Site icon

जन गण मन खरंच जॉर्ज पंचमच्या स्वागतासाठी लिहिले का? ऐतिहासिक पुरावे काय सांगतात?


History of Jana Gana Mana: जन गण मन खरंच जॉर्ज पंचमच्या स्वागतासाठी लिहिले का? ऐतिहासिक पुरावे काय सांगतात?

२७ डिसेंबर १९११ रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनादरम्यान पहिल्यांदा ‘जन गण मन’ गायले गेले. राष्ट्रगीत हे बंगाली भाषेत लिहिले होते. नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी बंगालीमध्ये लिहिलेल्या कवितेतील पाच कडव्यांपैकी एका कडव्याचा संस्कृत भाषांतराचा राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केलेला आहे . परंतु रवींद्र टागोर लिखित हे राष्ट्रगीत नेमकं कोणासाठी लिहिलं गेलं होत, यावरून मात्र आजही वाद होताना दिसतो.
काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे मिशन अयोध्या या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंगच्या वेळी प्रवचन देताना वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेले सराला बेट मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी भारताच्या राष्ट्रगीतावर भाष्य केले. रवींद्रनाथ टागोर लिखित जन-गण-मन हे आपले राष्ट्रगीत नसून वंदे मातरम हेच राष्ट्रगीत व्हावे, असे ते म्हणाले. तसेच रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत का लिहिले, त्यांना नोबेल पारितोषिक कसे मिळाले याबद्दलही त्यांनी त्यांची मते व्यक्त केली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर जन गण मन या राष्ट्रगीतावर आरोप का केले जातात हे आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून जाणून घेऊया.
तर मंडळी २७ डिसेंबर १९११ रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनादरम्यान पहिल्यांदा ‘जन गण मन’ गायले गेले. कारण १९११ साली जॉर्ज पंचमने भारताला भेट दिली होती. रवींद्रनाथ टागोर यांनी जन गण मन या राष्ट्रगीतात भारत भाग्य विधाता हे विशेषण पंचम जॉर्जसाठी वापरले, असा आरोप केला गेला. त्याच पार्श्वभूमीवर भारताचे राष्ट्रगीत नेमकं कोणासाठी लिहिलं गेलं आणि राष्ट्रगीतासंदर्भात झालेले आरोप नेमकं काय सांगतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू.
जन गण मन हे गीत पहिल्यांदा १९११ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनादरम्यान सादर केलं गेलं. पंचम जॉर्ज याने भारताला भेट दिली होती, त्यानिमित्ताने ब्रिटिश सरकारने मोठ्या राजाच्या स्वागतासाठी समारंभ आयोजित केला होता. याच समारंभात हे गीत पहिल्यांदा गायले गेले. त्यामुळेच टीकाकारांनी जन गण मन हे गीत सम्राटाला समर्पित म्हणून लिहिले गेले असा निष्कर्ष काढला. तसेच जन गण मन हे गीत पंचम जॉर्ज यांच्या स्तुतीसाठी लिहिले गेले होते हा आरोप केला होता. विशेषतः भारत भाग्यविधाता हे वाक्य वादाचे कारण ठरले. या वाक्याचा अर्थ चुकीच्या पद्धतीने घेतला गेला आणि क्षणार्धात संपूर्ण गीताचाच अर्थ बदलला.
तर रविंद्र टागोरांनी हा आरोप सातत्याने फेटाळून लावला. हे गीत मानवी गुणांचे गुणगान करत नाही तर हे गीत दैवी मार्गदर्शक शक्तीचे गुणगान करतं, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. टागोर यांनी जन गण मन हे गीत पंचम जॉर्ज यांच्या स्तुतीसाठी लिहिले गेले होते हा आरोप स्पष्टपणे फेटाळला. आपला मित्र पुलिन बिहारी सेन यांना लिहिलेल्या पत्रात टागोर म्हणतात की, “महाराजांच्या सेवेत वरिष्ठ अधिकारी असलेल्या माझ्या एका मित्राने सम्राटाच्या स्तुतीसाठी गीत लिहावे अशी विनंती केली होती. परंतु मी ज्या गीताची रचना केली आहे, त्या गीताचा अर्थ फक्त देवच भारताच्या नशिबाचा निर्माता आहे, असाच आहे. भारताच्या नशिबाचा निर्माता पंचम जॉर्ज किंवा कोणताही जॉर्ज नाही तर भारतीयांच्या हृदयात विराजमान असलेली एक दिव्य शक्ती आहे.” वसाहतवादी मागण्यांपुढे झुकण्याऐवजी त्यांनी आपल्या रचनेचा उपयोग भारताच्या आध्यात्मिक सार्वभौमत्वावर आणि भारताचे मार्गदर्शन करणाऱ्या दिव्य शक्तीवर भर देण्यासाठी केला.
चला तर जाणून घेऊया ‘भारत भाग्य विधाता’ या वाक्याचा अर्थ काय आहे?
‘भारत भाग्य विधाता’ हे वाक्य या वादाच्या केंद्रस्थानी आहे. ब्रिटिश स्तुतीच्या अर्थाशी सहमत असलेले टीकाकार असा दावा करतात की, भारताचे भाग्य ठरवणारा हा शब्द जॉर्ज पंचमसाठी वापरला गेला असावा. जन गण मन या गीतात भारत भाग्य विधाता हे एक शाश्वत आणि सर्वव्यापी दिव्य शक्तीचे प्रतीक आहे. ही शक्ती कोणत्याही मानवी शासकाच्या पलीकडे आहे. पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्रविड, उत्कल आणि बंग या भारताच्या भौगोलिक विविधतेचा उल्लेख गीतात आहे. टागोरांच्या स्पष्टीकरणावरून हे लक्षात येते की हे गीत कुठल्याही वसाहतवादी शासकाला नव्हे तर भारताच्या सामूहिक आत्म्याला उद्देशून आहे.
जन गण मन संदर्भातील वाद कालांतराने कमी झाला होता . यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत. इतिहासतज्ज्ञ आणि टागोर साहित्याच्या अभ्यासकांनी त्यांच्या उद्देशाचे सविस्तर दस्तऐवजीकरण केले आहे. विशेषतः गीताच्या आध्यात्मिक स्वरूपावर भर दिला आहे. १९५० मध्ये जन गण मन राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले गेल्यामुळे ते स्वतंत्र भारताच्या एकतेचे प्रतीक असल्याचे अधोरेखित झाले. कालांतराने टागोर यांच्या तत्त्वज्ञान आणि साहित्यिक प्रतिभेबद्दल अधिक खोल समज निर्माण झाली त्यामुळे गीताच्या उद्देशाविषयी असलेल्या शंका बऱ्याच प्रमाणात दूर झाल्या. जन गण मन आणि वंदे मातरम यांच्यातील तुलना देखील वादाला कारणीभूत ठरली आहे. वंदे मातरम त्याच्या क्रांतिकारी पार्श्वभूमीसाठी ओळखले जाते, तर जन गण मन हे राष्ट्रीय गीत म्हणून निवडले गेले. कारण त्यामागचा दृष्टिकोन सार्वत्रिक आणि सर्वसमावेशक होता.
तर मंडळी राष्ट्रगीत हे जनगणमन असावे की वंदे मातरम असावे . हे आम्हाला कमेंट्स करून कळवा.

Exit mobile version