झोमॅटो बॉयचे कपडे घालून चोरी
आपण आज ऑनलाईनच्या जमान्यात सर्व काहीवस्तू घरात बसून ऑनलाईन मागवत असतो. अगदी जेवणही आपण ऑनलाईन मागवतो. कोणतीही वस्तू ऑनलाईन मागवताना आपण आपल्या पूर्ण घराचा पत्ता देतो. जरी आपण सोसायटीमध्ये राहत असलो तरी देखील झोमॅटो स्विगी सारख्या कंपनीचे डिलिव्हरी बॉय फ्लॅट पर्यंत पार्सल घेऊन येतात.परंतु आपल्यापर्यंत येणाऱ्या व्यक्ती हा खरंच चांगला आहे का? आपण आपले पार्सल हे आपल्या फ्लॅट पर्यंत न बोलवता सोसायटीत खाली बोलावले आणि आपण आणायला गेलो तरी चालते परंतु आपण तसे करत नाही. त्यामुळे अशीच एक घटना घडली आहे पुण्यामध्ये. ज्यामध्ये झोमॅटो कंपनीचे कपडे घालून चोर वेगवेगळ्या सोसायटीमध्ये रेखी करत होता आणि त्यानुसार नंतर तो फ्लॅटमध्ये जाऊन चोरी करत असे.
चला तर पाहूया नक्की प्रकरण काय आहे ? झोमॅटो बॉय चे कपडे घालून हे नक्की कसे चोरी करत होते आणि लोकांना पोलिसांना कसे गुंगारा देत होते.
पुणे येथील स्वारगेट मध्ये मागील महिन्यात १९ डिसेंबरला सॅलसबरी पार्क येथील घरफोडीचा तपास स्वारगेट पोलीस (Swargate Police) करत असताना तब्बल १६०० ते १७०० सीसीटीव्हीटी तपासले. कारण सॅलसबरी पार्क येथे चावीचा वापर करुन घरातील लाकडी कपाट उचकटून त्यामधील २९ तोळे सोन्याचे दागिने, २० तोळ्यांची सोन्याची लगड, साडेचार किलो वजनाचे चांदीची लगड असा लाखोंचा ऐवज चोरुन नेला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांनी १६०० ते १७०० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. पोलिसांना त्यांच्या बातमीदारांकडून माहिती मिळाली की, ही घरफोडी करणारे उंड्री येथे लपून रहात आहे. पोलिसांनी उंड्री परिसरातून गणेश काठेवाडे याला १ जानेवारी रोजी अटक केली. गणेश कोठावडे सोबत त्याचे मित्र सुरेश पवार आणि मध्यस्थी भीमसिंह राजपूत हे तिघे एकत्र काम करत असत.
गणेश काठेवाडे हा राहणार मुखेड जिल्हा नांदेड आणि सुरेश बबन पवार राहनार अंबरवेड, तालुका मुळशी आणि मध्यस्थ भिमसिंग ऊर्फ अजय करणसिंग राजपूत हे तिघे मिळून चोरी करत असे.गणेश कोठावाडे आणि सुरेश पवार यांची ओळख ही येरवडा येथील कारागृहात झाली होती. सुरेश पवार हा अंबर वेड गावाचा परंतु माजी उपसरपंच खून, खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात मोकका कारवाई अंतर्गत अटक करण्यात आलेली होती. तर दुसरा गणेश कोठावाडे एटीएम फोडणे, दरोडा, घरफोडी, जबरी चोरी, वाहनचोरी असे ५५ गुन्हे असलेल्या गुन्हेगारावरही मोक्का कारवाईने येरवडा कारागृहात आलेला. कारागृहात त्यांच्यात मैत्री झाली. दोघेही जामीनावर सुटल्यावर पुण्यात घरफोडीचे गुन्हे करुन लागले.
यामध्ये गणेश काठेवाडे याने काही महिने झोमॅटो डिलिव्हरी बॉय म्हणून काम केले. त्यानंतर तो झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा ड्रेस घालून सोसायट्यांमध्ये जाऊन रेकी करत असे. त्याने विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ घरफोड्या केल्या़ स्वारगेट एस टी स्टँड येथे ७ चोरया केल्याचे सांगितले. तसेच चोरी केलेले दागिने सुरेश पवार याच्याकडे द्यायचा . सुरेश पवार ते दागिने घेऊन वेगवेगळ्या सोनार दुकानदाराकडे जायचा. गणेश काठेवाडे याने दिलेले चोरीचे सोने चांदी त्याने पुणे शहरातील विविध सोनार यांचेकडे ठेवून वेगवेगळी कारणे सांगून त्याबदल्यामध्ये त्यांच्याकडून पैसे घ्यायचा. या व्यवहारामध्ये सोने विक्री करणारा व्यवसायिक भिमसिंग राजपूत (नथवाला) याने मध्यस्थी केली. वेगवेगळी कारणे देऊन तो सराफांकडे दागिने गहाण ठेवून पैसे आणून पवारला द्यायचा.
