खंडणीच्या आड येऊ नको, वाल्मीक अण्णा तुला जिवंत सोडणार नाही?
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ९ डिसेंबर 2024 मध्ये झाली होती.
आता जवळपास तीन महिन्यांचा कालावधी उलटला अजूनही एक मारेकरी बाहेर मोकाट फिरतोय.
तर बाकीच्या आरोपींना मोक्का लावण्यात आला आहे.
या निर्घृण हत्येने संपूर्ण राज्य हादरलं आहे.
संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली.
याच दरम्यान काल रात्री देशमुख यांच्या हत्येचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.
अत्यंत क्रूरतेने, आणि बेदमपणे मारहाण करून देशमुख यांचा जीव घेण्यात आला.
त्यांच्या हत्येचे हे फोटो समोर आले असून सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्यामुळे बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळाले.
संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली याचे वर्णन आतापर्यंत सांगितले जात होते. ते वर्णन ऐकून मन सून्न होत होते. अंगावर काटा येत होता. पण आता त्यांच्या हत्येच्या वेळेचे फोटो समोर आले आहेत.
ते फोटो पाहिल्यानंतर अंगाचा थरकाप उडाल्याशिवाय राहत नाहीत. सीआयडीने जे चार्जशिट दाखल केले आहे, त्यामध्ये या फोटोंचा समावेश करण्यात आला आहे. ज्यावेळी हत्या करण्यात येत होती, त्यावेळेस त्यांचे व्हिडीओ काढले गेले. ते व्हिडीओ सीआयडीच्या हाती लागले आहेत. याच व्हिडीओचे स्क्रीनशॉर्ट घेऊन फोटोंचा चार्जशीटमध्ये समावेश करण्यात आला आहे.
मन विचलित करणारे हे असे फोटो आहेत. किती क्रूरपणे हत्या केली गेली असेल, याचा अंदाज हे फोटो पाहिल्यानंतर येतो. कोणी दांडक्याने मारत आहे तर कोणी मानेवर पाय ठेवला आहे. त्यांच्यावर अत्याचार केले जात असताना कोणीतरी खिदीखिदी हसत आहे. कोणी व्हिडीओ काढताना वेडेवाकडे चाळे करत आहे. त्यात संतोष देशमुख यांचा पूर्ण चेहरा सुजलेला दिसत आहे. ते जमिनीवर गतप्राण पडले आहेत. त्या अवस्थेतही त्यांना मारलं जात आहे. अशा पद्धतीचे हे फोटो आता समोर आले आहेत.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असून खंडणीच्या वादातूनच ही हत्या करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये करण्यात आला आहे. खंडणी, अॅट्रॉसिटी आणि संतोष देशमुखांची हत्या ही तीनही प्रकरणे एकत्र करुन ही चार्जशीट दाखल करण्यात आली असून या घटना देशमुखांच्या हत्येच्या कटाचाच भाग असल्याचे यामध्ये म्हटले आहे. शिवाय या चार्जशीटमधले जे फोटो समोर आले आहेत त्यात वाल्मिक कराडसोबतचे संभाषणही नमूद करण्यात आले आहेत. तो कोणत्या मोबाइलवरून बोलत होता त्याचा ही त्याच उल्लेख आहे
या हत्येच्या कटामध्ये आरोपी क्रमांक एक वाल्मीक कराड, आरोपी दोन विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे, आठव्या क्रमाकांवर फरार कृष्णा आंधळेचा समावेश करण्यात आला आहे. नववा आरोपी सिद्धार्थ सोनवणे याचे नाव वगळण्यात आले आहे. पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर कराडविरुद्धचे सबळ पुरावे सापडल्याचे या चार्जशीटमध्ये म्हटले आहे. आता या हत्येचे फोटो समोर आले आहे. ते पाहिल्यावर अंगावर काटा आल्या शिवाय राहत नाहीत. गंभीर बाब म्हणजे हत्या करताना आरोपी हसत होते. त्याचेही फोटो पोलिसांच्या हाती लागले आहेत.,
याच पार्श्वभूमीवर आज ,मंगळवार 4 मार्च रोजी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.
संतोष देशमुख यांची क्रूरपण हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी दिली जावी अशी मागणी करण्यात येत आहे.
देशमुख हत्या प्रकरणातील आरोप पत्रात, सरपंच देशमुख यांची हत्या नेमकी कशी झाली याचे 15 फोटो समोर आले. आणि एक व्हिडिओ समोर आला आहे.
त्याच पार्श्वभूमीवर हा बंद पुकारण्यात आला आहे. एक दिवस कुलूप लावून शासनाचा निषेध करण्याचे आवाहन या बंददरम्यान करण्यात येत आहे,
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सीआयडीने चार्जशीट दाखल केली आहे.
यात 66 पुरावे आणि 184 जबाब महत्त्वाचे ठरले आहेत.
सध्या हे प्रकरण न्यायालयात असून याप्रकरणी नवनवीन खुलासे समोर येत आहेत.
संतोष देशमुख हत्येप्रकरणी दाखल केलेल्या आरोप पत्रातून अनेक भयानक बाबी समोर येत आहेत.
फोटोमध्ये आरोपींनी देशमुख यांना केलेली अमानुष मारहाण आणि हत्या कशी केली हे स्पष्टपणे दिसून येते. या हत्येच्या कटात सहभाग असलेले आरोपीही या फोटोत दिसत आहेत. विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे, कृष्णा आंधळे हे सर्वजण या फोटोत पाहायला मिळत आहे. हे फोटो आणि व्हिडिओ अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाच्या स्मार्टफोनवर शूट करण्यात आले होते. हे सर्व फोटो आणि व्हिडिओ हे महेश केदार याच्या मोबाईल मध्ये सापडले आहेत.
फोटोंमध्ये आरोपी देशमुख यांना अमानुष मारहाण करताना दिसत आहेत. तर कोणी त्यांच्या शरीरावर पाय ठेवून फोटो काढला आहे. क्रूरतेची सीमा म्हणजे, या फोटोंमध्ये आरोपी देशमुख यांना मारहाण करत हसताना दिसत आहेत.
तसेच त्यांच्या अंगावर कपडे काढून गुन्हेगार लघुशंका करताना दिसत आहेत.
फोटोमध्ये देशमुख यांचा चेहरा पूर्ण सुजलेला दिसत असून हे फोटो समोर आल्यानंतर विविध पातळीवर लोकांनी आपला तीव्र रोष व्यक्त केला.
अनेकांनी एक्स या प्लॅटफॉर्मवरून आपला संताप व्यक्त करत राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टॅग करत कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले होते.
ही घटना ज्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात पुढे आली ते म्हणजे मनोज जरांगे, सुरेश धस, मिडिया, अंजली दमानिया, संपूर्ण देशमुख कुटुंब यांचे आभार मानले पाहिजे कारण यांच्या सततच्या लढाईमुळे अर्धी का होईना ना लढाई जिंकली असे म्हणायला हरकत नाही.
मनोज जरांगे पाटील यांनी आज (4 मार्च) देखमुख कुटुंबियांची भेट घेतली, यावेळी संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांना अश्रू अनावर झाले.
धनंजय देशमुख यांनी हे फोटो सोशल मीडियावरुन डिलिट करुन टाकण्याची विनंती देखील केली आहे.
या प्रकरणातील आरोपींना राजकीय पाठबळ असल्याचा आरोप वारंवार करण्यात आला.
या प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे.
वाल्मिक कराड हा महाराष्ट्राचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांचा विश्वासू सहकारी मानला जातो. कराड याचं नाव समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने चांगलाच जोर पकडला होता. अखेर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
चला तर पाहूया या सर्व प्रकरणावर कोणी काय प्रतिक्रिया दिली आहे?
धनंजय देशमुख माध्यमांशी बोलताना म्हणाले, एकच फोटो बघून मी डोळे झाकले, मला सगळे फोटो बघवलेच गेले नाही.
मी तुटून गेलोय, काय करावं काही समजत नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आरोपींना कसं वाचवलं जाईल याचं नियोजन केलं जातंय. पण मारेकऱ्यांना नियती माफ करणार नाही अशी भावना देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
मनोज जरांगे पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली, माध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले,”हे भयंकर कृत्य आहे. आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत लढावं लागणार आहे.” जरांगेंनी धनंजय मुंडेंवर आरोप केले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
भाजप आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, राजीनामा देऊन थांबणार नाही. खंडणी मुळे हे सगळं घडलय याची बैठक सातपुडा त्यांच्या बंगल्यावर झाली. सगळयांचा सीडीआर (CDR) चेक करावा. आमच्या पंकजा मुंडेंना विचारा, त्या म्हणतात पुण्याचा प्रश्न विचारा, बीडचा प्रश्न त्यांना विचारू नका.
संतोष देशमुख भाजपचे बूथ प्रमुख होते. त्यांना न्याय मिळाला पाहिजे. कोण काय म्हणतंय, मला काही घेणं देणं नाही, आता राजीनामा झाल्यावरच बोलतो मी, अशी प्रतिक्रिया धस यांनी दिली
उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणावर रोष व्यक्त केलाय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून केलेल्या पोस्टमध्ये त्या म्हणाल्या, “राजकारण गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवण्यासाठी असतं एवढंच माहित होतं.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या प्रकरणावर आपला संताप व्यक्त केलाय. एबीपी माझाशी बोलताना आव्हाड म्हणाले, “ही क्रौर्याची परिसीमा आहे. हे अमानवी कृत्य आहे. माणुसकीची हत्या होत असताना आपण डोळे उघडे ठेवून बघायचं आणि ह्रदयाचे सर्व दरवाजे बंद करून टाकायचे असं चित्र दिसून येत आहे.”
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे एबीपी माझाशी बोलताना म्हणाल्या, “ही माणुसकीला लाजवणारी घटना आहे. कोणाच्या जीवावर या आरोपींनी असे कृत्य केले. कुठली तरी मोठी ताकद असल्याशिवाय त्यांची हिम्मत होईल असं करायची?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवून सरकारने तातडीनं आरोपींना शिक्षा केली पाहिजे. जेव्हा या सगळ्या घटना बीडमध्ये घडत असताना कोणाला पाठीशी घातलं जातं होतं? हे महाराष्ट्राला स्पष्टपणे सांगायला हवं”, असंही त्या म्हणाल्या.
सुप्रिया सुळे यांनी एक्स प्लॅटफॉर्मवरून एक पोस्ट करत, संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी शासनाकडे न्याय मागणाऱ्या देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंची दखल शासन घेत नाही असे दिसत आहे, असा प्रश्न उपस्थित केला.
संतोषअण्णाच्या बाबतीतलं हे क्रौर्य बघितल्यानंतर माणसातल्या गिधाडांना बळ पुरवणारी सत्ता माझ्याकडे नाही याचा आनंद आहे.. ही माणसं नाहीत.. आणि यांचं क्रौर्य निमूटपणे सहन करणारे आम्ही तरी कुठे माणसं आहोत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. त्यांनी फेसबुकवरुनही आणखी एक पोस्ट करत माझं माणूसपण या क्रूर राजकारणापेक्षा लाख मोलाचं असल्याचं म्हटलंय.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, “काल जेव्हा फोटो आले ते अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले. फोटो पाहताना पाहताना डोळ्यात पाणी आणि मस्तकात आग.. संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला. अतिशय अमानुषपणे मारहाण करतानाचे हे फोटो काल आपल्याकडे आले. परंतु, हे फोटो दोन महिन्यांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आले असतील, अजितदादा यांच्याकडेपण आले असतील. हे फोटो पाहुनही दोन महिने शांत कसे राहिले? तुमचं मन सगळ्या गोष्टी बघून एक निर्णय घ्यावा असं जर तुम्हाला वाटत नसेल, तर तुम्हाला मन आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पुढे रोहित पवार म्हणाले, “फडणवीस यांना मला विनंती करायची आहे की, तुमची मैत्री किंवा जे काय असेल ते कचऱ्यात टाका आणि आजच्या आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे.”
रोहित पवार यांनी अजित पवार यांनाही कारवाई करण्याची विनंती केली. “दादांकडे बगत असताना प्रशासनावर कंट्रोल असणारे नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. आणि काही झाले तरी योग्य निर्णय घेण्याची धमक दादांमध्ये आहे. त्यांनी सभागृह सुरू होण्यापूर्वी राजीनामा घेतला पाहिजे. आज जर राजीनामा झाला नाही तर आम्ही अधिवेशन चालू देणार नाही”, असं रोहित पवार म्हणाले.
एकंदरीतच सर्व राजकीय पातळीवरून आणि संपूर्ण महाराष्ट्रात हे फोटो व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.
आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला आहे परंतु आरोपींना अजूनही कोणती शिक्षा होणार यावरती कार्यवाही चालू आहे.