Site icon

संभाजीनगर विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024


मुंबईनंतर शिवसेनेचा दुसरा बालेकिल्ला म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा.  पण शिवसेनेच्या फुटीत संभाजीनगरच्या या बालेकिल्लाला सुरुंग लागला आणि जवळपास सर्वच आमदार आणि स्थानिक नेत्यांनी शिंदेंच्या बंडाळीला साथ दिली. यानंतर महायुतीच्या विरोधात असणारं वातावरण, ठाकरेंच्या बाजूने असणारी सहानुभूती पाहता संभाजीनगरमध्येही ठाकरे गटाला उभारी मिळेल, अशी शक्यता होती.  लोकसभेलाही शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली. यात चंद्रकांत खैरे यांच्या विजयाचा अंदाज एक्झिट पोल पासून ते सर्वांनीच गृहीत धरला होता. पण निकाल लागला आणि अगदी निवडणुकीच्या तोंडावर तिकीट मिळालेल्या संदिपान भुमरेंचा छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्चर्यकारकरीत्या विजय झाला. याचाच अर्थ संभाजीनगरच्या जनतेने शिवसेना म्हणून कौल शिंदे गटाला दिलाय.
पण आता खरी कसोटी आहे ती विधानसभेची. संभाजीनगर मध्ये सहा विधानसभा  मतदारसंघाचा समावेश होतो.संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे तब्बल सहा आमदार आहेत. यातील एक आमदार सोडले तर बाकीचे सर्व पाच आमदार शिंदे गटासोबत आहेत. त्यामुळे आता संभाजीनगरवर आणि त्याच अर्थाने शिवसेनेवर दावा करायचा असेल, तर या सहा जागांचा निकाल महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
छत्रपती संभाजी नगर येथे पहिला विधानसभा मतदारसंघ येतो वैजापूर . वैजापूरचे विद्यमान आमदार आहेत रमेश बोरनार हे शिवसेना पक्षाचे उमेदवार आहेत. वैजापूर हा 1999 ते 2014 पर्यंत शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता परंतु २०१४ ला युती तुटल्यामुळे राष्ट्रवादीचे भाऊसाहेब पाटील हे आमदार झाले. भाऊसाहेब पाटील यांचा ४७०९ मतांनी 2014मध्ये विजय झाला. परंतु2019 मध्ये राष्ट्रवादीचे भाऊसाहेब पाटील आणि शिवसेनेचे रमेश बोरणारे यांच्यात पुन्हा एकदा लढत झाली आणि इथे शिवसेनेचे  रमेश बोरनारे हे जिंकून आले. बोरनारे सध्या शिंदे गटात गेल्यामुळे महायुतीकडून त्यांना पुन्हा एकदा तिकीट भेटू शकते. तर राष्ट्रवादीचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश प्रवेश केला त्यामुळे ठाकरे गटाकडून आता भाऊसाहेब पाटील यांना वैजापूर येथे महाविकास आघाडी कडून तिकीट मिळेल अशी शक्यता आहे. विधानसभेच्या आपल्या उमेदवारीवर मोहर उमटवण्यासाठी चिकटगावकर यांनी लोकसभेला खैरेंच्या पाठीशी मोठी ताकद लावली होती. मात्र तरीही ते पिछाडीवर गेले.  त्यामुळे शिवसेनेचे शिंदे गटाचे विद्यमान आमदार रमेश बोरनारे विरुद्ध ठाकरे गटाचे भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्यातला सामना अटीतटीचा झाला तरी शिंदेंचे आमदार सध्या इथे प्लसमध्ये दिसतायेत.
दुसरा विधानसभा मतदारसंघ येतो तो सिल्लोड
 अब्दुल सत्तार हे सिल्लोडचे विद्यमान आमदार आहेत . सध्या ते शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत.
