Site icon

वास्तवपट: स्वरूप आणि संकल्पना (Documentary – Nature and Idea)- Dr. Bapu Chandanshive


२१व्या शतकामध्ये अनेक संवादाची माध्यमे नव्याने निर्माण झाली. मानवी संवाद व्यवहार अधिक चांगला व्हावा यासाठी त्यांचा उपयोग होताना दिसतो. मुद्रित माध्यमे, प्रसार माध्यमे आणि नवीन माध्यमे (न्यू मीडिया) संवाद प्रक्रियेत नवनवीन बदल घडवून चांगल्या व वेगवान संवादासाठी प्रयत्नशील आहेत. भारतासारख्या विशाल व लोकसंख्येनेही मोठा असलेल्या देशामध्ये “संवाद व्यवहाराशी” संबंधीत तंत्रज्ञानासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. २०१५ या वर्षामध्ये माध्यमामधील एकूण गुंतवणूक ही एक लाख ७६ हजार कोटी रुपये इतकी होती. याचा अर्थच असा की, माध्यम वाढीच्या दृष्टीने अत्यंत पोषक असे वातावरण आहे. माहिती, मनोरंजन व प्रबोधन अशी उद्दीष्टे असलेली माध्यमे मनोरंजनाला सर्वाधिक प्राधान्य देताना दिसतात. मालिका, रिअॅलिटी शो, स्पर्धात्मक कार्यक्रम, संगीत व चित्रपट या भोवतीच सध्या अधिक प्रमाणात माध्यमे वावरताना दिसतात. जगामध्ये चित्रपट माध्यमाचा एक मोठा प्रेक्षकवर्ग आहे. हा प्रेक्षक नियमितपणे आपल्या अभिरुचीप्रमाणे चित्रपट पाहत असतो. चित्रपट सुध्दा केवळ मनोरंजनाचे माध्यम नाही, तर ते शिक्षण, प्रबोधन व वास्तवाची जाण करुन देणारे आणि भविष्याबाबत भाष्य करणारे प्रभावी माध्यम आहे. जगामध्ये २०व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच चित्रपट निर्मितीने वेग घेतला होता. याच कालखंडामध्ये भारतामध्येही चित्रपट निर्मितीची प्रक्रिया सुरु झालेली होती आणि त्यादृष्टीने वेगवेगळे प्रयोगही होत होते. दादासाहेब फाळके यांनी १९१३ मध्ये भारतातील पहिला चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ बनवला. सुरुवातीला ‘मुकपट’ असल्यामुळे भारतातील दिग्दर्शकांनी लोकांना माहित असलेल्या पुराणकथा व ऐतिहासिक घटनावर चित्रपट निर्माण केले. १९४० नंतर मात्र चित्रपटांच्या विषयाबाबत विविधता यायला सुरुवात झाली.दरम्यान वास्तवपट या संकल्पनेचा उदय झालेला होता. दृकश्राव्य माध्यमाच्या शोधानंतर प्रथम जे काही चित्रीत केले गेले त्यास वास्तवपटच म्हणावे लागते. उदाहरणार्थ, ल्युमिअर बंधूनी चित्रीत केलेल्या छोटया-छोटया चित्रफिती हया वास्तवपटच आहेत. १८९५ ते १८९८ च्या दरम्यान ल्युमिअर बंधूनी अशा अनेक चित्रफिती बनवल्या. त्यामध्ये दुरवरून स्टेशनमध्ये येणारी रेल्वे, एका गिरणी मधून बाहेर पडणारे कामगार, पळणारा घोडा इत्यादी वास्तवपट हे वास्तव घटनांवर आधारित होते. वास्तव घटना, सत्य प्रसंग व माणसे यांचा त्यामध्ये समावेश असतो. हे ज्यावेळी लोकांना कळले त्यावेळी जगातील वेगवेगळया वास्तव गोष्टी, घटना, व्यक्तीचरित्र्य पाहण्यासाठी लोक अतुर झालेली दिसतात. विशेषत: युरोप, अमेरिका यासारख्या प्रदेशातील प्रेक्षक माहितीपटांकडे चित्रपटाइतकेच आकृष्ट होतात आणि अभ्यास व विश्लेषणाच्या दृष्टीने पाहतात. भारतामध्येही चित्रपट निर्मितीच्या पूर्वीच वास्तवपटनिर्मितीला सुरुवात झालेली होती.

हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर उर्फ सावेदादा यांनी १८९८ च्या आसपास मुंबईच्या हॅगींग गार्डनमध्ये झालेल्या कुस्तीवीर दादा व कृष्णा न्हावी याच्यातील कुस्तीचे चित्रण केले. लंडनहून आणलेल्या त्याच्या कॅमे-यातून चित्रित झालेल्या या कुस्तीचे ते लंडनला पाठवून प्रक्रिया करतात व एडिटींग करुन १८९९ मध्ये ‘दोन कुस्तीवीर’ या नावाने भारतातील पहिला वास्तवपट प्रदर्शित करतात. त्याही आधी महाराष्ट्रातील महादेवराव पटवर्धन यांनी १८९४ साली साधी चित्रे चलत प्रक्रियेत आणून ‘शांबालिक खरोलिका’ नावाचा चलत चित्रक तयार केलेला होता. आपल्या ‘पट माहितीचा’ या पुस्तकात कुंदा प्रमिला निळकंठ म्हणतात की, “एखादा वास्तवपटकार कुठल्याही विचारांची अथवा ‘इझमशी’ बांधिलकी मानणारा असला, तरी त्याच्या माध्यमामध्ये प्रेक्षकाच्या मनात ‘चिंतनाचे बीज’ पेरण्याची तयार असतेच. म्हणजेच वास्तवपट हा प्रबोधन तर करतोच पण विचारही करायला लावतो. अंर्तमुखही करतो. म्हणूनच थोर वास्तवपटकार व विचारवंत जॉन ग्रीअर्सन हे वास्तवपट म्हणजे “क्रिएटीव्ह ट्रीटमेंट टू अॅक्च्युअॅलिटी” असे म्हणतात. वास्तवपटाचे वास्तवपटकाराने सर्जनशील भूमिकेतून केलेले दृष्यरुपी निरुपण म्हणजे वास्तवपट होय आणि वास्तव हीच या माध्यमाची शक्ती आहे. वास्तवपटकार हा वास्तवपटाच्या रुपाने कोणताही तपशील हा वस्तुनिष्ठ किंवा व्यक्तीनिष्ठ पध्दतीने प्रेक्षकासमोर ठेवतो. प्रेक्षक आपले स्वत:चे तारतम्य वापरुन वास्तवपटाचे विश्लेषण करतात.”

