Site icon

रायगड जिल्हा विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024, Raygad District Assembly Election


आज आपण पाहणार आहोत स्वराज्याची पहिली राजधानी असलेला जिल्हा तो म्हणजे रायगड जिल्हा. रायगड जिल्हा याबद्दल बोलायचं झालं तर जेवढे बोलू तेवढे कमीच असेल. कारण रायगड जिल्हा याला इतिहासही तसाच मोठा आहे. 1984 साली इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशभर पसरलेल्या सहानुभूतीच्या लाटेनं काँग्रेसला अभूतपूर्व यश मिळवून दिलं, पण रायगडमध्ये लाट चालली नाही आणि शेतकरी कामगार पक्षाचे दि. बा. पाटील हे काँग्रेसचा पराभव करत संसदेत पोहोचले होते. रायगड जिल्ह्यातील राजकारण पाहायचं झालं तर फारच गुंतागुंतीचे असलेले दिसून येतं. रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांपैकी तीन आमदार शिंदे गटाचे, तर ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि भाजपचा प्रत्येकी एक-एक आमदार आहे. रायगडे ते पक्ष फुटी पर्यंत सर्व काही ठीक होतं परंतु पक्ष फुटी नंतर शिवसेनेच्या आणि नंतर राष्ट्रवादीच्या फुटी नंतर इथली राजकीय समीकरणे पूर्णपणे बदललेली दिसत आहेत.
नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये रायगड येथे दोन विधानसभा मतदारसंघ सोडले तर चार विधानसभा मतदारसंघ येथे महाविकास आघाडी यांनी बाजी मारली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये सात विधानसभा मतदारसंघ आहेत. श्रीवर्धन कर्जत अलिबाग पेन, पनवेल, महाड , उरण असे सात विधानसभा मतदारसंघ हे रायगड जिल्ह्यामध्ये येतात.
 चला तर पाहूया पहिला विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे श्रीवर्धन
हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ  क्रमांक १९३ आहे. श्रीवर्धन मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील १. श्रीवर्धन, २. म्हसळा ३. तळा ही तालुके आणि ४. रोहा तालुक्यातील रोहा महसूल मंडळ आणि रोहा अष्टमी नगरपालिका, ५. माणगांव तालुक्यातील माणगांव महसूल मंडळ यांचा समावेश होतो. श्रीवर्धन हा विधानसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघात मोडतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदिती सुनिल तटकरे ह्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत. श्रीवर्धन हा विधानसभा मतदारसंघ पहिला शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा.
2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती सुनील तटकरे यांनी शिवसेनेच्या विनोद रामचंद्र घोसाळकर यांचा 39621 मतांनी पराभव करत या जागेवर विजय मिळवला. 1995 ते 2009 पर्यंत  शिवसेनाच्या ताब्यात असलेली जागा 2009 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने ताब्यात घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे तटकरे सुनील दत्तात्रे यांनी २००९ च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे सुनील तटकरे हे रायगड येथून जिंकून आले आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये असे दिसून येत आहे की पक्ष फुटीचा जास्त काही परिणाम रायगड या जिल्ह्यामध्ये झालेल्या दिसत नाहीये. रायगड जिल्ह्यातील मतदार आजही सुनील तटकरे यांच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे आदिती तटकरे यांना श्रीवर्धन येथून ही निवडणूक जिंकण्याची जास्त संधी आहे तसेच महाविकास आघाडी कडून आदिती तटकरे यांच्या विरोधात उभा करण्यासाठी पाहिजे तसा चेहरा महाविकास आघाडीच्या बाजूने दिसत नाहीये. त्यामुळे आता महाविकास आघाडी कडून कोणत्या नवीन चेहऱ्याला संधी भेटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच श्रीवर्धन येथील मतदारांनी ठरवले नवीन चेहऱ्याला संधी देण्याची,  तर आदिती तटकरे यांना ही निवडणूक वाटते तेवढे सोपे ही जाणार नाहीये.
