Site icon

त्रिभाषिक फॉर्म्यूला नेमका काय आहे? ‘हिंदी’ला तामिळनाडू सरकारचा विरोध का?


त्रिभाषिक फॉर्म्यूला नेमका काय आहे? ‘हिंदी’ला तामिळनाडू सरकारचा विरोध का? जाणून घ्या संपूर्ण माहिती.

आपण शाळेत असताना किंवा कॉलेजला असताना कधी विचार केला का आपल्याला महाराष्ट्रामध्ये मराठी हिंदी आणि इंग्लिश हेच विषय का शिकवले जातात?
याच्यामागे कारण आहे ते म्हणजे सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार केलेले आहे आणि या धोरणामध्ये भारतातील प्रत्येक राज्यांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये तीन भाषा शिकवल्या जाव्यात असं धोरण लागू केलेले आहे.
परंतु तामिळनाडूमध्ये फक्त दोनच भाषा वापरल्या जातात त्या म्हणजे तामिळ आणि इंग्लिश.
तर तमिळनाडू राज्य हे हिंदी ही भाषा त्यांच्या राज्यामध्ये शिकवत नाही आणि ते या भाषेला विरोध करत आहेत.
 केंद्र सरकार आणि तामिळनाडू सरकारमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) अंतर्गत शाळांमध्ये तीन भाषा शिकवण्याच्या नियमांवरून वाद निर्माण झाला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टालिनने तीन भाषा धोरण लागू न केल्याबद्दल ब्लॅकमेलिंग आणि धमकी दिल्याचा केंद्रांवर आरोप केला आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या एका विधानानंतर हा वाद पुन्हा निर्माण झाला आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी वाराणसीमध्ये म्हटले होते की, तामिळनाडूला भारतीय घटनेनुसार चालावे लागेल आणि ते तीन भाषेच्या धोरणात्मक कायद्याचा भाग आहे. जोपर्यंत तामिळनाडू तीन भाषांचे धोरण स्वीकारत नाही तोपर्यंत राज्याला केंद्राकडून शिक्षणाशी संबंधित निधी मिळणार नाही.’ यानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांनी राज्याला शिक्षण निधी नाकारला गेला तर या केंद्राला तामिळ लोकांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागेल, असा इशारा दिला.
त्रिभाषिक फॉर्म्यूला नेमका काय आहे? ‘हिंदी’ला तामिळनाडू सरकारचा विरोध का? याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया.
नमस्कार मी पिके भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो.
चला तर याविषयी मुद्देसूद बोलूया..
मुद्दा क्रमांक १) काय आहे त्रिभाषिक धोरण?
भारतातील भाषिक शिक्षणाशी संबंधित त्रिभाषा फॉर्म्युला हे धोरण आहे, जे प्रथम 1968 च्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात (एनईपी) प्रस्तावित केले गेले होते. विद्यार्थ्यांना तीन भाषांमध्ये शिक्षण देणे हा त्यामागचा हेतू होता. प्रादेशिक भाषा किंवा मातृभाषा, हिंदी आणि इंग्रजी या भाषांचा यात समावेश आहे. हे सूत्र 1968 आणि 2020 च्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात देखील चालू ठेवले गेले होते, परंतु प्रत्येक राज्याने ते वेगळ्या मार्गाने अंमलात आणले.
नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अंतर्गत (National Education Policy) देशातील प्रत्येक राज्यातील विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार आहेत. यामधील एक भाषा हिंदी सुद्धा असू शकते. विद्यार्थ्यांना कोणत्या तीन भाषा शिकवायच्या याची निवड करण्याचा अधिकार शिक्षण संस्थांकडे राहणार आहे. विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागतील अशी शिफारस या धोरणात करण्यात आली आहे. तामिळनाडूत मात्र या शिक्षण धोरणाचा जोरदार विरोध केला जात आहे.
मुद्दा क्रमांक २) नेमका का केला जातोय विरोध ?
त्रिभाषा फॉर्मूला तमिळनाडूमध्ये लागू नाही, तेथे फक्त तमिळ आणि इंग्रजी शिकवले जाते. इतर दक्षिण भारतीय राज्ये (केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा) काही प्रमाणात त्रिभाषा फॉर्म्युला स्वीकारतात, परंतु ते हिंदीला आवश्यक मानत नाहीत. २०२० च्या नवीन शैक्षणिक धोरणाला (एनईपी -२०२०) त्रिभाषा फॉर्म्युला पुन्हा समाविष्ट करण्यात आले, परंतु असे स्पष्ट केले गेले की कोणतीही भाषा जबरदस्तीने अंमलात आणली जाणार नाही. त्रिभाषा फॉर्म्युलाचा उद्देश भारताच्या भाषिक विविधतेला चालना देणे हा होता, परंतु हिंदीला अनिवार्य करण्याच्या भीतीने दक्षिण भारतात त्याचा विरोध आहे.
मुद्दा क्रमांक ३) तामिळनाडूत द्विभाषा निती का आहे?
तामिळनाडू तिहेरी धोरण स्वीकारत नाही आणि शाळांमध्ये केवळ दोन भाषा तामिळ आणि इंग्रजी शिकवली जाते. तामिळनाडूमध्ये हिंदी अनिवार्य न करण्यामागील राजकीय कारणे आहेत. दक्षिण भारतातील अनेक पक्ष, द्रविड़ मुनेत्र कड़गम (डीएमके) हिंदीला उत्तर भारतीय वर्चस्वाचे प्रतीक मानतात. हिंदी लादल्याबद्दल केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये संघर्ष झाला आहे. दक्षिण भारतीय राज्यांमध्ये इंग्रजी हिंदीपेक्षा आंतरराष्ट्रीयसाठी इंग्रजी अधिक व्यावहारिक आणि आवश्यक मानली जाते. त्यांना हिंदीऐवजी इंग्रजीला प्राधान्य द्यायचे आहे.
मुद्दा क्रमांक ४) ) हिंदी अनिवार्य करण्यास विरोध का आहे?
दक्षिण भारतात विशेषत: तामिळनाडूला त्रिभाषा फॉर्म्युलासंदर्भात विरोध आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे हिंदी लादण्याची भीती. तमिळनाडूने नेहमीच हिंदी अनिवार्य करण्यास विरोध केला आहे. त्यांचा असा विश्वास आहे की यामुळे हिंदी भाषेचे वर्चस्व वाढेल आणि त्यांच्या मातृभाषा (तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम) खराब होईल. 1937 आणि 1965 मध्ये तामिळनाडूमध्ये हिंदी विरोधी आंदोलन झाली होती, त्यानंतर तेथील शाळांमध्ये हिंदी अनिवार्य नव्हती.
मुद्दा क्रमांक ५) केंद्र सरकारला एकीवेळी माघार का घ्यावा लागली होती ? त्याचा इतिहास काय आहे?
तामिळनाडूमधील विरोधाचा इतिहास 85 वर्षांचा आहे. 1937 मध्ये ब्रिटीश राजवटीत मद्रास प्रेसिडेंसी (आता तामिळनाडू) मधील शाळांमध्ये हिंदी अनिवार्य करण्याचा प्रयत्न केला गेला, ज्याला व्यापक विरोधाचा सामना करावा लागला. या चळवळीचे नेतृत्व द्रविड कडगम आणि नंतर द्रविड मुनेत्र कडगम म्हणजेच डीएमके यांनी केले. हा निषेध इतका जोरदार होता की 1940 मध्ये हिंदी भाषा शाळांमधून काढून टाकावी लागली.
त्याचप्रमाणे, 1965 मध्ये जेव्हा केंद्र सरकारने हिंदीला देशातील एकमेव अधिकृत भाषा बनवण्याची योजना आखली तेव्हा तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात निषेध झाला. या प्रात्यक्षिकेदरम्यान बर्‍याच जणांना आपला जीव गमावला आणि चळवळीने संपूर्ण राज्य हादरवून टाकले. यानंतर केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली. आता पन्हा एकदा याच मुद्द्यावर केंद्र सरकार आणि तमिळनाडू सरकार आमने-सामने आले आहेत.
मुद्दा क्रमांक ६) मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांनी कोणता इशारा दिला आहे?
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांनी केंद्र सरकारने १० हजार कोटी ऑफर केले तरीही राज्यात नवीन शिक्षण धोरण लागू होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. हा विरोध केवळ हिंदी भाषा लादण्यावरूनच नाही तर या नव्या धोरणात अनेक अशा तरतुदी आहेत ज्यामुळे विद्यार्थी आणि सामाजिक न्याय प्रणालीवर परिणाम होऊ शकतो असा आरोप स्टॅलिन यांनी केला आहे.
हिंदी भाषेला पहिल्या क्रमांकाची भाषा म्हणून वापर करणाऱ्यांची सर्वात कमी संख्या दक्षिण भारतातच आहे. 2011 मधील जनगणनेनुसार देशात जवळपास 43.63 टक्के लोकांची पाहिली भाषा हिंदी होती. त्यावेळी देशाच्या एकूण 125 कोटी लोकसंख्यापैकी 53 कोटी लोक हिंदीला आपली मातृभाषा मानत होते. सन 1971 ते 2011 दरम्यान हिंदी भाषिकांत सहा टक्क्यांची वाढ झाली.
तर मंडळी महाराष्ट्रातही असाच त्रिभाषीय फॉर्मुला आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील लोकांना मराठी हिंदी आणि इंग्लिश ही चांगली समजते.
तर मंडळी तुम्हाला या अगोदर त्रिभाषीय फॉर्मुला म्हणजे काय हे माहित होतं का ? हे आम्हाला कमेंट्स करून कळवा.

Exit mobile version