ब्रिटनमधील अभ्यासक व वास्तवपटकार ‘पॉल रोथा’ यांच्यामते, “वास्तवपट हे नैतिक अधिष्ठानावर आधारलेले व जीवनावर भाष्य करणारे असतात. “त्यांच्यामते, वास्तवपटातून वास्तवाची जाणीव तर होतेच त्याचबरोबर ते प्रेक्षकांना एका नैतिक स्थानावर नेऊन ठेवतात. म्हणजेच वास्तवपटाचे चित्रण व संकलन करताना सर्जनशीलता अभिव्यक्त व्हायला हवी. खरंतर प्रेक्षकाला विचार करायला लावणे व त्यासाठी मूल्यावर आधारित भूमिका घेणे हे वास्तवपटाचे महत्त्वाचे कार्य आहे. संगीत, काव्यात्मकता, ताल व चित्रपटाप्रमाणे थ्री अॅक्ट स्ट्रक्चरप्रमाणे मांडणे आवश्यक आहे. आज याबाबींचा वास्तवपटकार उत्तम पध्दतीने उपयोग करताना दिसतात. समीर शिपूरकरांचा ‘मूलगामी’ किंवा आनंद पटवर्धन यांचा ‘जयभिम कॉम्रेड’ हे वास्तवपट कलात्मक व सृजनशील वास्तवपटांचे नमुनेच आहेत. आजचा वास्तवपट मानवी जीवन, प्राणी, पक्षी, जल, जमीन, पर्वत ते युध्दापासून ते आत्मकथनात्मक वास्तवपटापर्यंत असंख्य विषय हाताळलेले दिसतात. नॅशनल जिओग्राफी, हिस्टरी, अॅनिमल प्लॅनेट, नॅशनल जिओग्राफी वाईल्ड इ. चॅनेल्सवरुन जगात घडलेल्या व घडत असलेल्या घडामोडीवर असंख्य वास्तवपट दाखविले जातात. पाण्याच्या खाली, कीर्र जंगल, दलदल, पर्वतरांगा, नदया- द-या बरोबरच, वादळ, त्सुनामी, विविध घटना व दुर्घटना वास्तवपटकार चित्रित करताना दिसतात. कुंदा प्रमिला निळकंठ यांनी ‘पट माहितीच्या’ या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे ‘शांबालिक खरोलिका’ हा वास्तवपट काचेच्या प्लेट्सवर वेगवेगळया पोझमधील माणसांची रंगीत चित्र चितारुन ती काचेच्या कंदिलाशी साधर्म्य सांगणा-या स्लाईड प्रोजेक्टरद्वारे लोकांना दाखवून माणसे हालचाल करीत असल्याचा आभास निर्माण करण्यात आला होता. या प्रयोगात सूत्रधार व संगीताच्या मदतीने रामायणातील एक कथा सांगण्याचा प्रयत्न केला गेला होता. याच वास्तवपटाचा प्रयोग १८९५ मध्ये इंडियन नॅशनल कॉग्रेसच्या अधिवेशनावेळी दाखविण्यात आलेला होता. सावे दादांनी सुरुवातीला ‘माकड आणि माणूस’ नावाचा लघुपट बनविला. यातून त्यांनी न्यूजरीळचा पाया घातला – भारतातील गणितज्ञ रँगलर परांजपे यांना केंब्रिज विद्यापीठाने इंग्लडचे राजे तिसरे एडवर्ड यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे संपूर्ण चित्रिकरण सावे दादांनी केले होते व ते संकलन करुन भारतामध्ये दाखविले होते. सावेदादानंतर मुंबईतील इंजिनियर एफ. बी. ठाणावाला यांनी मे १९०१ मध्ये ‘स्प्लेंडीड व्हयुज ऑफ बॉम्बे’ नावाचा मुंबईची उत्तम दृष्टये दाखविणारा वास्तवपट तयार केला. हिरालाल सेन यांनी हीच वास्तवपट निर्मितीची चळवळ बंगालमध्ये सुरु केली. पुढे बंगाली वास्तवपटकार जे. एफ. मदान यांनी ‘दिल्ली दरबार’ व ‘ग्रेट बंगाल पार्टिशन मुव्हमेंट’ हया लघुपट व वास्तवपटांची निर्मिती केली.

दादासाहेब फाळके १९१२ मध्ये इंग्लडला गेले. त्यांनी तिथे जावून चित्रपट निर्मितीबाबत अभ्यास केला आणि माघारी परतताना चांगला कॅमेरा घेवून आले. पुढे त्यांनी पुढच्याच वर्षी ‘राजा हरिश्चंद्र’ हा भारतातील पहिला चित्रपट बनविला. दादासाहेब फाळके यांनी जवळपास ३० हून अधिक वास्तवपट बनविले. त्यामध्ये शिक्षण, प्रबोधन, कला, क्रीडा इ. विषय त्यांनी हाताळले. २१ व्या शतकातील नवीन विषयाची जाणवी घेवून येणारे व चांगल्या तंत्रज्ञानाची जोड मिळालेल्या वास्तवपटामध्ये लोकांना विचार करायला लावण्याची ताकद आहे. काही वास्तवपट प्रेक्षक स्वत:हून पहायला जात आहेत किंवा पाहण्यासाठी धडपड करत आहेत. २५-३० वर्षापूर्वी प्रेक्षक मात्र सिनेमागृहातील ‘इंडियन न्यूज’ मध्ये दाखविले जाणारे वास्तवपट संपल्यावरच सिनेमा पहायला जात असत. याचे कारण म्हणजे वास्तवपटाबरोबर दाखविल्या जाणा-या ‘न्यूजरीळ’चे स्वरुप इतके प्रचारकी व केंद्र किंवा राज्यातील सत्तेवर असलेल्या शासनाची व राजकीय व्यवस्थेचे प्रचंड प्रमाणात खूशामत करणारे होते.

१९५२ मध्ये वास्तवपट सिनेमागृहात दाखविण्याची सिनेमा मालकांना सक्ती करणारा कायदा करण्यात आला. पण पंतप्रधान, राष्ट्रपतीचे विविध देशाअंतर्गत व विदेश दौरे, सरकारी विकास कामाची सरभरीत व अतिशयोक्तीपूर्ण वर्णने, प्रमाणापेक्षा अधिक देशाच्या स्वातंत्र्याचे व लढयाचे चित्रण, किंवा गुणगाण, वारंवार दाखविले जात होते. लोकांना प्रत्यक्ष देशातील वातावरण परिस्थिती व वास्तवपटातूनदाखविली जाणारी स्थिती किंवा उत्साहवर्धक चित्रणे यामध्ये मोठा फरक आहे हे जाणवत होते. त्यामुळे वास्तवपटप्रदर्शन चित्रपट गृहात सक्तीचे करणे याचा उलटा परिणाम झाला. मागील पिढीतील लोकांच्या मनामध्ये वास्तवपटाबद्दल कायमची नकारात्मक भावना निर्माण झाली. १९७२-७३ दरम्यान तर हास्यास्पद अशीच परिस्थिती होती. दुष्काळामुळे हजारो लोकांचे हाल होत होते, काहींचे भूकबळी जात होते. अशावेळी सिनेमागृहात लोकं पोखरणची अणुचाचणी, राजकारण्यांचे दौरे, विकास कामे यांचे भरमसाठ व चीड आणणारे कौतुक लोकांना पाहवे लागत होते. यामुळे सातत्याने सरकारची बाजू घेणारे, संस्कृतीचे उदात्तीकरण करणारे, अवाजवी गोडवे गाणा-या वास्तवपटया प्रकाराबद्दलच लोकांमध्ये नकारात्मक भावना निर्माण झाली. साधारणपणे १९९० नंतर वास्तवपट निर्मितीचे स्वरुप व विषयही बदलले. डॉ. डी. व्ही. पथी, एस. सुखदेव, हिरलेकर, तपन सिन्हा यासारख्या हौसी, पण तितक्याच ताकदीने वास्तवपट या माध्यमाला हाताळणारे वास्तवपटकार १९९० पूर्वीच काम करीत होते. या वास्तवपटकारांचेही वास्तवपट प्रेक्षकांनी सिनेमागृहात पाहिले. त्यामुळे किमान पातळीवर प्रेक्षकांची वास्तवपटाबद्दल अभिरुची टिकून राहिली. १९९० नंतर डॉ. जब्बार पटेल, आनंद पटवर्धन, अरुण खोपकर, के. स्टॅलिन, अतुल पेठे, हेमंत चतुर्वेदी, रंजन पलीत, नलिनी सिंग, गार्गी सेन, श्री प्रकाश, संजो सिंग, अन्वर जमाल, अनुराग सिंग इ. वास्तवपटकारांनी वास्तवपट या माध्यमास पुन्हा नव्याने लोकाभिमूख बनविले. जातीमुळे निर्माण झालेले प्रश्न, दलितांवरील अत्याचार, कामगारांचे प्रश्न, स्त्री वरील अत्याचार, राजकीय उदासिनता, दुष्काळ, मानवी तस्करी, बालमजुरी, पर्यावरण, अविकास इ. प्रश्नांबाबत किंवा विषयावर वास्तवपट निर्माण झाले हे वास्तवपट थेट लोकांमध्ये जावून त्यांच्या मनातील प्रश्नावर काम करु लागले. त्यामुळे २१ व्या शतकात चित्रपट महोत्सव, माध्यमांचे अभ्यासक्रम चालविणारे विदयापीठे, महाविद्यालये, विविध सामाजिक चळवळी चालविणा-या संस्था, संघटना, यांच्या माध्यमातून लोकांना वास्तवपट, पुन्हा पुन्हा पहायला मिळायला लागले. ‘जय भीम कॉम्रेड’, ‘मुज्जफरनगर बाकी है’, ‘राम के नाम’ किंवा ‘इंडिया अनटच्ड’ यासारख्या वास्तवपटाच्या प्रदर्शनानंतर विविध बाजूंनी त्यावर चर्चा होऊ लागल्या. त्यामुळे वास्तवपट या वास्तववादी व्यवस्था व बाजू मांडणा-या माध्यमाविषयी तरुणपिढी व विविध प्रबोधनात्मक चळवळीमध्ये काम करणा-या लोकांना वास्तवपटांनी आकृष्ट केलेले दिसते. १९९० नंतर दुरचित्रवाणी वाहिन्यावरुन वास्तवपट प्रसारित होऊ लागले. विशेषत: अमेरिकेतील ‘सी.एन.एन.’ व इंग्लंडमधील ‘बी.बी.सी.’ या वृत्तवाहिन्यांनी विविध विषयावरील ‘न्यूजरिल’ अर्थात स्पेशल रिपोर्ट आणि त्यांच्या वार्ताहरांनी तयार केलेले वास्तवपट प्रसारीत करु लागले. मग १९९० नंतर झालेले गल्फ वॉर, विविध देशामधील युध्दे, भूकंप, त्सुनामी, महाप्रलय, पुलांचे निर्माण, मोठ मोठया वास्तुचे निर्माण, राजकीय घटना, स्पेशल रिपोर्ट व वास्तवपटाच्या माध्यमातून दाखवायला सुरुवात केली. हे वास्तवपट आधुनिक तंत्रज्ञान वापरुन व वास्तवपट निर्मितीच्या पारंपरिक पध्दतीला बाजूला सारुन नवीन पध्दतीने मांडले जावू लागल्याने ते प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले. ११ सप्टेंबर २००१ साली अमेरिकेतील ‘वल्ड ट्रेड सेंटर’ वर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या घटनेवर १० हून अधिक वास्तवपट निर्माण केलेगेले.

