Site icon

बुलढाण्यात टक्कल व्हायरस! तीन दिवसात पडते टक्कल, अजब आजाराने गावकरी हायरान नागरिक भयभीत


बुलढाण्यात टक्कल व्हायरस! तीन दिवसात पडते टक्कल, अजब आजाराने गावकरी हायरान नागरिक भयभीत

केसगळती ही वेगवेगळ्या कारणांनी होते. महिला असो वा पुरूष सगळेच आजकाल केसगळतीच्या समस्येने हैराण आहेत. खासकरून हिवाळ्यात केसगळतीच्या समस्येचा अधिक सामना करावा लागतो. मग लोक ही समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. वेगवेगळ्या प्रकारचे शाम्पू लावतात. परंतु केस गळती ही काही लोकांना अनुवंशिक असते आणि काही लोकांना केस गळती ही टेन्शनमुळे होते.परंतु बुलढाणा येथे एक नवीनच प्रकार समोर आला आहे सध्या बुलढाणा येथील शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये लहानापासून ते मोठ्यांपर्यंत तीन दिवसात टक्कल पडत आहे. त्यामुळे आता हा करोना एचएपीव्ही ह्या रोगापेक्षा आता आणखी कोणता नवीन रोग बुलढाणा जिल्ह्यात आला आहे असा प्रश्न सर्वांना पडत आहे. चला तर पाहूया बुलढाणा जिल्ह्यामध्ये नक्की झाले काय? सर्वांचेच केस का गळू लागले आहे? बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव तालुक्यात असणाऱ्या बोंडगाव, कालवड आणि काठोरा या गावांमध्ये केस गळतीचे आजाराची लागण झाली आहे.या गावातील लोकांनी तक्रारी केल्या आहेत की एकदा केस गळती सुरू झाली की काही दिवसांमध्ये संपूर्ण टक्कल पडत आहे. या गावातील पाच ते 50 नागरिकांना ह्या लागण झाल्याचे समोर आले आहे.या आजारामध्ये पहिल्यांदा डोकं खाजवते आणि नंतर सरळ केस हातात येऊ लागतात. त्यानंतर तिसऱ्या ते चौथ्या दिवशी संपूर्ण केसांना टक्कल पडत आहे.

केसगळीतचा त्रास झालेले भोनगावचे रहिवासी दिगंबर इलामे यांनी सांगितले की, “माझे केस गळत होते म्हणून दवाखान्यात दाखवण्यासाठी गेलो .मी एक दिवस शाम्पू लावला होता त्यामुळे केस गळत होते. मला दुसऱ्या कोणत्या कारणामुळे केस गळत आहेत असं वाटलं नाही.. याआधी कधीच आमच्या गावात अशा पद्धतीने केसगळती झाली नाही. आमच्या गावात सुमारे 25 लोकांना हा त्रास होतो आहे. पहिल्यांदा एक दिवस डोकं खाजवतं आणि मग केस गळू लागतात. मला मोठं टक्कल पडलं होतं पण आता पुन्हा केस येऊ लागले आहेत. आमच्या गावात खारट पाणी येतं, त्यामुळेही असं होऊ शकतं. डॉक्टरांनी अजून याचं कारण शोधून काढलेलं नाही. केसगळीतला घाबरून काहीजणांनी थेट टक्कल करण्याचा निर्णय घेतला. टक्कल केल्यानंतर डोक्याची खाज कमी झाली आणि पुन्हा केस नियमित वाढू लागले असंही एका रुग्णाने सांगितलं.
केसगळतीचा त्रास सुरु झाल्यानंतर टक्कल केलेल्या मारुती इलामे यांनी सांगितले आहे की, “आठ ते दहा दिवसांपूर्वी मला केसगळतीचा त्रास सुरु झाला. डोकं खाजवू लागलं आणि मग मी टक्कल केलं. केस एवढे गळत होते की, केसाचं पुंजकच हातात येत होतं. आता डोक्याची खाज बंद झाली आहे आणि पुन्हा केस वाढत आहेत. टक्कल केल्यापासून डोक्याला कसलाही त्रास नाही. मी कसलाच शाम्पू वापरत नाही.
गेल्या काही दिवसांत तिन्ही गावांतील शेकडो नागरिकांची केस गळती झाली आहे. त्यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय आहे. हा प्रकार होऊनही आरोग्य विभाग अनभिज्ञ आहे. त्यामुळे नागरिक खासगीत उपचार घेत आहेत. शाम्पूने असा प्रकार घडत असावा, असे डॉक्टरांचे मत असले तरी कधीही आयुष्यात शाम्पू न वापरणाऱ्या नागरिकांचेही केस जात असल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
तसेच तीनही गावातील केस गळतीच्या समस्येबाबतची माहिती मिळताच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक गावात पोहचले. त्यांनी सर्वेक्षणासोबतच आरोग्यविषयक सल्ला दिला आहे. लक्षणानुसार औषधोपचारही सुरू केला. या समस्येवर त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेतला जात आहे.
बुलढाणा येथे कोणत्या कारणांमुळे आजाराची लागण झाली हे पाहू
या गावात पाणी अतिशय खारट असल्याचे बोलले जात आहे.या गावातील पाण्याचा स्रोत दूषित आहे का तसेच पाण्याचा जडपणा मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. तसेच डॉक्टरांचे म्हणणं आहे हे काही शाम्पू वापरण्यात आल्यामुळे किंवा पाणी खराब असल्यामुळे टक्कल पडत आहे. परंतु आता या गावातील रिपोर्ट अजून आलेले नाही. तर काही डॉक्टरांचे म्हणणे असे आहे की एकाच कुटुंबात एकच टॉवेल किंवा कंगवा वापरल्याने देखील केस गळती होत आहे. तर बहुतांश रुग्णांना हिवाळ्यामध्ये होणाऱ्या टीनिया कॉर्पोरीस, टीनिया कॅपेटीस, पिटिरीयासीसी कॅपेटीस अशा आजारांची लागण झाल्याचं दिसून येत आहे.तर मंडळी अशा केस गळतीचा प्रकार चालू झाला आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये. सध्या सगळीकडेच थंडी आहे आणि थंडीच्या दिवसात केसांमध्ये थोड्याफार प्रमाणात कोंडा झालेला दिसून येतो. त्यामुळे अशा आजारांपासून वाचण्यासाठी योग्य ती काळजी घ्या. आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये नक्की टक्कल हा व्हायरस आला आहे की पाणी किंवा शाम्पू ने केस गळत आहे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून कळवा.

Exit mobile version