शेतकरी कर्जमाफी वाद चिघळणार? शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन महायुतीचे सरकार विसरले?

महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुका पार पडून जवळपास दोन महिने होत आले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये सत्ता निवडून आल्यानंतर आम्ही लाडकी बहीण योजना,  शेतकऱ्यांची कर्जमाफी याबाबत आश्वासन देण्यात आली होती. निवडणुकीच्या आधी देण्यात आलेल्या  लाडकी बहिण योजना, शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनामुळे महायुती निवडून आली. परंतु आता शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन आपण शेतकऱ्यांना दिले आहे हेच ते विसरत चालले आहे असे दिसत आहे.
लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांची कर्जमाफी यासारखी आश्वासनं देऊन महायुतीचं सरकार सत्तेत आलं. मात्र आधी तिजोरीत पैसे नसल्यानं कर्जमाफीसाठी 4 ते 6 महिने वाट बघावी लागेल असं विधान काही दिवसापूर्वी पुण्यातल्या कार्यक्रमात कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंनी केलं होतं. मात्र आता असं आश्वासन आपण दिलंच नव्हतं असं अर्थमंत्री अजित पवार म्हणताहेत. तेव्हा महायुतीतच आश्वासनांच्या बाबतीत एकवाक्यता नाही का, की तुमची आश्वासनं तुम्ही निस्तरा असा महायुतीतल्या मित्रपक्षांचा पवित्रा आहे का असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडलाय.
चला तर पाहूया शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत नक्की चाललय काय ?
राज्यात मोठ्या बहुमताने महायुतीचे सरकार आले असून अद्याप शेतकऱ्यांना दिलेली आश्वासन सरकारने पूर्ण केलेली नाहीत. आमचे सरकार आल्यावर शेतकरी कर्जमाफी करू असे आश्वासन महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी दिले होते. सरकार सत्तेवर येवून जवळपास दोन महिने होत आहेत.मात्र शेतकरी कर्जमाफीवर सरकारने अजून एक शब्द देखील काढलेला नाही,  यावरून विरोधकांनी सरकारला आता घेरण्यास सुरूवात केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आमदार अंबादास दानवे यांनी कर्जमाफीवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी थेट महायुती सरकारवर टीका केली आहे.
महायुतीतील भाजपमधील अनेक नेत्यांयासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल असे आश्वासन दिले होते. मात्र आता राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याचे अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पुण्यातल्या दौंडमधील एका जाहीर कार्यक्रमातल्या एका विधानामुळे कर्जमाफीबाबत संभ्रम निर्माण झालाय.
आता राज्याचे अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी माझ्या भाषणात तुम्ही कधी माझ्या तोंडून कर्जमाफीचा विषय ऐकला का? अंथरूण पाहून हातपाय पसरायचे असतात, असे म्हणत हात वर केले आहेत. यावरून आता कर्जमाफीच्या घोषणेबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
तर राज्याचे कृषिमंत्री माणिक कोकाटे यांनी केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असून कोकाटे म्हणाले की, शेतकऱ्यांमध्येच कर्जमाफी वरून दोन गट आहे त्यामुळे सरकार समोर अडचण निर्माण झाली असून कर्जमाफीची घोषणा करणारे त्याबाबत निर्णय घेतील असे सांगून त्यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
राज्याचे कृषिमंत्री माणिक कोकाटे नाशिकमध्ये एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्यानंतर ते कार्यक्रमांमध्ये बोलताना म्हणाले की , शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यावरून दोन गट शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेले आहेत ज्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरती कर्जाचा डोंगर आहे ते कर्जमाफीची मागणी करत आहे तर दुसरीकडे नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे त्यामुळे सरकारने काय करावे असा प्रश्न सरकार समोर आहे. हा प्रस्ताव कॅबिनेट समोर मंजूर होईल. आमचे वरिष्ठ त्याबाबत निर्णय घेतील.पण हे सर्व बोलत असताना कोकाटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वरती देखील निशाणा साधताना म्हटले आहे की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिलेले नाही याची आठवण मात्र त्यांनी करून दिली. एकूणच राज्याचे कृषिमंत्री माणिक कोकाटे यांची ही भूमिका हात झटकणारी असली तरी सरकारच्या अडचणीमध्ये भर टाकणारी नक्कीच आहे. याच मुद्द्यावरून आता विरोधकांनीही रान उठवायला सुरुवात केली आहे. तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उठवला जाईल असे म्हटले आहे. अंबादास दानवे यांनी देखील महायुतीला आपल्याच आश्वासनांचा विसर पडला आहे. आता ती आश्वासनं पूर्ण करतील का? अशी शंकाच असल्याचे म्हटले आहे.
तसेच शेतकरी सन्मान योजनेतून राज्यातील 1 कोटी 21 लाख शेतकऱ्यांना मदत मिळत होती. आता ती संख्या 81 लाखांवर आणली गेली आहे. जवळपास 40 लाख शेतकऱ्यांना सरकारने कात्री लावली आहे. तर येणाऱ्या काळात देखील लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत ही हेच होणार आहे, असाही दावा दानवे यांनी केला आहे.
तर शेतकऱ्यांना विविध आश्वासने देणारे महायुतीवाले आता सरकार झाले आहेत. पण ते शेतकऱ्यांच्या तोंडाला पानंच पुसतील अशी परिस्थिती आहे. पण विरोधक म्हणून शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे याबाबत आम्ही आवाज उठवणार असल्याचेही दानवे यांनी म्हटलं आहे.
पहिल्यापासूनच माणिक कोकाटे हे परखड बोलणारे आहेत. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावर नाशिकमध्ये देखील कोणी एवढं गंभीर नसलं तरी त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्येच आता नाराजी पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन वादाला सुरुवात होऊ शकते. त्यातच कोकाटे यांनी सरळ बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेचे समर्थन केले असले तरी महायुतीचे घटक असलेल्या भाजपाच्या नेतृत्वावरती निशाणा साधल्याने भाजप काय भूमिका घेते याकडे देखील आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा भाजपच्या जाहीरनाम्यातच उल्लेख होता याची आठवण शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी करुन दिलीय. त्यांनी अनेक दाखले देत अजित पवारांच्या विधानावर नाराजी व्यक्त केलीय. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यात जातीने लक्ष देऊन शेतकऱ्यांची कर्ज माफी करावी नाहीतर जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अनिल देशमुखांनी दिलाय. एकीकडे अर्थमंत्री शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलंच नव्हतं असं म्हणताहेत. त्याला आता त्यांच्याच मित्रपक्षाने आणि मोठ्या भावाने आव्हान दिलंय. अंथरूण बघून पाय पसरण्याऐवजी आम्ही अंथरूनच वाढवू असं भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणालेत. तेव्हा भाजपनं मित्रपक्षाविरोधात थेट भूमिका घेतल्याचं दरेकरांच्या विधानावरुन दिसतंय.
तरी या सर्वांच्या सावळ्या गोंधळामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का हा मोठा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला आहे?.

By satta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *