Site icon

अमरावती जिल्हा विधानसभा मतदारसंघ 2024, Amravati Assembly Elecction


आज आपण पाहणार आहोत विदर्भातील महत्त्वाच्या मतदारसंघांपैकी एक महत्त्वाचा मतदारसंघ तो म्हणजे अमरावती. अमरावती येथे एकूण आठ मतदारसंघ आहेत. मोर्शी, धामणगाव, अचलपूर, मेळघाट, दर्यापूर, तिवसा अमरावती,  बडनेरा अशी आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा संघर्ष पाहिला भेटणार आहे. चला तर पाहूया अमरावती येथील आठ विधानसभा मतदारसंघ येथे सध्या नक्की काय चालू आहे .अमरावती जिल्ह्यातील सर्वात पहिला विधानसभा मतदारसंघ येतो तो म्हणजे मोर्शी . हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. वरूड-मोर्शी विधानसभा मतदारसंघ क्रमांक ४३ आहे. मोर्शी-वरूड मतदारसंघात अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुका आणि मोर्शी तालुक्यातील अंबाडा, हिवरखेड, रिद्धपूर, मोर्शी ही महसूल मंडळे आणि वरूड नगरपालिका या क्षेत्राचा समावेश होतो.
मोर्शी-वरूड हा विधानसभा मतदारसंघ वर्धा लोकसभा मतदारसंघात मोडतो. स्वाभिमानी पक्ष पक्षाचे देवेंद्र महादेवराव भुयार हे वरूड-मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. 2009 मध्ये मोर्शी येथे अपक्ष म्हणून डॉक्टर अनिल सुखदेवराव बोंडे हे निवडून आले होते.  2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये अनिल बोंडे यांना भाजप पक्षाकडून तिकीट देण्यात आले.  2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाचे डॉक्टर अनिल सुखदेवराव बोंडे ७१,६११ मित्र मिळून मते मिळून विजयी झाले.  2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाचे डॉक्टर अनिल सुखदेवराव बोंडे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हर्षवर्धन देशमुख अशी लढत झाली होती.  2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप पक्षाचे अनिल बोंडे यांच्याविरुद्ध समाजवादी कामगार पक्षाचे देवेंद्र महादेवराव भुयार असे लढत पाहायला मिळाली. यामध्ये 2019 मध्ये भाजप पक्षाचे वातावरण असतानाही येथे समाजवादी कामगार पक्षाचे देवेंद्र महादेवराव भुयार हे तब्बल 96 हजार 152 मते मिळून यांनी येथे बाजी मारली.
तर भाजप पक्षाचे अनिल भोंडे यांचा इथे 9771 मतांनी पराभव झाला. त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप पक्ष इथे पुन्हा एकदा जोरदार तयारी करताना दिसत आहे. कारण भाजपच्या हातातून मोर्शी हा विधानसभा मतदारसंघ निसटलेला दिसत आहे. त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप पुन्हा एकदा अनिल बोंडे यांना संधी देणार की नवीन चेहरा देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे . कारण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार उमेदवार अमर शरदराव काळे यांनी वर्धा लोकसभा (एमपी) जागेवरून भारतीय जनता पक्षाचे रामदास चंद्रभानजी तडस यांचा पराभव करून 81648 मतांनी विजय मिळवला .त्यामुळे ते वातावरण पुन्हा एकदा महाविकास आघाडी कडून दिसत आहे. तर भाजपला येथे आता येणारी आगामी विधानसभा निवडणूक वाटते तेवढी सोपी जाणार नाहीये. तर आता महाविकास आघाडी कडून पुन्हा एकदा मोर्शी या ठिकाणी नवीन चेहरा देणार की समाजवादी पक्षाचे देवेंद्र महादेवराव भुयार यांना सपोर्ट करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आता पाहुयात दुसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे धामणगाव.  हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे.  धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघ क्रमांक ३६ आहे. धामणगाव रेल्वे मतदारसंघात अमरावती जिल्ह्यातील नांदगांव खंडेश्वर, चांदूर रेल्वे आणि धामणगांव रेल्वे या तालुक्यांचा समावेश होतो.  धामणगाव रेल्वे हा विधानसभा मतदारसंघ वर्धा लोकसभा मतदारसंघात मोडतो. भारतीय जनता पक्षाचे प्रताप अडसड हे धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. धामणगाव विधानसभा मतदारसंघापूर्वी मध्य प्रदेशात तिवसा मतदारसंघ असलेल्या या भागाने दहा लोकप्रतिनिधी दिले आहेत.  सन १९५१ मध्ये हा भाग मध्यप्रदेशात असताना भारतीय काँग्रेस पक्षाचे भाऊराव गुलाबराव जाधव हे दोन वेळा आमदार राहिले.  यानंतर पुंडलिक रामकृष्ण चोरे यांनी प्रतिनिधित्व केले. महाराष्ट्रात वºहाड प्रांत सहभागी झाल्यानंतर सन १९७२ मध्ये धामणगाव रेल्वे मतदारसंघ अस्तित्वात आला.  काँग्रेसचे शरद तसरे त्यावेळी विधानसभेत निवडून गेले.
 सन १९७८ मध्ये काँग्रेस पक्षाचे सुधाकर सव्वालाखे, तर सन १९८० मध्ये काँग्रेसचे यशवंतराव शेरेकर निवडून आले होते.  सन १९९० व १९९९ मध्ये भाजपचे अरुण अडसड यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले.  सन १९९५ मध्ये जनता दलाचे डॉ. पांडुरंग ढोले विजयी झालेत. सन २००४ पासून काँग्रेसचे वीरेंद्र जगताप यांनी हा मतदारसंघ आपल्याकडे सलग तीन टर्म ठेवला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा पक्षाचे अडसद प्रताप अरुणभाऊ 90,832 मते मिळवून विजयी झाले. काँग्रेस पक्षाचे जगताप वीरेंद्र वाल्मिक यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. विजयाचे अंतर 9,519 मते होती. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे जगताप वीरेंद्र वाल्मिक 70,879 मते मिळवून विजयी झाले. भाजपा पक्षाचे अडसद अरुणभाऊ जनार्दनराव यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. धामणगांव रेल्वे मतदारसंघाला चांदुर रेल्वे मतदरासंघ म्हणून सुद्धा ओळखले जाते.  या मतदारसंघाचे 2004 ते 2019 पर्यंत  इथे काँग्रेसचे आमदार वीरेंद्र जगताप हे प्रतिनिधित्व करीत होते. काँगेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या धामणगाव विधानसभा मतदारसंघाला 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रताप अडसर यांच्यामुळे सुरुंग लागला. आणि धामणगाव हा विधानसभा मतदारसंघ आता भाजप पक्षाच्या हाती आहे. त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आपला बालेकिल्ला पुन्हा आपल्याकडे आणण्यासाठी प्रयत्न करेल तर भाजप स्वतःची इथे टिकवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल त्यामुळे आता धामणगाव येथील मतदार कोणाला निवडून देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आता पाहूया तिसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे अचलपूर. अमरावती मधील अचलपूर हे सर्वात महत्वाचे आणि प्राचीन शहर म्हणून ओळखले जाते.  हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. अचलपूर विधानसभा मतदारसंघ क्रमांक ४२ आहे. अचलपूर मतदारसंघात अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुका आणि अचलपूर तालुक्यातील शिराजगांव कसबा, अचलपूर ही महसूल मंडळे आणि अचलपूर (न.पा.) या क्षेत्राचा समावेश होतो.  अचलपूर हा विधानसभा मतदारसंघ अमरावती लोकसभा मतदारसंघात मोडतो. प्रहार जनशक्ती पक्ष पक्षाचे बच्चू बाबाराव कडू हे अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. 2014 मध्ये बच्चू कडू यांच्या विरोधात भाजपचे अशोक बनसोड यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यावेळी अशोक बनसोडे यांचा पराभव 49,064 मतांनी पराभव झाला. आणि बच्चू कडू यांनी 2014 ला बाजी मारली.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत प्रहार जनशक्ती पार्टी पक्षाचे बच्चू बाबाराव कडु 81,252 मते मिळवून विजयी झाले. काँग्रेस पक्षाचे अनिरुद्ध उर्फ बबलूभाऊ सुभानराव देशमुख यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. विजयाचे अंतर: 8,396 मते. 2019 मध्ये प्रहार जनशक्ती पार्टी पक्षाचे बच्चू कडू हे फक्त 8396 एवढ्या मतांनी निवडून आले होते. अचलपूर व चांदूर बाजार असे दोन तालुके असलेला हा मतदारसंघ आहे.  स्वतंत्र राज्याच्या निर्मितीनंतर आतापर्यंत या मतदारसंघात १3 विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. विशेष म्हणजे या निवडणुकीत ६ वेळा मतदारांनी अपक्ष उमेदवारांना संधी दिली असल्याचे दिसून आले.  तर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे आमदार बच्चू कडू हे सलग तीन वेळेपासून या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत. अचलपूर मतदारसंघात १९६२ मध्ये पहिल्यांदा झालेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले माजी आमदार आमसाहेब वाटेणे यांना मतदारांनी संधी दिली होती.  त्यावेळी त्यांना ३० हजार १८४ मते मिळाली होती.  तर त्यांच्याविरुद्ध मैदानात असलेले काँग्रेसचे कृष्णराव देशमुख यांचा २ हजार १२८ मतांनी पराभव झाला होता. त्यांनतर आजपर्यंत अनेकदा या मतदारसंघाने अपक्ष उमेदवाराला नेतृत्व करण्याची संधी दिली आहे.
