Site icon

मराठी वास्तवपटांचा थोडक्यात इतिहास – डॉक्टर बापू चंदनशिवे


मराठी वास्तवपटांचा थोडक्यात इतिहास
 मराठी व्यक्तींनीच अखिल भारतीय सिनेमा सृष्टीला जन्म दिलेला दिसतो. भारतीय वास्तवपटाचे जनक हरिचंद्र सखाराम भाटवडेकर असोत किंवा भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके असोत, दोन्हीही महाराष्ट्रातील आहेत. रॅगलर पंराजपे यांच्यावरील हरिश्चंद्र भाटवडेकर यांनी तयार केलेला वार्तापट हा भारतातील पहिला वार्तापट आहे. त्यापूर्वी भारतामध्ये ल्युमिअर बंधूच्या लघुपट किंवा वास्तवपट प्रदर्शनानंतर वार्तापट, लघुपट दाखविण्यात येत होते. पण ते पूर्ण भारतीय बनावटीचे नव्हते.
भाटवडेकर यांनी १८९९ मध्ये ‘द रेसलर्स’ आणि ‘मॅन अॅन्ड मंकी’ हे लघुपट दाखवायला सुरुवात केली. आर.जी. चित्रे आणि एन.जी. चित्रे या सख्या बंधूनी १९ व्या शतकाच्या पहिल्याच दशकात कथापट बनवायला सुरुवात केली. सावेदादा व चित्रे बंधु हे वास्तवपट बनविण्याच्या फंदात पडले नाहीत, तर त्यांनी अगदी सुरुवातीपासूनच कथापट बनवायला सुरुवात केली. १९१८ मध्ये बाबुराव पेटंर यांनी कॉग्रेसच्या अधिवेशनावर वास्तवपट बनवला. त्यावेळी त्यांच्याकडे विल्यमसन कॅमेरा होता. त्या चित्रिकरणाच्या खर्चासाठी तानीबाई कागलकर यांनी मदत केली. मुंबईत झालेल्या या अधिवेशनातील बाळ गंगाधर टिळक यांचे भाषण त्यावेळी चित्रित केले. टिळकांचे एकमेव चित्रित झालेले ते भाषण होय. २० व्या शतकाच्या दुस-या दशकात नारायण देव्हारे व पाटणकर हे ‘पाटणकर फिल्म’ च्या वतीने वास्तवपट व वार्तापट बनवित असत. यामध्ये तत्कालीन संस्थानिकांचे/ राजांचे राज्याभिषेक सोहळे, त्यांचे विविध घरगुती कार्यक्रम, दसरा मेळावे आदीचा त्यामध्ये समावेश होता.
देव्हारे- पाटणकर फिल्म्स कंपनीने १९२० साली बाळ गंगाधर टिळक यांच्या मृत्युनंतर प्रेत यात्रेचे चित्रिकरण केले होते. करंदीकर नावाच्या छायाचित्रकाराने सदर प्रेतयात्रेचे चित्रिकरण करुन देव्हारे – पाटणकर फिल्म कंपनीने त्यावरील वास्तवपट चित्रपटगृहातही दाखविला होता. टिळकांच्या पहिल्या स्मृतीदिनी १९२१ मध्ये मुंबईच्या एलफिन्स्टन मैदानावर परदेशी मालांची होळी करण्यात आली. यामध्ये महात्मा गांधी, मौलाना शोकत अली, महमंद अली जीना, मदन मोहन मालवीय, सरोजिनी नायडू आदी लोक कपडयांची होळी करताना दिसतात. ‘बोनफायर ऑफ फोरेन क्लोथ्स’ या नावाने तयार करण्यात आलेल्या या वास्तवपटाच्या दिग्दर्शकाचे व छायाचित्रकाराचे नाव गुपित ठेवण्यात आले होते. महात्मा गांधीवर १९२४ अॅपेन्डीक्सची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्याचे चित्रण प्रसिध्द मराठी नाटककार मामा वरेरकर यांनी केले होते. १९२०-३० च्या दरम्यान बनविण्यात आलेले बहुतेक वास्तवपट हे राजकीय घटना व राजकीय विषयाशी संबंधीत होते. ते बहुतेक वार्तापटाच्या जवळ जाणारे होते.
दरम्यान दोन मराठी गृहस्थ वास्तवपट माध्यमाबद्दल परदेशात जावून प्रशिक्षण घेऊन आले. यातील के.एस. हिर्लेकर जर्मनीमध्ये तर डी.जी. तेंदूलकर यांनी मॉस्को व बर्लिन येथे जावून प्रशिक्षण घेतले. १९३९ मध्ये ‘मोशन पिक्चर कॉग्रेस’ नावाचे अधिवेशन भरले. यामध्ये भारतातील अडाणी व समस्याग्रस्त समाजाला, शिक्षण व माहिती देण्याचे प्रभावी साधन म्हणून वास्तवपटाचा आधार घ्यावा असा सुर एकमताने निघाला. तसेच सर्वच चित्रपट गृहात वास्तवपट दाखविण्याची विनंती करण्यात आली. इन्फर्मेशन फिल्म्स ऑफ इंडिया व इंडियन न्यूज परेड या संस्थानी १९३९ ते १९४५ या युध्दाच्या काळात भारतामध्ये अनेक वास्तवपटांची निर्मिती केली. पण १९४६ पासून या संस्था बंद पडल्या. त्यामुळे वास्तवपट निर्मिती ब-यापैकी थंडावली. दरम्यान जवाहरलाल नेहरुंच्या पुढाकाराने व सरदार पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत २० जानेवारी १९४८ रोजी ‘फिल्म युनिट’ नावाची सरकारी पण स्वायत्त संस्था स्थापन करण्यात आली. एपिल १९४८ मध्ये त्याचे नाव बदलून ‘फिल्म्स डिव्हीजन’ असे करण्यात आले. त्यामुळे पुन्हा वास्तवपट निर्मितीला नव्याने चालना मिळाली. वास्तवपट बनविणारी आशिया खंडातील एकमेव अग्रगण्य संस्था म्हणून फिल्म्स डिव्हीजनने मोलाची भर घातली आहे. फिल्म्स डिव्हीजन स्थापन झाल्यावर वर्षाला ५२ वास्तवपट व ५२ वृत्तपट बनवायचे निश्चित केले होते. पण खाजगी निर्मात्याला त्याचा फायदा होत नव्हता. त्यामुळे मेजर रमन बच्चा, हरनाम मोटवानी, डी.आर.डी. वाडीया, डब्ल्यु.एच. हेस्से, पॉल झिल्स, राम एल. गोगटे, जी.डी. अगरवाल व एस.डी.पुरी हे निर्माते एकत्रित येवून त्यांनी ‘शॉर्ट फिल्म गिल्ड’ ची २२ फेब्रुवारी १९४९ रोजी स्थापना केली. त्यांच्या दबावामुळे फिल्म डिव्हीजनने, आपल्या कोटयातील दरवर्षी १६ वास्तवपट हे खाजगीरित्या काम करणा-या निर्मात्यांना देण्याचे ठरवले.
पुढे मराठीतील अग्रगण्य कलाकार दुर्गाबाई खोटे यांनी ‘दुर्गा खोटे प्रॉडक्शन’ ही संस्था स्थापन करून स्वत: ‘डेझर्टेड वुमेन’ हा वास्तवपट दिग्दर्शित केला. पुढे याच कंपनीने महिंद्रा अँड महिंन्दा व हिंदुस्थान लिव्हर या कंपन्यासाठी अनेक वास्तवपट व जाहिरातपट बनवून दिले. पुढे ‘शॉर्ट फिल्म गिल्ड’ने ‘इंडियन डॉक्युमेंटरी’ नावाने मुखपत्र काढले. पण कंपनी बंद पडल्याने मुखपत्राचे पाचच अंक प्रसिद्ध होऊ शकले. दरम्यान रामचंद्र मालवणकर यांनी अगंठ्याच्या मदतीने ‘संदेश’ नावाचा वास्तवपट तयार केला. तो कार्टुन प्रकारात मोडणारा होता. थंब इंप्रेशनच्या सहाय्याने सदर कार्टुन वास्तवपट रामचंद्र मालवणकर या कलाकाराने तयार केला होता. १९६० मध्ये फिल्म डिव्हीजनचे एस.वाय. रानडे प्रमुख असताना वेगवेगळया भाषात डबींग माहितीपटांच्या ८०० हून अधिक प्रिंट प्रदर्शित होत होत्या. प्रथम ‘ए’ नंतर ‘बी’ व शेवटी ‘सी’ ग्रेड थिअटर्समध्ये भारतभर एका आठवडयात सदर वास्तवपट किमान १३ ते १४ हजार थिअटर्समध्ये दाखवले जात होते. २८ डिसेंबर १९५६ मध्ये ‘इंडियन डॉक्युमेंटरी प्रोड्युसर्स असोसिएशन’ ची स्थापना ताजमहल हॉटेलच्या ‘प्रिन्सेस’ हॉलमध्ये झाली.
मराठी वास्तवपट
१. राजू: द लाइफ सेव्हीअर (दिग्दर्शक – महेशकुमार सरतापे)
‘राजू: द लाइफ सेव्हीअर’ हा वास्तवपट राजेश दामोदर काची या पुण्यातील तरुणावर आधारीत आहे. दिग्दर्शक महेश कुमार सरतापे हे स्वत: पोलिस खात्यामध्ये वरीष्ठ पदावर काम करत आहेत. पुणे शहरात मानवाशी संबंधीत अनेक अपघात होतात. दिग्दर्शक सरकारी नोकरीत आहेत, पण सरकारी माणसाना मानवी हक्काच्या दृष्टीकोनातून मदत करणा-या राजेश काची या तरुणाच्या माणसाचे जीव वाचविण्याच्या प्रयत्नावर व धाडसावर आधारीत सदर वास्तवपट तयार केलेला आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता, रात्र, पाऊस, ऊन याची तमा न बाळगता राजेश काची संकटात, अपघात सापडलल्या लोकांना कशी मदत करतात याची उत्तम मांडणी व चित्रण दिग्दर्शकाने सतत चार वर्षे चित्रण करुन मिळवलेल्या दृष्यामधून व पुराव्याद्वारे केलेले दिसते. सदर वास्तवपट मानवी संवेदना व मानवी कर्तव्याच्या जाणीवेला स्पर्श करताना दिसतो. सादरीकरण, चित्रण व निवेदन यामुळे हा वास्तवपट उत्तम झाल्याचे दिसते.
भिन्न षडज (दिग्दर्शक – अमोल पालेकर)
‘भिन्न षडज’ हा प्रसिध्द दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी हिंदुस्थानी परंपरेच्या गायिका किशोरी अमोणकर यांच्या सांगितीक व गायन कारकिर्दीवर तयार केलेला वास्तवपट आहे. किशोरी अमोणकर यांची गायनाची सुरुवात ते त्यांची एकूणच गायनाची वाटचाल, त्यांची जयपूर घरण्याची गायकी इ. बाबीवर या वास्तवपटात प्रकाश टाकला आहे. त्यांचा शास्त्रीय गायनातील ठूमरी आणि ख्याल यावर असलेले प्रभुत्व, राग, भजन, गीत आणि भावगीते यासंदर्भ त्यांचे विचार, गायन पध्दती या संदर्भातही दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी खास चर्चा घडवून आणलेली आहे. गायन क्षेत्रातील नामवंत व्यक्तीच्या मुलाखती, स्वत: किशोरी अमोणकर यांच्याशी बातचित आणि उत्तम संग्रहित दृष्यांचा वापर, यामुळे किशोरी अमोणकर यांची गायकीची वाटचाल प्रभावीपणे प्रेक्षकांना समजण्यास सोपे जाताना दिसते.