तर गणेश काठेवाडे हा स्वत:ची ओळख लपविण्यासाठी उच्चभ्रु सोसायटीमध्ये झोमॅटो डिलिव्हरी बॉय म्हणून जाऊन रेकी करुन घरफोडी करत. पोलीस सीसीटीव्ही चेक करुन आपल्यापर्यंत पोहचू नयेत, म्हणून तो घरफोडी करण्याच्या ठिकाणी येताना ४० ते ५० किमीचा प्रवास छोट्या छोट्या गल्ल्यांमधून करुन जात असे. घरफोडी केल्यानंतरही स्वत:ची ओळख लपविण्यासाठी विविध जॅकेट, केसांचा विग, टोपी परिधान करुन वेशभूषा बदलत असे. चुकून सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये त्याचा चेहरा दिसला तर पोलिसांच्या तांत्रिक विश्लेषणातून तपास भरकटावा यासाठी तो मोबाईल फोन कानाला लावून बोलण्याची अॅक्टींग करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. चोरीच्या पैशांमधून गणेश कोठवाडे आणि सुरेश पवार हे कर्वेनगर भागामध्ये पॉश एरियामध्ये फ्लॅट घेण्याच्या प्रयत्नात होते. चोरीचे दागिन्यांमधून आलेले पैसे त्याने गोवा व इतर ठिकाणी मौजमजेसाठी उडवले. काही शेअर मार्केटमध्ये गुंतवले. तर सुरेश पवार यांनी तो राहतो तेथे घराच्या टेरेसवर त्याच्या संरक्षणासाठी त्याने दोन पिस्तूल पाच जिवंत काडतुसे ठेवली होती ती पोलिसांनी जप्त केली आहे.तसेच आतापर्यंत या गुन्हेगारांकडून एकूण 14 घरफोडी चे गुन्हे उघडकीस आले आहेत तर ८६ तोळे सोन्याचे दागिने, १५० हिरे, ३.५ किलो चांदी, १ दुचाकी वाहन, ०२ पिस्तूल, ०५ जिवंत राऊंड, व घरफोडी करण्यासाठी वापरण्यात आलेली शस्त्र असा १ कोटी रुपयांपेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तर मंडळी कोणतीही गोष्ट ऑनलाइन शॉपिंग करताना आपल्या घरापर्यंत कोणत्या डिलिव्हरी बॉय कसा आहे हे आपल्याला माहित नाही त्याची पार्श्वभूमी आपल्याला माहित नाही त्यामुळे शक्यतो आपलं पूर्ण घराचा पत्ता देण्यापेक्षा आपण आपला सोसायटीच्या पत्ता देऊन आपलं पार्सल गेटवर आणायला गेलेले कधीही चांगले. कारण हे लोक आपण दरवाजा उघडल्यानंतर ते त्यांच्या डोळ्यांनी आपले घर संपूर्ण स्कॅन करत असतात तसेच ते या फ्लॅटमध्ये किती लोक राहत असतील तसेच यांची परिस्थिती कशी असेल? याचा देखील अंदाज घेत असतात त्यामुळे आपण आपले पार्सल सोसायटीच्या गेटवर मागितलेले बरे. शक्यतो मोठ्या सोसायटीमध्ये कोणालाही आत मध्ये जाण्याची परवानगी नसते परंतु पार्सल घेऊन येणाऱ्या झोमॅटो, स्विगी, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यासारख्या कंपनीच्या डिलिव्हरी बॉय ला आत मध्ये जाण्याची परवानगी दिली जाते. त्यामुळे आता आपण सावध राहण्याची गरज आहे. तर मंडळी तुम्हाला काय वाटते डिलिव्हरी बॉय ला आपण आपल्या फ्लॅट पर्यंत बोलावले पाहिजे का हे आम्हाला कमेंट्स करून सांगा.