अहिल्यानगर: येथील सप्तरंग थिएटर्स आणि बीपीएचई सोसायटीचे सीएसआरडी महाविद्यालय अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई येथील ज्येष्ठ नाट्यकर्मी अरुण कदम यांच्या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा पूर्णपणे मोफत असून नाट्य क्षेत्रात आवड असणाऱ्या नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सप्तरंग थिएटर्सचे अध्यक्ष डॉ. श्याम शिंदे व सीएसआरडी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पठारे यांनी केले आहे. ही कार्यशाळा सोमवार दि. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत गोल्डन जुबिली हॉल, सीएसआरडी महाविद्यालय , अहमदनगर कॉलेज समोर अहील्यांनगर येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
यामध्ये पाश्चिमात्य ते पौर्वात्य नाट्य कलेविषयक मार्गदर्शन केले जाणार आहे. जागतिक रंगभूमी, भरतमुनी, अश्वघोष ते कालिदासापासूनची समृध्द परंपरा असलेला भारतीय नाट्यशात्र, चीन, जपानी रंगभूमीवरील पौर्वात्य नाट्यविचार आणि ग्रीक-रोमन, शेक्सपिअर, स्तानिस्लावस्की, पीटर ब्रूक यांचा पाश्चात्य रंगविचार या दोन्हींचा तौलनिक मागोवा यावेळी घेण्यात येणार आहे. नाटक हे माध्यम लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, तंत्रज्ञ यांच्याकरिता सैध्दांतिक व प्रात्यक्षिक या दोन्ही अंगांनी उलगडत नेणे हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश आहे. सर्व प्रशिक्षणार्थीना सहभाग प्रमाणपत्र मिळणार असल्याची माहिती या कार्यशाळेचे समन्वयक संजय लोळगे, डॉ. सुनील कात्रे व कल्पेश शिंदे यांनी दिली आहे.