Site icon

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024, Shrirampur Assembly Election


श्रीरामपूर  हे राहता तालुक्याच्या विभाजना अगोदर सर्वात जास्त साखर कारखाने असलेले भारतातील शहर होते.  ऊस व कांदा हे येथील प्रमुख पिके आहेत. अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन झाल्यास श्रीरामपूर हे जिल्ह्याचे मुख्यालय असेल. श्रीरामपूरला जिल्हा होण्यास लागणाऱ्या सर्व प्रशासकीय इमारती उपलब्ध असून श्रीरामपूरला स्वतंत्र आर टी ओ व उप्पर जिल्हा पोलीस कार्यालय आहेत.  श्रीरामपूर येथे सध्या काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. श्रीरामपूर येथे आमदार लहू कानडे यांना पुन्हा एकदा जिंकण्याची संधी भेटणार का? श्रीरामपूर येथे महायुती मधून जागा कोणाला भेटणार? शिवसेना शिंदे गट की भाजप की राष्ट्रवादी? महायुती मधून श्रीरामपूर या जागेसाठी सर्वजण दावा करताना दिसत आहे. सदाशिव लोखंडे यांचे पुत्र प्रशांत लोखंडे यांना उमेदवारी भेटणार का? यावेळी ससाने गट नक्की कोणाला साथ देणार? चला तर पाहूया श्रीरामपूर येथे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नेमकी कोणते राजकीय खलबत्ते चालू आहेत.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ क्रमांक  २२० हा आहे.  श्रीरामपूर मतदारसंघात अहमदनगर जिल्ह्यातील १. श्रीरामपूर तालुका आणि २. राहुरी तालुक्यातील देवळाली महसूल मंडळ आणि देवळाली प्रवरा नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. श्रीरामपूर हा विधानसभा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती – SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लहु नाथा कानडे हे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. श्रीरामपूर येथील राजकारण  हे आदिक, मुरकुटे आणि ससाणे या गटांभोवतीच फिरत असतं. दिवंगत आमदार आणि साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष जयंतराव ससाणे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना राजकारणातील राम लक्ष्मणाची जोडी म्हणून ओळखलं जायचं.
 1999 साली राष्ट्रवादी स्थापन झाली आणि जयंत ससाणे यांनी राष्ट्रवादीचे त्यावेळचे उमेद्वार भानुदास मुरकुटे यांचा अवघ्या 500 मतांनी पराभव केला. त्यानंतर ससाणे 2004 सालीही पुन्हा आमदार झाले.  2009 साली मतदारसंघ पुनर्रचनेनंतर, श्रीरामपूर अनुसुचित जातीसाठी राखीव झालं आणि ससाणे आणि विखे समर्थक म्हणून ओळख असणारे नगरसेवक भाऊसाहेब कांबळे हे सलग दोन वेळा आमदार झाले. श्रीरामपूरमध्ये २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस विरूद्ध भाजप अशी लढत झाली होती. त्यावेळी काँग्रेस पक्षाचे भाऊसाहेब कांबळे ५७,११८ मतांनी विजयी झाले होते, तर भाजपचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना ११, ४४८ मतांनी पराभव स्विकारावा लागला होता. विखे समर्थक म्हणून कांबळे यांची ओळख होती. आमदार भाऊसाहेब कांबळे यांना २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली होती
श्रीरामपूरमध्ये २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस विरूद्ध शिवसेना अशी लढत झाली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे लहू कानडे ९३,९०६ मतांनी विजयी झाले होते. तर शिवसेना पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे १८,९९४ मतांनी पराभूत झाले होते. बंडखोरीच्या राजकारणानंतर भाऊसाहेब कांबळे यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता. श्रीरामपूर मतदारसंघ हा राखीव झाल्यानंतर माजी आमदार जयंत ससाणे यांनी भाऊसाहेब कांबळेंना आमदारकीसाठी बळ दिले. मात्र, जयंत ससाणेंच्या अखेरच्यावेळी कांबळेंनी त्यांना साथ दिली नाही. त्यामुळे ससाणे गटात नाराजी निर्माण झाली असल्याचे बोलले जाते.
२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत कांबळेंना त्यांच्याच मतदारसंघातुन कमी मते मिळाली होती. २०१९ मध्ये विखे पाटलांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर लोकसभेची राजकीय स्थिती बदलली होती. त्यामुळे येथील स्थिती 2019 च्या विधानसभा निवडणुकीला ही बदलताना दिसली. काँग्रेस पक्षाचे भाऊसाहेब कांबळे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि  हाती शिवबंधन बांधले त्यामुळे शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी त्यांच्या बरोबर तालुक्यातील विखे समर्थक होते. त्याचबरोबर, एकेकाळी विखेंचे विरोधक असलेले भानुदास मुरकुटे यांची देखील ताकद कांबळे यांना होती. कांबळेंना विखे-मुरकुटेंची साथ होती  तरी ससाणे गट आणि शिवसेनेचा एक गट  नाराज होता. भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने काँग्रेसची मोठी अडचण झाली होती.