अचलपूर मतदारसंघात आजपर्यंत अपक्ष वेतिरिक्त तीन वेळा काँग्रेस,दोन वेळा भाजप व एकदा कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र मतदारसंघाचा इतिहास पहिला तर, मतदारांचा अपक्षांवरच अधिक विश्वास असल्याने विविध राजकीय पक्ष जनतेच्या पसंतीस खरे उतरले नसल्याचे चित्र पाहायला मिळते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ‘या’ मतदारसंघातील मतदार अपक्ष उमेदवाराला निवडणून देण्याचा इतिहास कायम ठेवणार किंवा बदल घडवणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आता पाहूया चौथा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे मेळघाट .मेळघाट महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात आहे. मेळघाट या शब्दाचा अर्थ ‘घाटांची बैठक’ असा होतो.  1974 मध्ये हे ठिकाण व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले. 1967 ते 1995 पर्यंत या जागेवर काँग्रेसने कब्जा केला होता असे म्हणायला हरकत नाही.  त्यानंतरच्या तीन विधानसभा निवडणुकीत भाजपकडून पराभव पत्करावा लागला. पण 2009 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने गमावलेली जागा पुन्हा मिळवली. काळे केवलराम तुळशीराम यांनी भाजपच्या पटेल राजकुमार दयाराम यांचा पराभव केला. तुळशीराम यांना ६३६१९ मते मिळाली तर दयाराम यांना ६२९०९ मते मिळाली.  हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे.
मेळघाट विधानसभा मतदारसंघ क्रमांक ४१ आहे.  मेळघाट मतदारसंघात अमरावती जिल्ह्यातील धारणी आणि चिखलदरा ही दोन तालुके आणि अचलपूर तालुक्यातील परतवाडा, पथ्रोट ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. मेळघाट हा विधानसभा मतदारसंघ अमरावती लोकसभा मतदारसंघात मोडतो  आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती – ST च्या उमेदवारांसाठी राखीव आहे. प्रहार जनशक्ती पक्ष पक्षाचे राजकुमार दयाराम पटेल हे मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. या मतदारसंघात आतापर्यंत काँग्रेस पक्षाची सत्ता राहिली होती. त्यामुळे मेळघाट हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. आतापर्यंत आठ वेळा काँग्रेसचे उमेदवारांनी या मतदारसंघातून बाजी मारली आहे. परंतु 2014 मध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला मेळघाट या विधानसभा मतदारसंघाला सुरुंग लागला आणि 2014 मध्ये भाजपचे आमदार प्रभुदास भिलावेकर यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजकुमार पटेल यांच्यात लढत झाली.  तर भाजप पक्षाचे आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजकुमार पटेल यांचा 55 हजार 25 एवढ्या मतांनी पराभव केला होता.
तर 2019 च्या निवडणुकीमध्ये भाजप पक्षाकडून रमेश मावसकर यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केवळ राम काळे तर प्रहार जनशक्ती पक्षाचे राजकुमार दयाराम पटेल यांना उमेदवारी देण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांना मत देत 2019 मध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे राजकुमार दयाराम पटेल यांनी येथे बाजी मारली. परंतु नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अमरावती जिल्ह्यामधून काँग्रेस पक्षाचे बळवंत वानखेडे हे चांगल्या मतांनी विजयी झाले आहेत. तर भाजपच्या नवनीत राणा यांचा येथे पराभव झाला आहे तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार यांचा येथे पराभव झाला आहे. त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जो काही बदल लोकसभा निवडणुकीमध्ये झाला आहे तो पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीमध्ये दिसणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच मेळघाट विधानसभा मतदारसंघातील मतदार पुन्हा एकदा प्रहार जनशक्ती पक्षाचे राजकुमार पटेल यांना जिंकण्याची एक संधी देणार का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
आता पाहुयात पाचवा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे अमरावती . हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. अमरावती विधानसभा मतदारसंघ क्रमांक ३८ आहे. हा मतदारसंघ अमरावती जिल्ह्यात आहे. अमरावती मतदारसंघात अमरावती महानगरपालिकेच्या, वॉर्ड क्र. १ ते ५, १९ ते ३१, ४१ ते ५६ आणि ६२ ते ७१ यांचा समावेश होतो. अमरावती हा विधानसभा मतदारसंघ अमरावती लोकसभा मतदारसंघात मोडतो. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सुलभा संजय खोडके हे अमरावती विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. अमरावती जिल्ह्यातील अमरावती विधानसभा मतदारसंघ हा सर्वाधिक लोकवस्ती असणारा शहरी भाग आहे.   त्याचबरोबर अमरावती शहर हे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.  विदर्भातील महत्त्वाच्या शहरांमध्ये अमरावती शहराचा समावेश होतो.  उमरलालजी मथुरादास केडिया हे या मतदारसंघाचे १९६२ सालाचे पहिले आमदार ठरले आहेत. ते काँग्रेस पक्षाचे होते. या मतदारसंघात आतापर्यंत सर्वाधिक प्रमाणात काँग्रेस पक्षाची सत्ता राहिलेली आहे.  १९६२ पासून आतापर्यंत ९ वेळा काँग्रेसच्या उमेदवारांचा या मतदारसंघात विजय झाला आहे.  तर भाजपला तीन वेळा या मतदारसंघात सत्ता मिळाली आहे.
१९९० साली पहिल्यांदा भाजपला या मतदारसंघात सत्ता मिळाली होती. जगदीश मोतीलाल गुप्ता यांचा त्यावेळी विजय झाला होता. त्यानंतर १९९५ च्या विधानसभा निवडणुकीतही जगदीश गुप्ता यांचा पुन्हा एकदा विजय झाला होता.  त्यानंतर पुन्हा काँग्रेस पक्ष सत्तेवर आला. तेव्हापासून थेट २०१४ पर्यंत काँग्रेसची या मतदारसंघात सत्ता राहिली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. सुनील पंजाबराव देशमुख यांनी काँग्रेसचे तत्कालीन आमदार रावसाहेब शेखावत यांचा पराभव केला. 2019 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सुलभा संजय खोडके यांनी भारतीय जनता पक्षाच्या डॉ. सुनील पंजाबराव देशमुख यांचा 18268 मतांनी पराभव करून जागा जिंकली. तर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहता येथे भाजप पक्षाचे नवनीत राणा यांचा पराभव झालेला आहे तर काँग्रेस पक्षाचे उमेदवार बळवंत वानखेडे यांचा इथे विजय झाला आहे.  त्यामुळे आता असेच दिसत आहे की काँग्रेस अमरावती या ठिकाणी पुन्हा एकदा उभारी घेत आहे. त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अमरावती येथे भाजप पक्षाकडून डॉक्टर सुनील देशमुख यांच्याविरुद्ध काँग्रेस पक्षाकडून सुलभा खोडके अशी लढत होईल.  तर आता लोकसभेप्रमाणे अमरावती येथे विधानसभा निवडणुकीमध्ये ही पुन्हा एकदा काँग्रेस भरारी घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आता पाहुयात पुढील मतदार संघ तो म्हणजे दर्यापूर.बेरारचा राजा दर्या इमाद शाह यांच्या नावावरुन या शहराचे नाव दिर्यापूर असे पडले. हे शहर चंद्रभागा नदीच्या काठी वसलेले आहे. हे शहर कापसाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.  हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. दर्यापूर विधानसभा मतदारसंघ क्रमांक ४० आहे. दर्यापूर मतदारसंघात अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर आणि अंजनगांव सूर्जी ही दोन तालुके आणि अचलपूर तालुक्यातील रासेगांव हे महसूल मंडळ यांचा समावेश होतो. दर्यापूर हा विधानसभा मतदारसंघ अमरावती लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती – SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे बळवंत बसवंत वानखडे हे दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते. परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार म्हणून बळवंत बसवंत वानखडे यांनी बाजी मारली आहे. त्यामुळे आता दर्यापूर ह्या मतदारसंघातील एक जागा खाली आहे.
 १९९० सालापासून या मतदारसंघात शिवसेनी सत्ता होती. २०१४ साली शिवसेना आणि भाजपने विभक्तपणे निवडणूक लढवायचा निश्चय केला आणि भाजपचे उमेदवार रमेश गणपतराव बुंडीले यांचा विजय झाला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे बलवंत बसवंत वानखडे 95,889 मते मिळवून विजयी झाले. भाजपा पक्षाचे बुंदीले रमेश गणपतराव यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. दर्यापूर हा विधानसभा मतदारसंघ येथील विद्यमान आमदार आता खासदार झाल्यामुळे येथील जागा रिकामी झाले आहे तर आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी मध्ये या जागेवरती काँग्रेसही आपल्या दावा करेल तसेच दर्यापूर हा पहिल्यापासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे येथे शिवसेना पक्ष दावा करण्याची शक्यता आहे. तसेच येथील जागा खाली झाल्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये दर्यापूर या विधानसभा मतदारसंघासाठी गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता दर्यापूर येथे महाविकास आघाडी कडून नक्की कोणत्या उमेदवाराला तिकीट भेटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तसेच महायुतीकडून पुन्हा एकदा रमेश बुंदले यांनाच विधानसभेसाठी संधी भेटणार की नवीन चेहऱ्याला संधी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आता पाहुयात पुढील विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे तिवसा.  हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. तिवसा विधानसभा मतदारसंघ क्रमांक ३९ आहे.   तिवसा मतदारसंघात अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुका, मोर्शी तालुक्यातील नेर पिंगळाई, धामणगांव ही महसूल मंडळे, अमरावती तालुक्यातील शिराळा, माहुली जहांगीर, नांदगांव पेठ आणि वालगांव ही महसूल मंडळे आणि भातकुली तालुक्यातील आष्टी, खोलापूर ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. तिवसा हा विधानसभा मतदारसंघ अमरावती लोकसभा मतदारसंघात मोडतो. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या यशोमती चंद्रकांत ठाकूर ह्या तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत. आमदार ऍड. यशोमती ठाकूर यांनी केलेल्या संघटनात्मक भक्कम बांधणीला छेद देण्याचे आव्हान महायुती समोर आहे. मराठा, माळी व मुस्लिम मतदारांची संख्या तुलनेने अधिक असली तरी धनगर व तेली समाजाची मतेही भरपूर असल्याने हा मतदारसंघ बहुजातीय व बहुभाषिक असा आहे. कोणत्याही एका जातीचे वर्चस्व नसलेला हा मतदारसंघ आहे.  नगर परिषद नसलेल्या व चार तालुक्यांत विभागल्या गेल्याने विस्तीर्ण बनलेला हा मतदारसंघ संपूर्ण ग्रामीण आहे.  अप्पर वर्धा धरणाचे पाणी या मतदारसंघातून जात असले तरी त्याचा लाभ मात्र या भागातील लोकांना होत नाही.  मात्र, जमीन चांगली असल्याने शेती चांगली आहे व मिश्र स्वरूपाचे आर्थिक जीवनमान आहे. राजकीयदृष्ट्या कोणत्याच एका पक्षाचे वर्चस्व राहिले नसल्याचा इतिहास आहे.
1978 मध्ये अस्तित्वात आलेल्या तिवसा मतदारसंघात आतापर्यंत झालेल्या नऊ निवडणुकांत कॉंग्रेसने पाच वेळा विजय मिळवला आहे. 1978 मधील पहिल्याच निवडणुकीत कॉंग्रेसच्याच मात्र अपक्ष राहिलेल्या चंद्रकांत ठाकूर यांनी तर एकवेळा भाकपच्या भाई इंगळे यांनी 1990 मध्ये विजय मिळविला होता. 1999 व 2004 मध्ये भाजपच्या साहेबराव तट्टे यांनी सलग दोनवेळा विजय मिळवल्याने हा मतदार कोणत्याच एका पक्षाचा बालेकिल्ला बनला नाही. मोर्शी, राजूरवाडी या परिसरात कम्युनिस्टांचे अस्तित्व आहे. 2009 पासून कॉंग्रेसने हा मतदारसंघ स्वतःकडे राखण्यात यशोमती ठाकूर यांनी यश मिळवले आहे. ऍड. यशोमती ठाकूर यांनी 2004 मधील पराभवानंतर सातत्याने मतदारसंघात संपर्क ठेवून संघटनात्मक बांधणी केली. त्याचा लाभ त्यांना सलग तीन निवडणुकीत झाला आहे.  तर भाजप पक्षाला येते अजूनही आपले कमळ फुलवता आलेले नाही. त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीकडून शिवसेना शिंदे गट यांच्या उमेदवाराला संधी भेटणार की भाजप पक्ष आपल्या उमेदवाराला संधी देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच महाविकास आघाडी कडून तर आता यशोमती ठाकूर यांना तिकीट भेटेल अशी शक्यता आहे कारण मागील तीन टर्म या इथे आमदार म्हणून राहिलेले आहेत यशोमती ठाकूर या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आहेत. तरी ते महाविकास आघाडी कडून शिवसेना ठाकरे गट यांच्याकडूनही जागा मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील त्यामुळे आता इथे नक्की तिकीट कोणाला भेटणार आणि ही जागा कोणाला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आता पाहुयात पुढील विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे बडनेरा.  हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. बडनेरा विधानसभा मतदारसंघ  क्रमांक ३७ आहे.  बडनेरा मतदारसंघात अमरावती जिल्ह्यातील अमरावती तालुक्यातील अमरावती आणि बडनेरा ही महसूल मंडळे, अमरावती महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. ६ ते १८, ३२ ते ४०, ५७ ते ६१, ७२, ७३ आणि भातकुली तालुक्यातील भातकुली आणि निंभा ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो.  बडनेरा हा विधानसभा मतदारसंघ अमरावती लोकसभा मतदारसंघात मोडतो. अपक्ष उमेदवार रवी राणा हे बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. १९६२ साली या मतदारसंघाची स्थापना झाली. काँग्रेसचे पुरुषोत्तम देशमुख हे या मतदारसंघात निवडूण येणारे पहिले आमदार आहेत. त्यानंतर १९६७ साली आरपीआयचे के. बी. श्रृंगारे निवडूण आले होते. त्यानंतर आरपीआयचा एकही उमेदवार या मतदारसंघातून निवडूण आलेला नाही.  या मतदारसंघात सर्वांधिक प्रमाणात काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे.  त्याखालोखाल शिवसेनेला सत्तेत राहता आलेले आहे. काँग्रेसचे उमेदवार या मतदारसंघात सहा वेळा निवडून आले आहेत.  तर शिवसेनेचे उमेदवार तीन वेळा निवडून आले आहेत.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत रवी राणा हे या मतदारसंघात निवडून येणारे पहिले अपक्ष उमेदवार ठरले होते.  ऐवढेच नाही तर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतही रवी राणा यांचा विजय झाला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष1 पक्षाचे रवी राणा 90,460 मते मिळवून विजयी झाले. शिवसेना पक्षाचे बंड प्रिती संजय यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. विजयाचे अंतर: 15,541 मते एवढे होते . 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे रवी राणा 46,827 मते मिळवून विजयी झाले.शिवसेना पक्षाचे बंड संजय रावसाहेब यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. शिवसेना या पक्षाचा इथे पराभव होत आलेला आहे. त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी कडून शिवसेना उद्धव ठाकरे गट तर महायुतीकडून शिवसेना शिंदे गट यांच्याकडून या जागेसाठी दावा केला जातो तसेच ही जागा मिळवण्यासाठी या दोन्ही पक्षांकडून चांगलीच तयारी केली जाणार आहे. तसेच आता सलग दोन टर्म आमदार राहिलेले रवी राणा यांना पुन्हा एकदा तिसरी टर्म जिंकण्याची संधी भेटणार का हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे कारण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवार नवनीत राणा म्हणजेच रवी राणा यांच्या पत्नी यांचा पराभव अमरावती येथून झाला आहे. सध्या महाविकास आघाडी यांच्याकडून सहानुभूतीचे वारे दिसत आहे त्यामुळे रवी राणा यांना तिसरी  टर्म अपक्ष म्हणून निवडून येणं वाटत आहे तेवढे सोपे जाणार नाही. तसेच आता या जागेसाठी महाविकास आघाडी कडून व महायुतीकडून येथे कोणत्या नवीन चेहऱ्यांना संधी भेटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर मंडळी आहे अमरावती जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघ यांचा लेखाजोखा. तर मंडळी अमरावती जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघ येथे कोण आमदार म्हणून निवडून येईल असे तुम्हाला वाटते हे आम्हाला कमेंट्स करून कळवा.

Exit mobile version