दुष्काळाशी दोन हात (दिग्दर्शक – सुरेश भाटिया)
महाराष्ट्रात शेतक-यांना सातत्याने दुष्काळाला तोंड द्यावे लागते. यातून शेतक-यांच्या आत्महत्या किंवा मोठया प्रमाणात स्थलांतराचा प्रश्न निर्माण झालेला आहे. याच पार्श्वभूमीवर शासन व्यवस्थेबरोबरच अनेक गैर सरकारी संस्था आणि स्वयंस्फुर्तीने काही व्यक्ती दुष्काळ संपविण्यासाठी प्रयत्न काम आहेत. यामध्ये ‘पाणी फाउन्डेशन’ या संस्थेने काम महत्त्वपूर्ण ठरलेले दिसते. या संस्थेच्या कार्याबाबत तसेच शेतक-यांना प्रेरणा मिळावी हे लक्षात घेवून ‘दुष्काळाशी दोन हात’ हा वास्तवपट सुरेश भाटीया यांनी बनवला. यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील दुष्काळाची कारणे, पाणी अडविण्याची गरज, शेतक-यांचे प्रबोधन व प्रशिक्षण, तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेते अमीर खान यांचे शेतक-यासाठी मार्गदर्शन याचा समावेश केला. त्यामुळे महाराष्ट्रात कोणत्या पध्दतीने पाणी वाचविले पाहिजे आणि पाणी संवर्धनासाठी शेतक-याचा सहभाग किती महत्वाचा आहे, यावर भाष्य करणारा हा महत्त्वाचा वास्तवपट आहे.
स्नेहालय (दिग्दर्शक- डॉ. गिरीश कुलकर्णी)
‘स्नेहालय’ हा वास्तवपट अहमदनगर जिल्हयातील स्नेहालय या गैरराजकीय संस्थेच्या कार्यावर आधारीत आहे. स्नेहालयची स्थापना, त्याची प्रेरणा, या संस्थेचे कार्य यावर सदर वास्तवपट प्रकाश टाकतो. ही संस्था १९९० मध्ये अहमदनगरमध्ये वेश्या व्यवसाय करणा-या महिलांचे प्रबोधन व त्यांच्या लहान मुलांना पाळणा घरात ठेवणे या कार्यापासून सुरु झाली. पुढे अहमदनगरमधील एम.आय.डी.सी. मध्ये मुथा नावाच्या व्यक्तीने सात एकर जागा दिल्याने त्या ठिकाणी हया संस्थेला आपले काम जोमाने पुढे नेता आले. आज या संस्थेमध्ये अनाथ मुले, एड्सग्रस्त लोक व बालके, वेश्याव्यवसायातून पूर्नवसन झालेल्या स्त्रीया, कुमारी माता इ. लोकांना आधार देण्याचे काम ही संस्था करते. या वास्तवपटामधून  स्नेहालय या संस्थेच्या कार्याबरोबर अहमदनगर व परीसरामध्ये अमानवी कृत्यांना आळा बसविण्यासाठी या संस्थेशी निगडीत लोक करीत असलेल्या कामाचेही अवलोकन होते.
मला माझे बाबा परत करा (दिग्दर्शक – सुमा जोसन)
‘मला माझे बाबा परत करा’ हा वास्तवपट महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाडा विभागातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत, त्या संदर्भात कारणमीमांसा करतो. दिग्दर्शकाने शेतकरी, शेतमजूर, शेतकरी संघटतेचे कार्यकर्ते व नेते, आत्महत्या केलेल्या कुटुंबातील सदस्य, गावातील सुशिक्षित व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करुन या वास्तवपटामध्ये सर्वसमावेशकता आणलेली दिसते. बीयाणे उत्पादक कंपन्या, व्यापारी-दुकानदार आणि सावकार हे शेतक-यांना कशा पध्दतीने लुटतात. या संदर्भातही या वास्तवपटामध्ये भाष्य करण्यात आलेले आहे. शेतीचे व शेतमालाचे व्यवसायिकरण, पाऊस न पडल्याने उद्भवलेली दुष्काळी परिस्थिती आणि सरकारी अनास्था या संदर्भातही हा वास्तवपट भाष्य करतो. मुलाखती, आणि प्रत्यक्ष पिडीत लोकांशी चर्चा केल्यामुळे हा वास्तवपट दर्शकांच्या मनात शेतक-याविषयी संवेदना निर्माण करण्यात यशस्वी होतो. हया केवळ शेतक-यांच्या आत्महत्या नाहीत, तर कंपन्या, सरकार व सावकरांनी ठरवून शेतक-यांचा नरसंहार चालवला असल्याचे निरिक्षण सदर वास्तवपट नोंदवतो.
६. बबई (दिग्दर्शक – अनिता दातार, अमित सोनावणे)
‘बबई’ हा वास्तवपट बबई या महिलेच्या जीवनावर आधारीत आहे. साधारणत ८१ वर्षाची महिला आपल्या पोटापाण्यासाठी अर्थात उपजिवेकीसाठी ओझी वाहणारा हातगाडा चालवते. म्हणजेच जे काम पुरुषांचे आहे, असा समज असणा-या समाजाच्या विचारांना तडा देवून बबई हातगाडयावर काम करते. बबईचे जीवनविषयीचे एक तत्त्वज्ञान आहे. ती पुरुषाच्या बरोबरीने तर काम करतेच, पण कोणाकडे व्याकुळ होऊन हात पसरत नाही. दिग्दर्शक अनिता दातीर आणि अमित सोनावणे यांनी बबईचे चित्रण अत्यंत नैसर्गिकपणे केलेले आहे. बबई या वयातही काम करताना आणि जीवना विषयीचे विचार व्यक्त करताना दिग्दर्शकांनी अत्यंत प्रभावीपणे दाखवले आहे. अत्यंत कमी वेळेमध्ये एका अवलिया कष्टकरी स्त्रीचे स्वालंबित्व आणि भारतीय महिलेची जीवन जगण्याची चिकाटी, कष्टाळूपणा आणि पुरुषी असंवेदनशीलता यावर प्रभावीपणे भाष्य करण्यात दिग्दर्शक यशस्वी झालेले आहेत.
७. एकला चलो रे (दिग्दर्शक – स्वप्नील राजशेखर)
श्रीगोंदा, जि. अहमदनगर येथील एस. टी. डेपोमध्ये वाहकाच्या पदावर नोकरीला असलेल्या सोपान जवणे याच्या प्रेरणादायी कार्यावर आधारीत ‘एकला चलो रे’ हा वास्तवपट आधारीत आहे. एस.टी.  महामंडळामध्ये अर्थात सरकारी नोकरीमध्ये काम करताना सेवकाच्या कडून मिळणारी कोरडी किंवा तुसडी वागणुक लोकांनी अनुभवलेली आहेच. पण सदर वास्तवपटाद्वारे दिग्दर्शक स्वप्नील राजशेखर यांनी सोपान जवणे प्रवाशाची घेत असलेली काळजी, त्यांची करत असलेली सेवा आणि त्यांचा प्रवाशांशी असलेला सुसंवाद यावर प्रकाश टाकण्याचे काम या वास्तवपटातून केलेले आहे. एखाद्या सरकारी, निम सरकारी किंवा खाजगीरित्या नोकरी करीत असलेल्या व्यक्तीने ठरवले तर आपली नोकरी तन्मयतेने व लोककल्याणकारी पध्दतीने करु शकतो, याचे उदाहरण म्हणजे सोपान जवणे आहेत, हेच या वास्तवपटातून प्रेक्षकांना प्रभावीपणे लक्षात येते.
८. मातीतील कुस्ती (दिग्दर्शक – प्रांतिक देशमुख)
‘मातीतील कुस्ती’ हा प्रांतिक देशमुख यांचा कुस्ती या खेळावर भाष्य करणारा वास्तवपट आहे. सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठातील संज्ञापन अभ्यास विभागतून शिक्षण पूर्ण केलेल्या प्रांतिक देशमुख यांनी चिंचेची तालिम या तालिममध्ये चित्रिकरण केले. २३४ वर्षाची कुस्तीची परंपरा असलेल्या या खेळाचे महत्त्व, व्यायाम प्रकार, कुस्तीचे डाव, मातीतील कुस्ती व मॅटवरील कुस्ती, पैलवानासाठी आहाराची गरज, इ. बाबीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. निवेदन, संग्रहित चित्रिकरण, फोटो आणि प्रत्यक्ष चित्रिकरणाच्या माध्यमातून या खेळाविषयी प्रेक्षकांना माहिती देण्याचे काम सदर वास्तवपट करतो. या वास्तवपटामध्ये कुस्ती या पारंपारिक खेळावर विशेषत: मॅटवरील कुस्तीमुळे मातीतील कुस्तीवर आलेले संकट, मातीतील कुस्तीची सवय असलेल्या पैलवानांना मॅटवरील कुस्ती खेळताना होणारा त्रास आणि पैसे व पोषक आहार न मिळाल्यामुळे त्यांची होणारी अवस्था यावर हा वास्तवपट प्रभावी भाष्य करतो.