प्रत्येक वास्तवपटकाराने आपापला विचार व दृष्टीकोन समोर ठेवून हे वास्तवपटतयार केले. त्यातील बरेचसे दूरचित्रवाणी वाहिन्यावरुन प्रसारित झाले आणि प्रेक्षकांनी अत्यंत काळजीपूर्वक व जाणीवपूर्वक पाहिले. भारतातमध्ये वास्तवपट दिग्दर्शक निर्माते हे एक तर ते पत्रकार आहेत किंवा व्यावसायिक वास्तवपटकार आहेत किंवा जाणीवपूर्वक समाजातील प्रश्नांना हात घालून त्यातून समस्या मांडण्या बरोबरच एक विचारही देणारे काही वास्तवपटकार आहेत. यामध्ये काही संदेश देणारे व समस्या मांडून एक विधान लोकांपर्यत पोहोचविणारे वास्तवपट निर्माण होऊ लागले. परंतू ब-याच वेळा ओढून ताणून संदेश देणारे व त्यामुळे सामाजिक जाणिव जपणा-या वास्तवपटांचीही निर्मिती होऊ लागली. असे वास्तवपट मात्र प्रेक्षकांना फारसे पसंद पडलेले दिसत नाहीत. अनेकांनी १९६०-७० च्या दशकात वास्तवपटातून ‘नववास्तवाद’ (निओरिअॅलिझम) मांडण्याचा प्रयत्न केला. पण पुढील एक-दोन दशकात अनेक वास्तवपटकारांनी कृत्रिम तंत्राचा वापर वास्तवपटामध्ये न करता कॅमे-याने चित्रित केलेले वास्तव हेच सत्य व वस्तुनिष्ठ असते हे स्वीकारले. ‘संकलन’ आणि तंत्रज्ञानाच्या पातळीवरील दिग्दर्शकांची मध्यस्थी उत्तर आधुनिकतावाद्यांनी नाकारली. त्यामुळे वास्तवपटाला प्रचारकी स्वरुप येते, असे त्यांचे म्हणणे होते. उत्तर आधुनिकतावाद्यांच्या मते, ‘सामान्य माणसाचे जीवन सामान्यच असते. त्यामुळे ते आहे त्याच स्वरुपात खूप काही सांगून जात असते, तर त्यावर मुठभर बुध्दिवादयांचे विश्लेषण लादून त्याला प्रचारकी कशाला बनवायचे?’ ‘माहितीपट’ या मराठी शब्दाचे इंग्रजीतील ‘डॉक्युमेंटरी’ या शब्दाचे भाषांतर आहे. माहितीपटातून माहिती मिळणे अभिप्रेत आहे. पण आज माहितीपट हा केवळ माहिती देणारा, कंटाळवाणा, एकसुरी आणि कोरडा राहिलेला नाही. तो अधिक सृजनशील आणि कलात्मक झालेला आहे. त्यामुळे माहितीपट हे भाषांतर आज पूर्णपणे अचूक वाटत नाही. याशिवाय मुंबई येथील फिल्म डिव्हीजनचे माहितीपटकार पुरूष बावकर यांनी त्यांच्या ‘अनुबोधपट : काल आणि आज’ या पुस्तकात माहितीपटाला ‘अनुबोधपट’ असा प्रतिशब्द वापरला आहे. अनुबोधपट हा शब्द ‘संदेश’ किंवा ‘बोध’ घेण्याशी निगडीत आहे. हेही तितकेच अक्षेपाहार्य आहे. कारण प्रत्येक माहितीपटातून बोध किंवा काही सकारात्मक किंवा नकारात्मक संदेश मिळतोच असे नाही. तर माहितीपटकार माहितीपटात वस्तुनिष्ठ पद्धतीने वास्तव मांडत असतो. म्हणजेच माहितीपट हा केवळ माहिती देत नाही किंवा त्याच्यातून प्रत्येकवेळी बोध होईलच असेही नाही. उदाहरणार्थ, हिस्टरी किंवा नॅशनल जिओग्राफी आदी वाहिन्यावरून प्रसारित माहितीपट हे केवळ माहिती देत नाहीत किंवा ते बोधपर काही संदेशही प्रत्येकवेळी देत नाहीत. तर ते माहितीपट वास्तव दाखवत असतात. कोणताही माहितीपट घटना, प्रसंग, व्यक्ती, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, पर्यावरणीय स्थिती आदी बाबतचे वास्तव प्रेक्षकांच्या समोर मांडतो. त्यामुळे माहितीपटाला ज्या पद्धतीने “माहितीपट” किंवा “अनुबोधपट” असे शब्द आहेत. या शब्दांची अधिक व्यापकता दर्शविण्यासाठी ‘वास्तवपट’ अधिक संयुक्तिक वाटतो. हा शब्द वस्तुनिष्ठता आणि वास्तव दर्शवितो. तो रियालीटी (Reality किंवा Real- Film) या इंग्रजी भाषेतील शब्दाचा मराठी प्रतिशब्द आहे. हे शब्द केवळ डॉक्युमेंटेशन दर्शवित नाहीत तर कोणत्याही प्रकारच्या वास्तवाशी किंवा ख-या गोष्टीशी निगडीत आहेत. त्यामुळे ‘माहितीपट’ किंवा ‘अनुबोधपट’ या शब्दाला प्रतिशब्द ‘वास्तवपट’ हा अधिक समर्पक असल्याचे दर्शवितो आहे. जगात घडलेली किंवा घडत असणारी कोणतीही वास्तव घटना काळ आणि वेळेचा विचार करून वस्तुनिष्ठ, कलात्मक, सर्जनशील व रंजक पद्धतीने ज्या दृकश्राव्य माध्यमातून प्रेक्षकांसमोर सादर केली जाते, त्यास ‘वास्तवपट’ असे म्हणतात. वास्तवपट हा शब्द वास्तवाशी नाते सांगतो. वास्तव कायमच गंभीर असू शकत नाही. त्यामुळे माहितीपट या शब्दाऐवजी ‘वास्तवपट’ शब्द अधिक योग्य वाटतो. कोणतीही वास्तव घटना मांडणारे माध्यम म्हणून आपण वास्तवपटाकडे पाहू शकतो. आज आपण एम. एस. धोनी, २६/११, गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. प्रकाश बाबा आमटे आदी चित्रपट हे वास्तवपटच आहेत. त्याच बरोबर अतुल पेठे यांचे कचरा कोंडी व सेझ, आनंद पटवर्धन यांचे राम के नाम, जयभीम कॉम्रेड आदिही वास्तवपटच आहेत. झिगा वर्तोव्ह या रशियन वास्तवपटकाराने ‘सिनेमा व्हरायटे’ या संकल्पनेला जन्म दिला. ‘सिनेमा व्हरायटे’ म्हणजे कॅमे-याद्वारे टिपलेले वास्तव. झिगा वर्तोव्हच्या मते, “कॅमे-याच्या तुलनेत माणसाच्या डोळयाला मर्यादा आहेत. माणसाचा डोळा जे पाहू शकत नाही अशी भौतिक वस्तुस्थिती कॅमेरा टिपत असतो. त्यामुळे आधुनिक सिनेमातंत्रात दिग्दर्शकाने संकलनाच्या पातळीवर आपल्या भूमिकेशी फारशी ढवळाढवळ न करता किंवा केवळ नाटयपूर्ण मनोरंजनावर भर न देता, वस्तुनिष्ठपणे कॅम-याने टिपलेली माहिती लोकांना देणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.” वर्तोव्हची हीच भूमिका ‘सिनेमा व्हारायटे’ नावाने प्रसिध्द आहे. त्याने पुढे याच तत्त्वाच्या आधारे ‘मॅन वुइथ द मूव्ही कॅमेरा’ या नावाचा प्रसिध्द असा वास्तवपट बनवला. झिगा वर्तोव्ह यांच्या मते, दिग्दर्शकाने विषयाच्या पातळीवर फारशी ढवळाढवळ न करता प्रेक्षकावर अंतिम निर्णयाची जबाबदारी सोपविणे आवश्यक आहे. त्याच्या या तंत्राचा वापर बरेच वास्तवपटकार आजही करताना दिसतात. स्टॅलिन के., आनंद पटवर्धन हे भारतीय वास्तवपटकार व पाकिस्तानी दिग्दर्शिका सबीहा सुमार (डोन्ट आस्क मी व्हाय?) यांनी आपल्या अनेक वास्तवपटामध्ये ‘सिनेमा व्हरायटे’ किंवा ‘किनो आय’ या तंत्राचा वापर केलेला दिसतो. साधारणपणे १९५० नंतर सिनेमा क्षेत्रामध्ये जागतिक पातळीवर आधुनिकवाद, नववास्तवाद व उत्तर आधुनिकतावादाची अनेक प्रभावी लक्षणे दिसू लागली. १९५० व ६० च्या दशकामध्ये भारतीय वास्तवपट चळवळ मानववंश, पर्यटन, औदयोगिक विकासाचा प्रसार-प्रचार व सरकारी कामाचे प्रदर्शन या विषयाभोवतीच फिरत राहिली. सरळ सरळ माहिती देणे, ओढून ताणून संदेश देणे, आणि सरकारी मूल्ये संभाळणे यातच अनेक वास्तवपट अडकून पडलेले दिसतात. साधारणपणे १९८० च्या दशकापर्यंत भारतीय

वास्तवपटामध्ये फारसे नाविन्यपूर्ण बदल झाले नाहीत. तोपर्यत ९० टक्केहून अधिक वास्तवपटही सरकारी यंत्रणाच बनवित होती. त्यामुळे तोचतोपणा त्यात मोठया प्रमाणात दिसत होता. भारतामध्ये आणीबाणीच्या काळात मोठया प्रमाणात सामाजिक व राजकीय घुसळण झाली. साहित्य, कला, चित्रपट क्षेत्रानेही कात टाकली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे महत्त्व लोकांना पटले. पूर्वी फक्त सामाजिक व राजकीयदृष्टया हितावह वास्तवपटाची निर्मिती व प्रदर्शनालाच परवानगी मिळत असे. मात्र आणीबाणीच्या काळातील माध्यमावरील नियंत्रणामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत विचार करणारे अनेक कलावंत कठोर सेन्सॉरशिपच्या विरोधात काम करायला लागले. याचा परिणाम म्हणून भारतीय सेन्सॉरशिपचे स्वरुपही बदलले व ते ब-याच प्रमाणात शिथिलही झाले. त्यामुळे भारतीय वास्तवपटकार वेगवेगळया स्वतंत्र विषयावर वास्तवपट निर्मितीच्या दिशेने काम करु लागले. डॉ. जब्बार पटेल, प्रेम वैद्य, तपन बोस, आनंद पटवर्धन, रंजन पलित, मणी कौल, कुमार शहानी, श्याम बेनेगल, अरुण खोपकर, विजया मुळे, सुहासिनी मुळे इ. वास्तवपटकारांनी नवीन वास्तवपट चळवळीचा पाया घालता. या वास्तवपटकारांनी समाजातील विविध विषयांना हाताळले. समाजकारण, राजकारण, सांस्कृतिक बदल, आदिवासी, कामगार, कलाकार इ. विषय हे या वास्तवपटकारांनी कलात्मक पध्दतीने हाताळले.