 2009 मध्ये काँग्रेस पक्षातून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. 2009 ला काँग्रेसच्या कार्यकाळात ते राज्यमंत्रीही राहिले. 2014 ला काँग्रेसच्याच तिकिटावर निवडून आल्यानंतर 2019 ला मात्र ते भाजपामध्ये जाणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. स्वतः सत्तारांची इच्छा असतानाही त्यांचा भाजप प्रवेश रखडला. मात्र अखेर त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर सिल्लोडची विधानसभा लढवली आणि तिथे बाजी मारली. शिवसेना फुटीत त्यांनी शिंदेंना साथ दिली आणि मंत्री झाले. पण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत दानवेंचा प्रचार करूनही ज्या सिल्लोडमधून त्यांना निर्णायक मत पडायची. त्याच मतदारसंघात ते पिछाडीवर गेले. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपण दानवेंचं काम करतो, पण दानवे आपल्याला विधानसभेला हवी तशी मदत करत नाहीत, असं म्हणून अप्रत्यक्षपणे काँग्रेसचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांना मदत केल्याचं त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगून टाकलं.  विधानसभेच्या तोंडावरच त्यांनी दानवे – सत्तार वादाला पुन्हा नव्याने तोंड फोडलं आणि महायुतीत मिठाचा खडा टाकला. हे प्रकरण पुढे जाऊन शांत होईलही का आणि सत्तारांना महायुतीकडून उमेदवारी मिळेल का असाही प्रश्न आहे.  तसेच भाजपचे पदाधिकारी यावेळेस त्यांचं काम करतील का? हा मोठा प्रश्न आहे.सत्तारांचा कार्यक्रम करण्यासाठी ठाकरे गटाकडून सिल्लोडच्या जागेची मागणी होऊ शकते. जर शिवसेना उद्धव ठाकरे गट मशालीला ही जागा सुटली तर मुस्लिम आणि दलित समाजाची मतं त्यासोबतच ठाकरेंच्या बाजूने असणारी सहानुभूती लक्षात घेता अब्दुल सत्तारांसाठी सध्यातरी आमदारकीची वाट जड दिसतेय.
तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे कन्नड विधानसभा
मराठवाडा आणि खानदेशच्या सीमेवरचा मतदार संघ म्हणजे कन्नड विधानसभा.  शिवसेना ठाकरे गटाचे उदयसिंग राजपूत सध्या इथले विद्यमान आमदार आहेत. 2009 पासून सलग दोन टर्म इथे पक्ष बदलला मात्र आमदारकीचा चेहरा काही बदलला नाही तो म्हणजे हर्षवर्धन जाधव यांचा.  त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या उदयसिंग राजपूत यांचा प्रत्येक वेळेस निसटता पराभव झाला . मात्र 2019 ला निवडणुकीपूर्वीच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि कन्नडचं तिकीटही मिळवलं आणि कन्नडमध्ये बाजी मारली .  हर्षवर्धन जाधव यांनी तेव्हाही कडवी झुंज दिली पण त्यांना राजपूत यांचं लीड तोडता आलं नाही. शिवसेनेच्या बंडात छत्रपती संभाजीनगरमधून सर्वच आमदार शिंदेंना जाऊन मिळाले अपवाद फक्त उदयसिंग राजपूत यांचा ते ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले. शिंदे गटाकडून त्यांना अनेकदा पक्षात येण्यासाठी ऑफर देण्यात आल्या. जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात आपण शिंदे गटात प्रवेश केला नाही म्हणून सूड उगवला जातोय, असा आरोप करत राजपूत यांनी डीपीडीसीच्या बैठकीत फाईल भिरकावली.  मुख्यमंत्री शिंदेंनी थेट कन्नड विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे नसल्याची खंत व्यक्त करत तो लवकरच ताब्यात घेऊ असं जाहीरपणे बोलूनही दाखवलं होत.  त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला कन्नड सोयगाव मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी काटे की टक्कर पाहायला मिळेल कन्नडचा विजय फक्त महत्त्वाचाच नाही तर दोन्हीही शिवसेनेसाठी यामुळे प्रतिष्ठेचा ठरू शकतो.