आता पाहुयात दुसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे कर्जत
 हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघ  क्रमांक १८९ आहे.  कर्जत मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील १. कर्जत तालुका आणि २. खालापूर तालुक्यातील वावशी, खोपोली ही महसूल मंडळे आणि खोपोली नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. कर्जत हा विधानसभा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघात मोडतो. शिवसेनेचे महेंद्र सदाशिव थोरवे हे कर्जत विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. महेंद्र सदाशिव थोरवे हे शिवसेना शिंदे गट या पक्षाचे उमेदवार आहेत.  2019 मध्ये शिवसेनेचे महेंद्र सदाशिव थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेशभाऊ नारायण लाड यांचा 18046 मतांनी पराभव करून विजय मिळवला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभा (खासदार) मतदारसंघातून शिवसेनेचे संजोग भिकू वाघेरे पाटील (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांचा पराभव करून 96615 मतांनी विजय मिळवला.
कर्जत विधानसभा मतदारसंघात सलग दोन वेळा आमदार निवडून येण्याची परंपरा असून तिसऱ्या वेळी येथील मतदार हे बदल घडवत असल्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे. विद्यमान आमदार सुरेश लाड हे सलग दोनदा निवडून आलेले आहेत. तर याआधी शिवसेनेचे देवेंद्र साटम हे सलग दोनदा निवडून आलेले होते. कर्जत विधानसभा मतदारसंघात रसायनी, खालापूर, खोपोली हा भाग औद्योगिक क्षेत्र आहे. मात्र असे असतानाही अनेक कंपन्या बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे येथील बेरोजगार तरुणांना नोकरीसाठी मुंबई पुणेकडे जावे लागत आहे. रस्त्याचा प्रश्नही बिकट आहे. कर्जत खालापूर मध्ये आदिवासी समाज हा मोठ्या प्रमाणात असल्याने त्याचे अनेक मूलभूत प्रश्न अधोरेखित राहिलेले आहेत. कर्जत येथील निवडणूक जिंकण्याच्या परंपरेनुसार शिवसेना शिंदे गटाचे धर्मेंद्र सदाशिव थोरवे हे पुन्हा एकदा जिंकून येणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच आता महाविकास आघाडी कडून येथे कोणाला संधी भेटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आता पाहुयात पुढील विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे अलिबाग
  हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. अलिबाग विधानसभा मतदारसंघ क्रमांक १९२ आहे. अलिबाग मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील १. अलिबाग तालुका, २. मुरुड तालुका आणि ३.रोहा तालुक्यातील चणेरे महसूल मंडळ यांचा समावेश होतो. अलिबाग हा विधानसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघात मोडतो. शिवसेनेचे महेंद्र हरी दळवी हे अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे दळवी महेंद्र हरि 1,11,946 मते मिळवून विजयी झाले. भारतीय शेतकरी आणि कामगार पक्ष पक्षाचे सुभाष ऊर्फ पंडितशेठ पाटील यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. विजयाचे अंतर: 32,924 मते. एवढे होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे सुभाष ऊर्फ पंडितशेठ पाटील 76,959 मते मिळवून विजयी झाले. शिवसेना पक्षाचे दळवी महेंद्र हरि यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. विजयाचे अंतर: 16,094 मते. एवढे होते. त्यानंतर शिवसेना पक्ष फुटी नंतर महेंद्र दळवी यांनी शिवसेना शिंदे गट यांना साथ देण्याचे ठरविले.
