Site icon

भूम परांडा विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024, Bhoom Paranda Assembly


धाराशिव  जिल्ह्यातील भूम परांडा हा विधानसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहिलेला आहे. तसेच सध्या पावसाचे दिवस चालू आहेत आणि धरण फुटी, धरण वर फ्लो होणे  ह्या गोष्टी होत असतात. मागील काही वर्षांपूर्वी  अशीच एक घटना घडली होती . त्यावेळी उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम परंडा येथील विद्यमान आमदार तानाजी सावंत यांनी एक वाक्य बोललं होतं ते म्हणजे खेकड्याने पोखरल्यामुळे धरण फुटले यामुळे तानाजी सावंत हे सोशल मीडिया वरती चांगलेच  ट्रोल झाले होते आणि ते खूपच चर्चेत आले होते. चला तर पाहूयात धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा येथे येणाऱ्या आगामी विधानसभा मतदारसंघासाठी येथील निवडणुकीचे वातावरण एकंदरीत कसे आहे.
परांडा हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे.  परांडा विधानसभा मतदारसंघ  २४३ आहे. परांडा मतदारसंघात उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा, भूम आणि वाशी या तालुक्यांचा समावेश होतो. परांडा हा विधानसभा मतदारसंघ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात मोडतो. शिवसेनेचे तानाजी जयवंत सावंत हे परांडा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. तानाजी सावंत हे शिवसेना शिंदे गट या पक्षाचे उमेदवार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे तानाजी जयवंत सावंत 1,06,674 मते मिळवून विजयी झाले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे मोटे राहुल महारुद्र यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे मोटे राहुल महारुद्र 78,548 मते मिळवून विजयी झाले होते. भूम परंडा हा तसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचा बालेकिल्ला मानला जायचा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असणारे तानाजी सावंत यांना संधी मिळत नसल्यामुळे 2016 च्या आसपास यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना रामराम करून त्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. त्यामुळे ते शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्यासाठी काम करू लागले. थोड्या दिवसात तानाजी सावंत हे उद्धव ठाकरे यांच्या फारच जवळचे झाले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांना विधान परिषदेवर घेतले. परंतु तानाजी सावंत यांना लोकांची मतदान घेऊन त्यांना निवडून यायचं होतं त्यासाठी त्यांनी 2019 मध्ये भूम परंडा येथे शिवसेनेकडून तिकीट मिळवले आणि ते भूम परंडा येथे जिंकून सुद्धा आले.
तानाजी सावंत यांच्या रूपात शिवसेना  या पक्षाला भूम परंडा येथे एक संधी मिळाली. परंतु शिवसेना फुटी नंतर तानाजी सावंत यांनी एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचे ठरवले आणि ते शिंदे यांच्या पक्षात सहभागी झाले. चला तर पाहुयात भूम परांडा येथील राजकीय  इतिहास. भूम परंडा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा .राहुल मोटे हे  सलग तीन टर्म आमदार म्हणून राहिलेले आहेत. फक्त 1995 साली शिवसेनेचे ज्ञानेश्वर पाटलांनी या मतदारसंघात आमदारकी मिळवत भूम परंडा येथे शिवसेनेने पहिल्यांदा आपला झेंडा फडकवला. राहुल मोटे आमदार असताना देखील ज्ञानेश्वर पाटलांनी त्यांच्या हातात सत्ता नसून देखील मतदारसंघावरची पकड सैल होऊ दिली नव्हती. तर ज्ञानेश्वर पाटलांना उमेदवारी मिळून सुद्धा राहुल मोटे यांना मात देता येत नव्हती. या सर्वच गोष्टींचा फायदा घेत तानाजी सावंत यांनी शिवसेना या पक्षात प्रवेश करत विधानपरिषदेची आमदारकी मिळवली. त्यानंतर त्यांनी कॅबिनेट मंत्री पदही मिळवले.
या सर्व गोष्टींमुळे भूम परंडा येथे ज्यांनी शिवसेनेचा पहिल्यांदा झेंडा फडकवला असे ज्ञानेश्वर पाटील राजकारणात मागे पडत गेले. तर तानाजी सावंत यांच्या चेहरा समोर येत गेला. त्यामुळे 2019 मध्ये ज्ञानेश्वर पाटील यांचे तिकीट कट करून शिवसेना या पक्षाने तानाजी सावंत यांना तिकीट दिले होते. त्यामुळे 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे तानाजी सावंत विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल मोठे अशी लढत झाली होती. सलग तीन टर्म आमदार राहुल मोटे यांचा पराभव करत तानाजी सावंत यांनी मागील विधानसभेला बाजी मारली. कारण राहुल मोठे हे पंधरा वर्षे आमदार असून देखील त्यांनी विकास काम,  पाणी प्रश्न, रस्ते अशा समस्या सोडवण्यात ते कुठेतरी कमी पडले होते.  याचाच फायदा तानाजी सावंत यांनी उचलला त्यांनी शिवजल क्रांतीच्या माध्यमातून सिंचनाची कामे केली. नदी खोलीकरण केले , तसेच सामूहिक विवाह सोहळे पार पाडले , दुष्काळामध्ये सामान्य जनतेला मदत केली .चारा छावणी तसेच साखर कारखाना यामधून शेतकऱ्यांना मदत केली. त्यामुळे तानाजी सावंत यांनी स्वतःच्या बेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तयार केला .परंतु याचा फायदा शिवसेनेने घेतला. कारण तानाजी सावंत यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे भूम परंडा हे राष्ट्रवादी काँग्रेसचा असलेला बालेकिल्ला शिवसेनेच्या हाती गेला.
परंतु शिवसेना फुटी नंतर तानाजी सावंत यांनी एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचे ठरवले आणि ते शिवसेना एकनाथ शिंदे या गटामध्ये सामील झाले. त्यामुळे भूम परंडा येथील मतदार नाराज दिसत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकी मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना भूम परांडा या मतदारसंघाने सर्वात मोठे लीड  दिले आहे. यावरून समजत आहे की येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणूक मध्ये तानाजी सावंत यांना मतदारांकडून किती मते भेटतील ? असा प्रश्न पडू लागला आहे.  तर शिवसेना ठाकरे गटाकडून ज्ञानेश्वर पाटील हेही विधानसभेची तयारी करत आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून राहुल मोठे हे आघाडीवर आहेतच. तसेच या तीनही पक्षांमध्ये अनेक उमेदवार इच्छुक असल्याचे चर्चा आहेत .परंतु आता भूम परंडा ही जागा महाविकास आघाडीमध्ये कोणाला भेटेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच महायुतीमध्ये आता शिवसेना शिंदे गटाकडून तानाजी सावंत हे विद्यमान आमदार आहेत .परंतु येथे श्रीकांत शिंदे यांचे वर्गमित्र राहुल घुले हेही या मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे . त्यामुळे आता महायुतीकडून ही जागा कोणाला सुटते आणि ते कोणत्या उमेदवाराला तिकीट भेटेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर मंडळी तुम्हाला काय वाटते भूम परंडा येथे कोण निवडून येईल. हे आम्हाला कमेंट्स करून सांगा.

Exit mobile version