चौथा  मतदार संघ आहे औरंगाबाद पश्चिमचा
शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाट इथले विद्यमान आमदार. अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या मतदारसंघातून शिरसाटांनी तब्बल तीन टर्म या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. जातीय समीकरणांमध्ये संमिश्र मतदारसंघ अशी औरंगाबाद पश्चिमची ओळख असल्यामुळे शिवसेनेसाठी शहरातील हा सर्वात सेफ मतदार संघ समजला जातो. भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार राजू शिंदे यांचा पराभव करत तब्बल 40 हजारच्या लीडने शिरसाट मावळत्या विधानसभेला निवडून आले होते. मात्र यंदा शिवसेनेची दोन गट पडलेली असल्यामुळे इमआयएम, ठाकरे गट हे या मतदारसंघातून शिरसाटांच्या तोडीस तोड उमेदवार देण्याचा प्रयत्न करतीलच. पण तूर्तास तरी शिरसाटांची गाडी इथे जोरात आहे.
पाचवा मतदारसंघ आहे तो औरंगाबाद मध्य विधानसभा
शिवसेना शिंदे गटाचे प्रदीप जयस्वाल सध्या इथले विद्यमान आमदार आहेत.  खरं म्हणजे 2009 ला ही प्रदीप जयस्वाल यांनी शिवसेनेकडूनच औरंगाबाद मध्यवर्ती भाजी मारली होती.  पण 2014 ला इम्तियाज जलील औरंगाबाद मध्य मधून एमआयएमच्या तिकिटावर आमदार झाले. पण 2019 ला जलील खासदार झाले.   शिवसेना आणि भाजप युतीमुळे राष्ट्रवादीकडून अब्दुल सय्यद यांना मैदानात उतरवलं  तरी प्रदीप जयस्वाल यांचा विजय इथे झाला.  शिवसेना फुटीत ते शिंदे गटात गेल्यामुळे आणि औरंगाबाद मध्य मतदारसंघातून संदिपान भुमरे यांच्या पाठीशी असणारं मतदान पाहता शिवसेनेचा शिंदे गट इथे स्ट्रॉंग  आहे . मात्र लोकसभेतील पराभवानंतर इम्तियाज जलील औरंगाबाद मध्य मधून विधानसभेसाठी उभे राहिले तर इथे खरी लढत ही प्रदीप जयस्वाल विरुद्ध इम्तियाज जलील अशी होण्याचे जास्त चान्सेस आहेत.
सहावा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे पैठण
छत्रपती संभाजीनगर लोकसभेतून संदिपान भुमरे खासदार झाल्यामुळे पैठणची जागा सध्या रिक्त आहे.  तब्बल पाच टर्म पैठण विधानसभेवर संदिपान भुमरे निवडून जात होते. मागील विधानसभेला भाजपसोबत बंडखोरी करून राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढलेल्या दत्ता गोर्डे यांच्यामुळे भुमरे अडचणीत येतील, असं बोललं गेलं.  पण भुमरे दणक्यात पाचव्यांदा आमदार झाले. 2024 मध्ये लोकसभेला संदिपान भुमरे यांना उमेदवारी भेटली आणि त्यांनी लोकसभा मतदारसंघातही बाजी मारली . पण पैठण विधानसभा हा लोकसभेला छत्रपती संभाजीनगरमध्ये नाही तर तो येतो जालना लोकसभेत येतो. भूमरेंच्या याच पैठणमध्ये महायुतीचे रावसाहेब दानवे हे पिछाडीवर असल्याने भुमरे आणि शिवसेना शिंदे गटाची चांगलीच तारांबळ झाली आहे.  भुमरे खासदार झाल्याने भाजपकडून  इच्छुकांची गर्दी असल्यामुळे भाजप पैठण आपल्यालाच मिळावा, यासाठी जोरदार  प्रयत्न करू शकतो.  पण शिवसेना शिंदे गटाला ही जागा सुटल्यास दानवे आणि भाजपचे कार्यकर्तेच विरोधात गेले तर इथे महायुतीच महायुतीचा काट्याने काटा काढू शकते.  त्यामुळे या सगळ्या गदारोळात सध्यातरी महाविकास आघाडीला उभारी घेण्याचि संधी आहे.  त्यामुळे शिंदे गटाचे पाच आणि ठाकरेंच्या बाजूने अवघा एक आमदार राहिलेल्या तोही लोकसभेला खासदारकीही गमावलेल्या. ठाकरे गटाला शिंदे गट आमदारकीलाही वरचढ ठरेल का? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच…बाकी छत्रपती संभाजीनगर मध्ये कुणाची हवा? ठाकरे की शिंदे? तुमचा कौल कुणाला? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Exit mobile version