२०१४ – २०१५ पासून श्रीरामपूर मतदार संघात संपर्क मजबूत करत साहित्यिक लहु कानडेंना बाळासाहेब थोरातांनी पक्षात घेत श्रीरामपुरातुन काँग्रेसची उमेदवारी दिली. नाराज ससाणे गट तसेच राष्ट्रवादीचे नेते अविनाश आदिक यांनी लहु कानडें यांना पाठिंबा दिला. सुशीक्षित आणि सरकार दरबारी काम करवून घेण्याचे कसब असणारा उमेदवार हे मुद्दे घेवून कानडे प्रचाराच्या मैदानात उतरले होते. त्यामुळे श्रीरामपूर येथील मतदारांनी लहू कानडे यांना 2019 मध्ये पसंती दिली त्यामुळे लहू  कानडे यांनी गुलाल उधळला. परंतु आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी श्रीरामपूर या विधानसभा मतदारसंघांमधून निवडणूक लढवण्यासाठी भरपूर जण इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूक मध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे यांनी बाजी मारली.  नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूक मध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली होती. शिर्डी लोकसभा मतदारसंघावर मागील दहा वर्षापासून शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे यांचे वर्चस्व होते. परंतु 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे हे विजयी झाले. त्यामुळे श्रीरामपूर येथील सध्याचे वातावरण पाहता महाविकास आघाडीच्या बाजूने येथील मतदार असल्याचं दिसून आले आहे.
हा निकाल पाहता अहमदनगर जिल्ह्यामधून महायुतीला मोठा धक्का बसलेला आहे. त्यामुळे श्रीरामपूर येथील विद्यमान आमदार लहू कानडे यांचे पारडे सध्या तरी जड दिसत आहे. परंतु झालेल्या पराभवामुळे महायुती ने विधानसभा निवडणुकीसाठी येथे चांगलीच कंबर कसलेली दिसत आहे.  त्यामुळे श्रीरामपूर येथे महायुतीकडून विधानसभेला नक्की कोणाला तिकीट भेटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर  महायुतीकडून श्रीरामपूर या विधानसभा मतदारसंघासाठी माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचे पुत्र प्रशांत लोखंडे हे इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. तर महाविकास आघाडी कडून विद्यमान आमदार लहू कानडे हे पहिले दावेदार असल्याचं समोर येत आहे. परंतु काँग्रेस मधील देशपातळीवर काम पाहणारे हेमंत ओगले हे देखील विधान सभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचं चर्चा आहे. परंतु श्रीरामपूर येथे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा काँग्रेसचे आमदार लहू कानडे यांना तिकीट भेटेल अशी जोरदार चर्चा चालू आहे.
श्रीरामपूर येथील मतदार संघातील विकास कामांबद्दल बोलायचं झाले तर लहू कानडे यांनी श्रीरामपूर या मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात कामांचा निधी आणलेला दिसतो. तसेच भरपूर प्रमाणात कामेही होताना दिसत आहेत परंतु येथील काही महत्त्वाचे प्रश्न अजूनही आहेत ते म्हणजे शेतीसाठी लागणारे पाणी, अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होऊन श्रीरामपूर जिल्हा व्हावा असं सर्वांनाच वाटत आहे. श्रीरामपूर येथे  गुन्हेगारीची समस्या आहे वाढत आहे .तसेच श्रीरामपूर नेवासा जोडणारा रस्ता यांचे चौपदरीकरण व्हावा यासाठी देखील जोर वाढलेला दिसत आहे. एकंदरीत श्रीरामपूर येथे सर्व वातावरण पाहता लहू कानडे यांची पारडे सध्या तरी जड दिसत आहे. त्यामुळे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीकडून कोण उमेदवार असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण महायुतीकडून येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांनी देखील या जागेवर दावा केला आहे. महायुतीकडून शिंदे सेना आणि भाजप दोन्ही देखील विधानसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छूक आहे.
शिंदे गटातील नेते युती माजी आमदार भाऊसाहेब कांबळे आणि माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचे पुत्र प्रशांत लोखंडे यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे.  तर दुसरीकडे भाजपकडून नितीन दिनकर देखील मतदारसंघावर दावा करत आहेत. भाऊसाहेब कांबळे यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या काळात शिंदे गटात प्रवेश केला होता. एकनाथ शिंदे यांनी मला शब्द दिलाय, असा दावा भाऊसाहेब कांबळे करत आहेत. त्यामुळे महायुतीकडून नेमकं कोण श्रीरामपूर विधानसभेच्या रिंगणात उतरणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर मागील निवडणुक वेळी भाजप पक्षाने श्रीरामपूर ही जागा शिवसेना या पक्षासाठी सोडली होती.  त्यामुळे आता महायुतीकडून ही जागा नक्की कोणत्या पक्षाला भेटणार हे पहाणे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत श्रीरामपूर येथील निवडणूक ही अत्यंत चुरशीशी पाहायला भेटणार आहे. त्यामुळे श्रीरामपूर येथे नक्की गुलाल कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. तर मंडळी तुम्हाला काय वाटते श्रीरामपूर येथे कोण आमदार व्हावा हे आम्हाला कमेंट्स करून कळवा.

Exit mobile version