मकर संक्रांत आणि कींक्रांत म्हणजे काय आणि यांचे महत्त्व काय?
नमस्कार नवीन वर्ष सुरू झाले आहे. दरवर्षी भारतामध्ये विविध सण साजरे केले जातात. नवीन वर्षामध्ये सर्वात पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत. हा सण भारतामध्ये विविध पद्धतीने साजरा केला जातो. हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीचे अधिक महत्त्व आहे. या सणापासून वसंत ऋतुची सुरुवात होते. पौष महिन्यामध्ये जेव्हा सूर्य धनु राशिमधून मकर राशि मध्ये प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते.
आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांति सोबत भोगी आणि किंक्रांत सण येतात त्यांचे महत्त्व नेमके काय आहे?
आपण संक्रांत हा सण 14 जानेवारी किंवा 15 जानेवारीला साजरा करतो. यावर्षी संक्रांत ही 14 जानेवारीला साजरी होणार आहे. खरंतर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते आणि मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते. आपल्याकडे भोगी आणि मकर संक्रांत मोठ्या उत्साहात सादर केली जाते, परंतु किंक्रांतीला मात्र अनेक नियमांचे पालन केले जाते. मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते. ज्याप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी देवी संक्रांतीने शंकासूराचा वध केला होता, त्याचप्रमाणे देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकर नावाच्या दैत्याला मारले होते; त्यामुळे हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जाऊ लागला. या दिवसाला किरदिन म्हणूनही संबोधले जाते. या दिवशी भोगीच्या दिवशीची शिळी भाकरी राखून ती किंक्रांतीला खाल्ली जाते. ह्या दिवशी चांगले किंवा कोणतेही शुभ काम करीत नाहीत असे सांगितले जाते.
चला तर पाहूया किंक्रांत या सणामागे कोणती पौराणिक कथा आहे ?
फार वर्षापुर्वी संकारसुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांतीदेवीने संकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले. संक्रांतीदेवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले. आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो.
चल आता जाणून घेऊया किंक्रांत कशी साजरी करतात
किंक्रांतच्या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू समारंभ साजरा करतात. किंक्रांतला भोगीच्या दिवशी केलेली भाकरी राखून ठेवली जाते आणि ती शिळी भाकरी खाल्ली जाते, . अशा काही प्रथा किंक्रांतला महाराष्ट्रामध्ये पाळल्या जातात. तसेच, यादिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याचीही प्रथा आहे.
पौष मासात मकर संक्रांती वगळता अन्य मोठे सण नसल्यामुळे या मासाला भाकडमास असे म्हणतात. तसेच या मासाचे नक्षत्र पुष्य आणि त्याचा स्वामी गुरु हा विरक्ती वाढवणारा असल्यामुळे या मासात शुभकार्ये केली जात नाहीत. तसे असूनही या मासातील पहिले दिवस मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. ते तीन दिवस म्हणजे- भोगी, मकर संक्रांत आणि किंक्रांत
दक्षिणेत हे तीन दिवस सणासारखे साजरे केले जातात. तामिळनाडूमध्ये त्याला `भोगी पोंगल’ असे म्हणतात. त्यादिवशी इंद्रपुजा आणि आप्तेष्टांना गोडाचे जेवण दिले जाते. अंगणात सूर्याच्या साक्षीने चुलीवर दुधाची खीर करून ती ऊतू जाऊ देतात. सूर्याला तसेच गणपतीला खीरीचा नैवेद्य दाखवतात. तसेच गायीला खीर खाऊ घालतात. महाराष्ट्रात तीळगुळाला जसे महत्त्व आहे, तसे दक्षिणेत खीरीला महत्त्व आहे. आपण किंक्रांत साजरी करतो, तर दक्षिणेत मुट्टु पोंगल नावाने हा सण साजरा केला जातो. .
चला तर पाहूया संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारा भोगी हा सण कसा साजरा केला जातो?
मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला `भोगी’ म्हणतात. सबंध भारतात भोगी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. भोगी म्हणजे उपभोगाचा दिवस. या दिवशी अभ्यंगस्नान करून देवाला सर्व भाज्यांची एकत्रित केलेली भोगीची भाजी, तीळ घातलेली बाजरीची भाकरी, खिचडी, लोणी असा नैवेद्य दाखवला जातो आणि सर्वांनी मिळून स्नेहभोजन केले जाते. या सणासाठी मुलीला माहेरी बोलावून तिचे दुसऱ्या दिवशी हलव्याचे दागिने घालून कोडकौतुक केले जाते. तसेच तान्ह्या बाळाचे बोरन्हाण केले जाते.