१९९० च्या दशकात जागतिकीकरण त्यामुळे वर्गीय व्यवस्थेमधील वाढत्या दरीला झालेली सुरुवात, वर्ण व वंश पातळीवरील विषमता, दलितावरील अन्याय व अत्याचार, स्त्रीयांची अघोरी पिळवणूक इ. विषय हे वास्तवपटाचे विषय होऊ लागले. बालकामगार, कारखान्यातील कामगारांचे शोषण इ. विषयावरील वास्तवपटगरीबी, विषमता आणि विवषता दाखवू लागले. म्हणजे १९९० च्या नंतर वास्तवपटाच्या लोकशाहीकरण व सार्वजनिकीकरणाला प्रारंभ झाल्याचे दिसते. चित्रपट किंवा लघुपट हे कोणाही व्यक्तीचे तर वास्तवपट हे केवळ सरकारचे माध्यम आहे. हा विचार मोडीत निघाला. मुंबई स्थित “नॅशनल फिल्म्स डिव्हीजन” च्या संचालकपदी नवीन पिढीचे संचालक आल्यामुळे वास्तवपट निर्मितीच्या आणि सेन्सॉरशिपच्या अनुषंगाने मोठे बदल झाले. वर्तमानपत्रातून जाहिरात देवून वास्तवपट बनविण्यास उत्सुक असणा-याकडून अर्ज मागवून त्याच्यामधून निवडलेल्या वास्तवपटकारास वास्तवपटाच्या लांबीनुसार अनुदान देण्यास प्रारंभ केला. सन १९८८ पासून फिल्म डिव्हीजनच्या वतीने मुंबई येथे वास्तवपट, लघुपट व अॅनिमेशनपट महोत्सवाची सुरुवात केली. या आंतरराष्ट्रीय महोत्सवामुळे भारतीयांना जगातल्या विविध कलाकृती पहायला मिळायला लागल्या आणि त्यामुळे वास्तवपटाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्यास मदत झाली. पुढे हा महोत्सव दर दोन वर्षानी आयोजित केला जावू लागला. वास्तवपटांचा इतिहास जवळपास १२५ वर्षाचा आहे. म्हणजेच १९व्या शतकाच्या शेवटच्या दशकात सुरु झालेल्या वास्तवपटाचा प्रवास आज २१ व्या शतकाच्या दुस-या दशकामध्ये अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर आहे. वास्तवपट माध्यमाने मागील १०० वर्षामध्ये विविध स्थित्यंतरे अनुभवली आहेत. या दरम्यान वास्तव कथा किंवा सत्य घटना सांगण्यासाठी दृकश्राव्य माध्यम म्हणून वास्तवपट वेगवेगळया पातळयावर भूमिका पार पाडत राहिला. पण वास्तवपट म्हणजे वास्तव, सत्य घटनांचे दृकश्राव्य माध्यमाद्वारे सादरीकरण हा जो त्याचा अर्थ होता तो कायम राहिला. २० व्या शतकात वास्तवपट हे माध्यम विकसित झाले. जगातल्या वास्तव घटना, प्रसंग आणि प्रश्न मांडण्यासाठी सध्यातरी वास्तवपटाइतके सशक्त माध्यम नाही. वास्तवपटाचे २१ व्या शतकातील स्वरुप मात्र वेगवेगळया पातळयांवर बदलेले दिसते. विविध महाविद्यालये, विद्यापीठे आणि खाजगी संस्थामध्ये वास्तवपट हा विषय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यामुळे महाविद्यालयीन काळापासून वास्तवपट संकल्पना आणि स्वरुप समजायला लागल्याने वास्तवपटाबाबत नवीन पिढीमध्ये आकर्षण आहे. त्यांना वास्तवपटतयार करणे हे सक्तीचे असल्यामुळे वास्तवपट संकल्पना, स्वरुप, त्याचे प्रकार, सादरीकरणाची पध्दत, संकलन, चित्रिकरण इ. बाबींचा अभ्यास करावा लगतो. त्याचा नक्कीच उत्तम वास्तवपट निर्मितीसाठी उपयोग होतो आहे. उदा. सावित्रिबाई फुले पुणे विद्यापिठातील संज्ञापन अभ्यास विभागाचा विद्यार्थी प्रांतिक देशमुख यांच्या ‘मातीतील कुस्ती’ या वास्तवपटाला ६६ व्या राष्ट्रीय चित्रपट पारितोषिकामध्ये उत्कृष्ट वास्तवपटाचा पुरस्कार मिळाला. याबरोबरच रवांडा देशातील ग्रॅज्युएशन करणा-या एका विद्यार्थीनीने ‘अॅज वुई फॉर गीव्ह’ नावाचा रंवाडा मधील खेडेगावामध्ये झालेल्या हत्याकांडावर वास्तवपटबनविला. त्याला रवांडासह अमेरिका व इतर देशातही पारितोषिके मिळाली. तसेच अमेरिकेतील पब्लिक ब्रॉड कास्टींग सिस्टमने तिचा वास्तवपट वितरीत करुन तिला तीन लाख अमेरिकन डॉलर्सही मिळवून दिले. भारतातील सरकारी माध्यमांनी माहितीपट या माध्यमाकडे केवळ माहिती देणे व सरकारी योजना, धोरणे, मंत्र्यांचे दौरे यांचा प्रचार-प्रसार करणे एवढया मर्यादेत बघत होते. त्यामुळे वास्तवपट (माहितीपट) एकांगी व कंटाळवाणी झाले. १९९० पर्यत भारतीय प्रेक्षकांनी वास्तवपटाकडे जवळपास पाठच फिरवली होती. मात्र १९९० नंतर स्वतंत्र व फ्रीलान्स पध्दतीने बनविणा-या वास्तवपटाकरांनी मात्र वास्तवपटकेवळ माहिती, आकडेवारी व प्रचारकी बडबड यातून बाहेर काढून कलात्मक व सृजनशील मांडणीकडे नेला. त्यामधून मानवी जीवनाशी संबंधित प्रश्न मांडले गेले पाहिजेत तसेच सदर प्रश्न, समस्या, प्रसंग, मांडताना त्यामध्ये रटाळपणा न येता सृजनशीलता, म्हणजे संगीत, गीते, गाणी इ. चाही समावेश त्यांनी वास्तवपटात केला. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक प्रबोधन करीत असताना लोकांची जाणीव जागृतीही झाली पाहिजे असा विचार केला. त्यामुळे २१ व्या शतकातील दुस-या दशकामध्ये अनेक प्रेक्षक वास्तवपट माध्यमाकडे आकृष्ट होत असून त्या माध्यमाविषयी जाणून घेत आहेत. मानवी संवेदना जागृत करणा-या वास्तवपटासाठी वास्तवपटांचे अभ्यासक पुरुष बावकर यांनी ‘अनुबोधपट’ असा शब्द वापरला आणि तो

