अहिल्यानगर: सत्यशोधक समाजाचे ४२ वे राज्यस्तरीय अधिवेशन ३० नोव्हेंबर व १ डिसेंबर २०२४ रोजी अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर ) येथे आयोजित होणार असल्याची माहिती या अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष उत्तमराव पाटील यांनी दिल. त्यासंदर्भात नियोजनाची बैठक रविवार दिनांक २० ऑक्टोबर रोजी नक्षत्र लॉन्स, बुरुडगाव रोड, अहमदनगर येथे माजी अध्यक्ष उत्तमराव (नाना )पाटील व सत्यशोधक समाज संघाचे अध्यक्ष अरविंद खैरनार यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
इबटा या शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष व सत्यधर्मीय विधीकर्ते उत्तरेश्वर मोहोळकर यांनी अधिवेशनाची भूमिका विशद केली. भारतातील तमाम शूद्रातिशूद्र यांना सांस्कृतिक सामाजिक, आर्थिक, मानसिक व शैक्षणिक गुलामीतून मुक्त करण्यासाठी राष्ट्रपिता जोतिराव फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. यावर्गाची अज्ञान, अंधश्रद्धा, शोषण, शेतकरी व मजुरांची होणारी पिळवणूक व गुलामगिरी नष्ट व्हावी यासाठी या सामाजिक संघटनेची स्थापना केली. या संघटनेमध्ये आतापर्यंत सावित्रीबाई फुले, नारायण मेघाजी लोखंडे, लहुजी साळवे, फातिमा शेख,सयाजीराव गायकवाड महाराज, केळुसकर गुरुजी, भास्करराव जाधव, राजर्षी शाहू महाराज, कृष्णराव भालेकर, बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, कर्मवीर भाऊराव पाटील, मुकुंदराव पाटील, पंजाबराव देशमुख आदी महापुरुषांनी योगदान दिले. स्वातंत्र्याला ७५ वर्ष होऊन गेलेत परंतु आज सुद्धा शूद्रातिशूद्र समाजाचे शोषण थांबलेले नसून उलट वेगवेगळ्या प्रकारे शोषण सुरूच आहे. आजही भारत देशाला सत्यशोधक समाजाच्या विचारांची आवश्यकता आहे. शोषणमुक्त समाज हेच सत्यशोधक समाज संघाचे ध्येय आहे. सत्यशोधक समाजाला १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नाशिक येथे समाजाचे ४१ वे राज्यस्तरीय अधिवेशन यशस्वीरित्या संपन्न झाले होते. तसेच ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जन्म गावी म्हणजे नायगाव जिल्हा सातारा येथे १० मार्च २०२४ रोजी राज्यस्तरीय पहिले महिला अधिवेशन यशस्वी करण्यात आले.
यानंतर ज्ञानदेव खराडे यांनी या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी विविध समित्यांची स्थापने संदर्भात चर्चा करण्यात आली.
सत्यशोधक समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते संजय गारुडकर यांनी कोणतीही चळवळ पुढे समर्थपणे घेऊन जाण्यासाठी तन-मन-धनाने काम करावे लागते असे सांगितले. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन या अधिवेशनात संदर्भात शेतकरी, सर्वसामान्य शेतमजूर व इतरांपर्यंत आपल्याला पोहोचावे लागेल आणि या अधिवेशनासाठी निधीही जमा करावा लागेल असे सांगितले. या राज्यस्तरीय अधिवेशनाची स्मरणिका काढण्यात येणार असून या स्मरणिकेच्या संपादनाची जबाबदारी प्रा. डॉ. सुधाकर शेलार, प्रा. डॉ. महेबूब सय्यद, मुंबई विद्यापीठाच्या प्रा. डॉ. वंदना महाजन व शेवगाव चे प्रा. डॉ. गजानन लोंढे यांनी स्वीकारली.
याप्रसंगी अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष उत्तमराव पाटील [तरवडी ] यांनीही अधिवेशन यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील शोषित, वंचित, शेतकरी, मजूर यांच्यापर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले. याप्रसंगी संयोजन समितीची जबाबदारी डॉ. गुलाबराव मंडलिक, रोहिदास पुंड, सचिन झगडे सर, अशोक शेवाळे, भानुदास बोराटे इत्यादींकडे सोपवण्यात आली. आबा लोंढे, रामचंद्र मंडलिक, संतोष बनकर, अशोक सब्बन, प्रा. चंद्रकांत राऊत, डॉ. बापू चंदनशिवे, ज्ञानदेव पांडूळे, विलास साठे, रघुनाथ अण्णा खामकर इत्यादी सदस्यांनी स्मरणिकेसाठी व अधिवेशनासाठी निधी जमा करण्याची जबाबदारी स्वीकारली. सत्यशोधक समाज संघाचे राज्याध्यक्ष अरविंद खैरनार यांनी मनोगत करताना सांगितले की, राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जन्मभूमीत तसेच भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हे अधिवेशन आयोजित करीत आहोत.
या नियोजनासाठी सत्यशोधकांचे भानुदास बापू बोराटे, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब जाधव, अ.भा.महात्मा फुले समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष अंबादास गारुडकर, प्रा .एल .बी. जाधव, रामचंद्र तसेच अहिल्यानगर, पारनेर, श्रीगोंदा, जामखेड, कर्जत, नेवासा, अकोले, श्रीरामपूर, राहुरी या तालुक्यातून मोठ्या संख्येने सत्यशोधक उपस्थित होते. रोहिदास पुंड यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.


By satta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *