देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी नवी दिल्लीत निधन झाले. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना गुरुवारी २६ डिसेंबर रोजी रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
डॉक्टर मनमोहन सिंग यांना भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक म्हणून ओळखले जाते. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ म्हणून देखील त्यांची जगभरात ओळख होती. देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांचा कार्यकाळ नेहमीच लक्षात ठेवला
चला तर पाहूया माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांची संपूर्ण कारकीर्द कशी होती.
डॉक्टर मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी श्री गुरुमुख सिंग यांच्या कुटुंबात झाला होता.
त्यावेळी त्यांचे गाव पाकिस्तानमधील गाह हे होते. भारत पाकिस्तान फाळणीच्या काळात त्यांचे कुटुंब भारतातील अमृतसर येथे आले. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी वाणिज्य मंत्रालयात सल्लागार, भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार, रिझर्व बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते ते भारताचे पंतप्रधान म्हणून काम केले आहे. पंतप्रधान म्हणून त्यांची कारकीर्द यशस्वी मानली जाते. कारण देशाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे.
डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे 14 वे पंतप्रधान मंत्री होते. डॉक्टर मनमोहन सिंग ३३ वर्षे खासदार होते. विद्वान, मृदू, मितभाषी आणि संवेदनशील नेता म्हणून मनमोहन सिंग यांच्याकडे पाहिले जायचे. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर ते पहिलेच असे पंतप्रधान होते, जे १० वर्षे देशाचा राज्यकारभार सांभाळू शकले. २००४ ते २०१४ असे दहा वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते. तसेच १९९८ ते २००४ या काळात ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेही होते. ३३ वर्षांपूर्वी म्हणजे १९९१ साली डॉ. मनमोहन सिंग यांनी राज्यसभेच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. चार महिन्यातच त्यांनी माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून शपथ घेतली होती.
चला तर पाहूया जागतिक स्तरावर डॉक्टर मनमोहन सिंग यांची अर्थतज्ञ म्हणून ओळख कशी निर्माण झाली होती.
पंजाब विद्यापीठातून त्यांनी 1952 साली पदवी मिळवली आणि 1954 मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. 1957 मध्ये केंब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्रात ऑनर्स पदवी मिळवली आणि 1962 मध्ये त्यांनी डी. फिल. नफिल्ड कॉलेज, ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी मिळवली. नंतर परदेशातून भारतात आल्यानंतर 1966 ते 1969 या काळात संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास परिषदेसाठी काम केलं.
1969 मध्ये मनमोहन सिंग हे दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्राध्यापक झाले. 1972 मध्ये ते वित्त मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार आणि 1976 मध्ये ते वित्त मंत्रालयात सचिव बनले. 1980 ते 1982 मध्ये ते नियोजन आयोगावर तर 1982 मध्ये त्यांची माजी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली देशातील सर्वात महत्वाच्या अशा रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी म्हणून करण्यात आली.
1985 ते 1987 पर्यंत देशाच्या नियोजन आयोगाचे ते उपाध्यक्ष होते. 1991 साली ते केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष बनले. तर 2004 ते 2014 या दहा वर्ष प्रदीर्घ काळ ते भारताचे पंतप्रधान होते. .
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना भारतातील आर्थिक सुधारणांचे जनक म्हटले जाते. कारण त्यांनी सुचवलेल्या धोरणांमुळे आर्थिक सुधारणांची दारे खुली झाली. खरे तर १९९१ मध्ये पी.व्ही. नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार स्थापन झाले तेव्हा डॉ. मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. देशाची आर्थिक स्थिती बिकट होती. परकीय चलनाचा साठा १ अब्ज डॉलर इतका कमी झाला. पूर्वीच्या चंद्रशेखर सरकारने तेल आणि खतांच्या आयातीसाठी ४० कोटी डॉलर उभे करण्यासाठी बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ जपानमध्ये ४६.९१ टन सोने गहाण ठेवले होते. याच काळात मनमोहन सिंग यांनी उदारीकरणाचे धोरण आणले.
२४ जुलै १९९१ हा दिवस भारताच्या आर्थिक स्वातंत्र्याचा दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाने भारतातील नव्या उदारमतवादी अर्थव्यवस्थेचा पाया घातला. डॉ. मनमोहन सिंग यांनी अर्थसंकल्पात परवाना राज संपवले होते.
अनेक निर्बंधांतून कंपन्या मुक्त झाल्या. आयात-निर्यात धोरण बदलले. ज्याचा उद्देश आयात परवाना शिथिल करणे आणि निर्यातीला प्रोत्साहन देणे हा होता. परकीय गुंतवणुकीचे मार्ग खुले केले . इतकेच नाही तर आयकर कायद्याच्या कलम ८० एचएचसीअंतर्गत सॉफ्टवेअर निर्यातीसाठी कर सूटही जाहीर केली. डॉ. मनमोहन सिंग यांची आर्थिक धोरणे इतकी आश्चर्यकारक होती की २ वर्षांत म्हणजे १९९३ मध्ये देशाचा परकीय चलनाचा साठा १ अब्जम्हणजे १९९३ मध्ये देशाचा परकीय चलनाचा साठा १ अब्ज डॉलरवरून १० अब्ज डॉलरपर्यंत वाढला. १९९८ मध्ये ते २९० अब्ज डॉलर्सवर पोहोचले होते. सिंग यांचे दुसरे मोठे यश म्हणजे अमेरिकेसोबतचा अणुकरार. जाने. २०१४ मध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी ही आपल्या कार्यकाळातील सर्वात मोठी उपलब्धी असल्याचे म्हटले होते.
मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीत त्यांना अनेक महत्वाचे पुरस्कार मिळाले. डॉ. मनमोहन सिंग यांना 1987 या काळात भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. त्यानंतर भारतीय विज्ञान कॉंग्रेस मध्ये देण्यात येणारा जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी सन्मान(1995), अर्थमंत्र्यांसाठी दिला जाणारा आशिया मनी अवार्ड (1993 आणि 1994), केम्ब्रिज विद्यापीठाचा अॅडम स्मिथ पुरस्कार (1996), केम्ब्रिजमधील सेंट जॉन महाविद्यालयात उल्लेखनीय कार्याबद्दल राईट पुरस्कार असे काही विशेष पुरस्कार मिळाले.
याशिवाय जपान निहोन कायझाई शिम्बूनसारख्या अनेक संस्थांनी डॉ. मनमोहन सिंग यांना सन्मानित करण्यात आले. केम्ब्रिज आणि ऑक्सफोर्डसारख्या अनेक विद्यापीठांकडून डॉ मनमोहन सिंग यांना मानद पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. मनमोहन सिंग यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदा आणि संघटनांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी 1993 मध्ये सायप्रस येथे राष्ट्रकुल प्रमुखांच्या बैठकीत आणि व्हिएन्ना येथे मानवाधिकारावरील जागतिक परिषदेत भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले. मनमोहन सिंह यांनी 2004 ते 2009 असे दोन वेळा भारताचे पंतप्रधान पद भूषवले. लोकसभेची निवडणूक न जिंकणारे आणि राज्यसभेचे सदस्य असताना हे पद भूषविणारे ते पहिले पंतप्रधान होते. त्यांच्या कार्यकाळात आर्थिक विकास आणि सामाजिक नियोजनावर विशेष भर देण्यात आला.
असा एकूण डॉक्टर मनमोहन सिंग यांचा 92 वर्षांचा प्रवास राहिलेला आहे. शेवटी 26 सप्टेंबर 1932 रोजी जन्म होऊन त्यांची प्राणज्योत ही 26 डिसेंबर 2024 रोजी रात्री नऊ वाजून 51 मिनिटांनी मावळली.