वास्तवपटासाठी समानार्थी किंवा आशयानुरुप शब्द असल्याचे दिसते. त्यामुळे माहितीपट हा केवळ माहितीपट न राहता तो ‘अनुबोधपट’ झालेला आहे असे निदर्शनास येते. १९९० मध्ये फिल्म डिव्हीजन, मुंबई मार्फत आंतरराष्ट्रीय वास्तवपट महोत्सवाची सुरुवात झाली. राष्ट्रीय पातळीवर वास्तवपटासाठी नॅशनल फिल्म्स अवॉर्डसमध्ये पारितोषिके ठेवण्यात आली. त्याचबरोबर नंतर भारतातील लहान मोठया अनेक शहरामध्ये चित्रपट महोत्सव सुरु झाले. त्यातील अनेक महोत्सवामध्ये वास्तवपटांचे प्रदर्शन केले जात आहे. त्यासाठी खास वेगळा विभाग अनेक चित्रपट महोत्सवामध्ये ठेवण्यात आलेला आहे. अहमदनगर येथील न्यू आर्टस, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजमधील संज्ञापन अभ्यास विभाग सन २००८ पासून सलगपणे राष्ट्रीय स्तरावरील वास्तवपट व लघुपट महोत्सवाचे आयोजन करीत आहे. यामध्ये चित्रपट, लघुपट व वास्तवपटाचे प्रदर्शन केले जाते. याशिवाय सत्यजित रे फिल्म अॅन्ड टेलिव्हीजन इन्स्टीटयूट, कोलकता, एफ.टी. आय. आय. पुणे इथेही वास्तवपटांचे प्रदर्शन होत असते. महाराष्ट्र व देशपातळीवर कार्यरत फिल्म सोसायटीमध्येही वास्तवपटांचे प्रदर्शन होताना दिसते. यामुळे वास्तवपट वेगाने सामान्य लोकांपर्यत पोहोचताना दिसतो आहे. कुंदा प्रमिला निळकंठ यांच्या मतानुसार जागतिक पातळीवर डिजिटल क्रांतीमुळे तंत्रज्ञान, माहिती व ज्ञानाचे लोकशाहीकरण झाले. वास्तवपटासाठी तर डिजिटल क्रांती वरदान ठरली. कारण कॅमेरे आकाराने लहान झाले. त्यावर सहज डिजिटल चित्रिकरण करता येऊ लागले. त्याचबरोबर आवाजांचे मुद्रणही सहज होऊ लागले. त्यामुळे कॅमेरा गर्दीच्या ठिकाणी, मोर्चामध्ये किंवा गुपचिपपणे चित्रिकरण करण्यासाठी

वापरता येऊ लागला. तसेच एडिटींगही सुलभ व डिजिटल झाले. मॅग्गी स्टॉग्नर यांच्यामते, ‘२१ व्या शतकातील तांत्रिक क्रांतिमुळे नवीन संधी उपलब्ध झाल्या. वास्तवपटकांरासाठी वेगवेगळे घटक, सामाजिक माध्यमे आणि इन्टरनेट वरील वेगवेगळया सुविधा यामुळे वास्तवपट माध्यमाने माध्यमांतर, आंतरसंवादी आणि वेगाने वाढणारे व प्रसार होणारे माध्यम म्हणून ओळख निर्माण केली. त्यामुळेच आपण निर्माण करीत असलेल्या तसेच वितरीत करीत असलेल्या वास्तवपटामध्ये बदल झाले. ते बदल केवळ कथेबाबत नव्हते तर कोण गोष्ट सांगतो आहे? कोण पाहतो आहे? आणि कोण त्यामध्ये सहभागी होतो आहे? यामध्ये सुध्दा बदल झाला. याबदलामुळे आज वास्तवपट प्रेक्षकांना पाहण्यासाठी युटयूब सारख्या माध्यामावर असंख्य प्रमाणात उपलब्ध आहेत. लाखो लोक ते पाहत आहेत. याशिवाय अनेकांनी वास्तवपट युटयुब चॅनेल्स निर्माण करुन त्यावर अपलोड केलेले आहेत. अनेक वेबसाईटवरही वास्तवपट पाहता येवू शकत आहेत. त्यामुळे वास्तवपट हा केवळ मुठभर प्रेक्षकांनी पाहण्याचा विषय राहिलेला नाही. याचबरोबर दूरचित्रवाणी वाहिन्यावरील एपिक चॅनेल, नॅशनल जिओग्राफी, हिस्टरी, नॅशनल जिओग्राफी वाईल्ड, अॅनिमल प्लॅनेट इ. दूरचित्रवाणी वाहिन्यावरुन कोटयावधी लोक दररोज वास्तवपट पाहत असतातच’.