महेंद्र दळवी यांनी शेतकरी कामगार पक्ष तसेच महाविकास आघाडी च्या नेत्यांची पंगा घेतलेला आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुनील तटकरे हे महायुतीकडून जिंकून आलेले आहेत त्यामुळे अलिबाग येथे सध्यातरी महायुतीच्या बाजूने वारे आहे असे दिसत आहे.  अलिबाग मध्ये ही पक्ष फुटीचा फारसा काही परिणाम झालेला जाणवत नाही त्यामुळे सध्यातरी महेंद्र दळवी हे सेफ झोन मध्ये आहेत.  परंतु आता अलिबाग या जागेसाठी भाजप पक्षाकडून भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईरे हे उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. तसेच शेतकरी कामगार पक्षाकडून चित्रलेखा पाटील माजी आमदार पंडित पाटील एडवोकेट आस्वाद पाटील इच्छुक आहेत काँग्रेसकडून प्रदेश सचिव एडवोकेट प्रवीण ठाकूर यांनी उमेदवारीची मागणी केलेली आहे. त्यामुळे आता शिंदे गटाच्या महेंद्र दळवी विरुद्ध कोण किंवा महायुतीमधून नक्की तिकीट कोणाला भेटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आता पाहूया पुढील विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे पेण
 हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. पेण विधानसभा मतदारसंघ क्रामांक १९१ आहे.  पेण मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील १. सुधागड तालुका, २. पेण तालुका आणि ३. रोहा तालुक्यातील महसूल मंडळ नागोठणे आणि कोलाड ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. पेण हा विधानसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघात मोडतो. भारतीय जनता पक्षाचे रविंद्र दगडू पाटील हे पेण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. 2019 मध्ये, भारतीय जनता पक्षाचे रविशेठ पाटील यांनी 24051 मतांच्या फरकाने भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाचे धैर्यशील मोहन पाटील यांचा पराभव करून जागा जिंकली. पेन हा विधानसभा मतदारसंघ गेली 40 वर्ष शेतकरी कामगार पक्ष यांचा बालेकिल्ला होता.
परंतु 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप या पक्षाने येथे आपले कमल फुलवले. त्यामुळे आता शेतकरी कामगार पक्षाकडून ही जागा पुन्हा मिळवण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले जातील. तसेच भाजप या पक्षाला ही जागा इथे पुन्हा एकदा जिंकून आणता येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर शेकाप कडून 2019 मध्ये लढलेले उमेदवार धैर्यशील पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे आता एकंदरीत पाहता महायुतीची ताकद वाढली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून भाजप पक्षाचे रवीशेठ पाटील यांच्याविरुद्ध महाविकास आघाडी कडून कोणाला तिकीट भेटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आता पाहुयात पुढील विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे उरण
 हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. उरण विधानसभा मतदारसंघ क्रमांक १९० आहे. उरण मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील १. उरण तालुका आणि २. खालापूर तालुक्यातील चौक महसूल मंडळ आणि ३. पनवेल तालुक्यातील ओवळे, पोयंजे ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. उरण हा विधानसभा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघात मोडतो. अपक्ष उमेदवार महेश बालदी हे उरण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. शिवसेनेच्या मनोहर भोईर यांचा मागच्या निवडणूकीत 5 हजार 710 मतांनी पराभव झाला. त्यामुळे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाची देखील मोठी ताकद या मतदार संघात असल्याचे दिसून आले.  मनोहर भोईर यांचा निसटता पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता.  यंदाच्या  निवडणूकीत पुन्हा ते उभे राहणार असल्याची जोरदार चर्चा आहे. तर तिसरीकडे शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या नावाची देखील शेकापमधून जोरदार चर्चा आहे.
परंतु नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अनंत गीते यांना उरण येथून तब्बल 13000 च लीड मिळाले आहे त्यामुळे आता इथे महाविकास आघाडी कडून लढण्यासाठी इच्छुकांची गर्दी जमत आहे. परंतु विधान परिषदेच्या निकालानंतर महाविकास आघाडीमध्येही मतभेदाचे वारे वाहू लागले आहेत कारण विधानपरिषद निवडणूकमध्ये जयंत पाटील यांचा पराभव झाला. या पराभवाला उद्धव ठाकरे हेच जबाबदार आहेत अशा चर्चा उरण पेन येथील शेतकरी कामगार पक्षाचे नेते करू लागले आहेत. त्यामुळे येथील मतदार आता उद्धव ठाकरे यांच्यावरती नाराज झाल्याचे दिसत आहेत तसेच उद्धव ठाकरे यांना साथ द्यायची नाही असेही ते बोलू लागले आहेत. त्यामुळे आता नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जरी उद्धव ठाकरे गट आनंद गीते यांना जास्त लीड मिळाले असले तरी विधानसभेला मात्र शिवसेना पक्षाचे उमेदवार मनोहर भोईर यांना आता इथून लढण्यासाठी निवडणूक सोपे जाणार नाहीये. त्यामुळे साहजिकच याचा फायदा अपक्ष म्हणून निवडून आलेले महेश बालदी यांना होऊ शकतो. उरण येथील विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार मनोहर भोईर काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत सेखापचे राजेंद्र पाटील हे इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.
तर आता उरण येथील मतदार नक्की कोणत्या पक्षाला आणि कोणाला निवडून देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आता पाहुयात पुढील विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे पनवेल
 हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघ क्रमांक १८८ आहे.  पनवेल मतदारसंघात रायगड जिल्ह्याच्या पनवेल तालुक्यातील तळोजा, मोर्बे, पनवेल ही महसूल मंडळे आणि पनवेल नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. पनवेल हा विधानसभा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघात मोडतो. भारतीय जनता पक्षाचे प्रशांत रामशेठ ठाकूर हे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा पक्षाचे प्रशांत रामशेठ ठाकूर 1,79,109 मते मिळवून विजयी झाले..भारतीय शेतकरी आणि कामगार पक्ष पक्षाचे हरेष मनोहर केनी यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे प्रशांत रामशेठ ठाकूर 1,25,142 मते मिळवून विजयी झाले. भारतीय शेतकरी आणि कामगार पक्ष पक्षाचे बाळाराम दत्तात्रेय पाटील यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.
भाजप पक्षाचे प्रशांत रामशेठ ठाकूर हे सलग तीन टर्म  येथे आमदार म्हणून राहिलेले आहेत. एकेकाळी शेकापमध्ये असलेल्या प्रशांत ठाकूर यांनी बाहेर पडत काँग्रेसमधून 2009 साली तर भाजपातून 2014 साली आमदरकी पटकावली होती. त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून प्रशांत ठाकूर यांच्याविरुद्ध महाविकास आघाडी कडून कोण असा प्रश्न आहे.  परंतु महाविकास आघाडी कडून बाळाराम पाटील हे इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. पनवेल येथे जर भाजपकडून प्रशांत ठाकूर यांच्याविरुद्ध महाविकास आघाडी कडून बाळाराम पाटील यांना उमेदवारी भेटली तर येथील लढत अतितटीची पाहायला मिळणार आहे. तसेच प्रशांत ठाकूर यांना आता चौथ्यांदा ही मतदार जिंकून देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आता पाहुयात पुढील मतदार संघ तो म्हणजे महाड
 हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. महाड विधानसभा मतदारसंघ क्रमांक १९४ आहे.  महाड मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील महाड आणि पोलादपूर ही दोन तालुके आणि माणगांव तालुक्यातील निजामपूर आणि गोरेगांव ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. महाड हा विधानसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघात मोडतो. शिवसेनेचे भरतशेठ मारुती गोगावले हे महाड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. 2009 साली महाड मतदारसंघातून शिवसेनेनं भरत गोगावलेंनी तिकीट दिलं आणि ते जिंकलेही.  2009 नंतर 2014 आणि 2019 अशा सलग तीन वेळा भरत गोगावले यांनी महाडची आमदारकी एकहाती जिंकत आले आहेत. माणिकराव जगताप यांनी प्रत्येक वेळेस झुंज दिली.  पण ती अपयशी ठरली. दरम्यानच्या काळात माणिकराव जगताप यांच्या निधनानंतर महाडमध्ये गोगावलेंना म्हणावा असा  प्रतिस्पर्धी उरला नाही. पण शिवसेनेत फूट पडणं,  गोगावले शिंदे गटात जाणं. यामुळे महाड मधील शिवसेना दुभंगली आहे . गोगावलेंची ताकद कमी झाली आहे  हरकत नाही.
कारण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये  महाड मधून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना गोगावले अवघ तीन हजाराचं निसटत लीड देण्यात यशस्वी झाले आहेत. त्यात जगतापांची कन्या स्नेहल जगताप यांनी आमदारकीचं मैदान तापवल्याने जगताप विरुद्ध गोगावले अशी महाडमध्ये घासून लढत होऊ शकते. तर असा होता रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांचा येणाऱ्या निवडणुकीतला सविस्तर राजकीय आढावा. तर मंडळी तुम्हाला काय वाटतं रायगड या जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघ मध्ये कोण आमदार होईल हे आम्हाला कमेंट्स करून सांगा.

Exit mobile version