्न हाताळले आहेत, नाटक माणसाला माणूसपण देते आणि व्यक्तीलामानवतेच्या बाजूने उभे राहायला प्रवृत्त करते, असे प्रतिपादन मुंबई येथील ज्येष्ठ नाट्यकर्मी अरुण कदम यांनी केले. अहिल्यानगर येथील सप्तरंग थिएटर्सच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय नाटय गौरव पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून कराड येथील ज्येष्ठ अभिनेते व नाटय लेखक श्रीनिवास एकसंबेकर व अभिनेत्री दया एकसंबेकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रत्ना वाघमारे होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सप्तरंग थिएटर्सचे अध्यक्ष डॉ. श्याम शिंदे यांनी केले. यावेळी त्यांनी सप्तरंग थिएटर्सच्या नाटय वाटचालीचा आढावा घेतला. सप्तरंगोत्सव सोहळ्याचे स्वागताध्यक्ष ज्ञानदेव पांडूळे यांनी एकूणच मराठी व अहील्यानगरच्या नाटय चळवळीचा मागोवा घेतला.
यावेळी सप्तरंग थिएटर्सच्या वतीने ज्येष्ठ कलावंत सन्मान दीपक ओहोळ व युवा कलावंत सन्मान कल्पेश शिंदे यांना देण्यात आला. याच बरोबर कला, साहित्य व शिक्षण क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविणारे उमेश घेवरिकर, प्रा. रवींद्र काळे, स्वानंदी भारताल, डॉ. नवनाथ येठेकर, सुनील गोसावी, राजन जहागिरदार, वाजिद शेख, आदींचा सन्मान यावेळी करण्यात आला. यावेळी डॉ. संतोष पोटे, वसंत बोरा, मोहिनीराज गटणे, अजयकुमार पवार, राजेंद्र चौधरी, प्रा. रावसाहेब भवाळ, हर्षल काकडे, सागर अधापुरे, भैय्या गंधे, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंदा शिंदे यांनी केले.


Leave a Comment