२१ व्या शतकातील वास्तवपटांचा अभ्यास केल्यास दिसून येते की, वास्तवपटांचे विविध प्रकारचे विषय आहेत, त्यांचे कथनाचे विविध प्रकार आहेत. तंत्रज्ञान उपलब्धतेमुळे वास्तवपट निर्मिती सोपी झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये डॉ. जब्बार पटेल, आनंद पटवर्धन, सुखदेव यांनी २० व्या शतकाच्या उत्तरार्धात आखून दिलेली वास्तवपट निर्मितीची रुपरेषा २१ व्या शतकात अतुल पेठे, अरुण खोपकर, अभिजित सौमित्र, शिल्पा बल्लाळ, समीर शिपूरकर, इ. मराठी वास्तवपटकार पुढे नेताना दिसतात. अस्पर्श झालेले सामाजिक, राजकीय विषय ते हाताळत आहेत. स्त्रीयांचे प्रश्न, कामगार, कष्टकरी, शेतकरी, बालके, शहरी व ग्रामीण भागातील विविध प्रश्न ते या माध्यमातून हाताळताना दिसत आहेत. विविध शैक्षणिक संस्थामधून शिक्षण आणि प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेले अनेक तरुण स्वत:चा जीव धोक्यात घालून वास्तवपट बनवित आहेत. राष्ट्रीय स्तरावर पाहिले तर स्टॅलिन के, श्रीप्रकाश, गोपाल शर्मा, आशिष खेतान, सुहासिनी मुळे, याप्रमाणेच सध्या तरुण- तरुणी जाणीवपूर्वक विषय निवडून वर्षानुवर्षे एखाद्या वास्तवपटावर संशोधन करुन वास्तवपट निर्मिती करत आहेत. आनंद पटवर्धन, स्टॅलिन के. सारख्या वास्तवपटकारांचा त्यांच्यापुढे आदर्श आहेच, पण उपलब्ध तंत्रज्ञान आणि बदलेली सामाजिक, राजकीय स्थितीचा विचार ते अधिक गांभिर्याने करताना दिसत आहेत. वास्तवपट अर्थात अनुबोधपट हा दृकश्राव्य माध्यमातील अत्यंत सशक्त आणि विशेषत: तिस-या जगाचे नेटके दर्शन घडविणारा प्रकार आहे. म्हणजेच वास्तवपटाचे काम केवळ माहिती देणे हे नसून सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थिती प्रेक्षकांसमोर मांडणे, त्यातून प्रेक्षकांचे प्रबोधन करणे किंवा समस्याबाबत संवेदनशील बनविणे, वस्तुस्थितीची जाणीव करुन देणे आणि बघितलेल्या घटना, प्रसंग किंवा प्रश्नाबाबत सर्वसमावेशक चर्चा करण्यास भाग पाडणे हे १९९० नंतरच्या वास्तवपटांचे प्रमुख कार्य बनलेले दिसते. प्रचारकी वास्तवपट, शैक्षणिक वास्तवपट, कलावादी वास्तवपट, वस्तुनिष्ठतावादी म्हणजेच ‘सिनेमा व्हरायटे’ पध्दतीचे वास्तवपट, चरित्रात्मक वास्तवपटाबरोबरच सामाजिक उपयुक्ततावादी वास्तवपटांची निर्मिती जागतिक पातळीपासून ते स्थानिक पातळीपर्यत होतांना दिसते. वास्तवपट या दृकश्राव्य माध्यमाचे स्वरुप अभ्यासणे आवश्यक आहे. मुळातच दृकश्राव्य माध्यमाची सुरुवात वास्तवपट माध्यमाच्या रुपाने झाली. दृकश्राव्य माध्यमांमध्ये विविध प्रकार आहेत. लघुपट, वास्तवपट, चित्रपट, मालिका, रिपोर्ट, बातम्या, रिअॅलिटी शो, टॉक शो, पॅनल डिस्कशन या आणि अशा विविध माध्यम प्रकारामधून वास्तवपट हे माध्यम नेमके काय आहे? त्याचे स्वरुप, वास्तवपटाची वैशिष्टये आणि त्याचा मूळ गाभा अर्थात संकल्पना काय आहे? हे अभ्यासणे आवश्यक आहे. १९९० नंतर एकूणच जागतिक स्थरावरील वास्तवपटांचे आशय व विषयानुसार स्वरुप झपाटयाने बदलत गेले. जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरणामुळे याचा परिणाम व प्रभाव वास्तवपट निर्मितीवर पडला. श्रीमंत-गरीब दरी वाढली. अविकसित देशातील प्रश्न माध्यमात येऊ लागले. भूक बळी, गरीबी, स्त्रीयांवरील अत्याचार, दलितांवरील अत्याचार, नैसर्गिक व अनैसर्गिक आपत्ती याचे चित्रण वास्तवपट व चित्रपटांच्या माध्यमातून येऊ लागले. मराठी वास्तवपटांनीही पारंपरिक फॉरमॅट सोडून अधिक सामाजिक व वास्तववादी मांडणीकडे मोर्चा वळविला. आनंद पटवर्धन, अतुल पेठे, समीर शिपूरकर, डॉ. जब्बार पटेल, शिल्पा बल्लाळ इ. वास्तवपटकारांनी वास्तवपटांचे विविध विषय हाताळले. १९९० नंतर ख-या अर्थाने डिजिटल क्रांतीला सुरुवात झाली. विशेषत: हयुज्युअल म्हणजेच दृकश्राव्य चित्रिकरण, एडीटिंग आणि त्यावरील प्रक्रिया सोपी झाली. चित्रिकरणाची साधने स्वस्त झाली. त्यांची उपलब्धता वाढली. १९९० सालानंतर तर तंत्रज्ञानाचे मोठया प्रमाणात लोकशाहीकरण झाले. सामान्य व्यक्तिकडे चित्रिकरणाची साधने आली. मराठीतील वास्तवपटकारांनी या संधीचा उत्तम उपयोग करुन वास्तवपटांची निर्मिती केली. ऊस तोडणी कामगारांपासून ते मुंबईच्या झोपडपट्टीत राहणा-या माणसाची कथा व व्यथा या माध्यमाने जगासमोर आणली. १९९० नंतर मराठी वास्तवपटामध्ये चित्रिकरण, एडिटींग, प्रकाश योजना, संगीत, आवाज इ. बाबतीत अमुलाग्र बदल झाले.

जगभर वास्तवपट माध्यमाबाबत विविध स्तरावर व विविध क्षेत्रातील लोक सातत्याने लेखन करीत असतात. मराठी वास्तवपटांचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर काही प्रमाणात एक प्रकारचा ठसा आहे. वास्तवपटकार वास्तवपट दिग्दर्शित करतांना त्याचा एखादया विषयाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन असतो. हा दृष्टीकोन वास्तवपटकाराच्या धारणा व विचार पध्दतीवर अवलंबून असतो. याशिवाय वास्तवपटाबाबत लेखक, समीक्षक, संशोधक, पत्रकार लिहित असतात. किंवा बोलतही असतात. या व्यक्तीचे वास्तवपट या माध्यमाविषयी काय मत आहे? त्यांना माध्यमांचे विषय, आशय, मांडणी, चित्रिकरण, एडिटींग, प्रचार- प्रसार इ. बाबत काय वाटते? यावर त्यांचे काय मत आहे? हे जाणून घेणे आवश्यक आहे. जरी वास्तवपट या माध्यमाचा इतिहास दीर्घ स्वरुपाचा असला तरी लोकप्रियता आणि प्रचार- प्रसारामध्ये बराचसा मागे आहे. आपल्या देशामध्ये वास्तवपट या माध्यमाबाबत अनेक समजुती, गैरसमजुती आहेत. त्याचप्रमाणे भारतीय व्यक्ती किंवा प्रेक्षक हा मनोरंजन, संगीत व गाणी याचा असिम चाहता आहे. त्याला पडदयावर रटाळ, कंटाळवाणे आणि मनोरंजनाची बिजे नसलेले कार्यक्रम किंवा चित्रपट, मालिका पहायला आवडत नाहीत. भारतामध्ये वास्तवपट प्रदर्शनासाठी एकही थिएटर नाही. कारण त्यांना प्रेक्षक मिळत नाहीत. अर्थातच भारतामध्ये वास्तवपटाची गोडी प्रेक्षकांना खूप कमी प्रमाणात आहे. त्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. वरील मुद्दयांचा विचार करता वास्तवपट त्याच्यामध्ये असलेले सामाजिक प्रबोधनाचे मूल्य त्या सामाजिक मूल्यांचे संवर्धन करणारे, सामाजिक प्रथा- परंपरामधील चुकीच्या, अमानवी गोष्टी उघड करणारे,राजकीय, धार्मिक, आर्थिक परिस्थीतीचा वेध घेणारे आणि सामान्य प्रेक्षकांना जागृत करणारे माध्यम असल्यामुळे ‘माध्यम’ म्हणून याचे महत्त्व अधिक आहे.

-डॉ. बापू चंदनशिवे
माजी विभाग प्रमुख
संज्ञापन अभ्यास विभाग
(Mass Communication)
न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहिल्यानगर
९९२१२५३९७९

 


Exit mobile version