९. शाहिरी (दिग्दर्शक – आशिष साबळे)
‘शाहिरी’ हा महाराष्ट्रातील शाहिरी परंपरेचा इतिहास सांगणारा वास्तवपट आहे. तमाशा, लावणी, भारुड, भजन आणि कीर्तनाप्रमाणेच ‘शाहिरी’ हा एक महत्त्वाचा पारंपारिक माध्यमाचा प्रकार आहे. दिग्दर्शक आशिष साबळे यांनी उत्तम पध्दतीने संशोधन करुन शाहिरी हा वास्तवपट आशयपूर्ण व माहिती प्रदान बनवला आहे. शाहिरीचे प्रकार, शाहिरीचा जन्म, वेगवेगळया माध्यम प्रकारातील शाहिरी याचा उत्तम मागोवा दिग्दर्शकाने घेतला आहे. अगदी शाहीर विलास घोगरे पासून ते शाहिरा शितल साठे पर्यंत अनेक शाहिरांच्या शाहिरीचा समावेश या वास्तवपटामध्ये करण्यात आला आहे. याशिवाय लोककला अभ्यासकांच्या मुलाखती, कलाकारांच्या मुलाखती, त्यांचे सादरीकरण आणि उत्तम निवेदन या माध्यमातून  ‘शाहिरी’ हा वास्तवपट साकारत जातो. संशोधन करुन चांगला वास्तवपट कसा असतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘शाहिरी’ हा वास्तवपट होय.
कृतियुक्त शिक्षण पध्दती (दिग्दर्शक – संदीप दंडवते)
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने गुणवत्ता विकास अभियनाच्या माध्यमातून मराठी विशेषत: जिल्हा परीषद व महानगरपालिकांच्या शाळांना नवनवीन शिक्षण पध्दत राबवायला सांगितली. याचाचा एक भाग म्हणून पुणे जिल्हयामध्ये केरळ, कर्नाटक व उत्तर प्रदेश राज्यामध्ये सुरु असलेल्या ‘अॅक्टीव्हीटी बेसड लर्निंग’ पध्दतीचा स्विकार केला. पुणे जिल्हयातील ३० शाळामध्ये हा कृतियुक्त शिक्षण पध्दतीचा उपक्रम सुरु केला. सदर वास्तवपट हा पुणे जिल्हयातील केजळ या जिल्हा परिषदेच्या शाळेने कृतियुक्त शिक्षण पध्दतीचा आपल्या शाळेमध्ये कसा उपक्रम राबविला आणि त्यातून शैक्षणिक गुणवत्ता कशी विकसित झाली, यावर प्रकाश टाकतो. दिग्दर्शक संदीप दंडवते यांनी सदर वास्तवपट संहितेला अनुसरुन दृष्ये, निवेदन, मुलाखती व मुले करीत असलेल्या कृतीच्या सहाय्याने प्रेक्षकासमोर आणल्याने शिक्षक, पालक व विद्यार्थी यांना मार्गदर्शक ठरावा असाच हा वास्तवपट आहे. अशा पध्दतीने महाराष्ट्रामध्ये विविध विषयावर दरवर्षी काही प्रमाणात वास्तवपट बनविले जात आहेत. वास्तवपट बनविणे ही एक गंभीर व संशोधनात्मक दृकश्राव्य कृती असल्यामुळे लघुपटाच्या तुलनेत वास्तवपट कमी निर्माण होतात. पण सध्या तंत्रज्ञानाची सहज उपलब्धता, समस्या किंवा विषय प्रेक्षकासमोर मांडण्यासाठी उपलब्ध झालेली माध्यमे आणि काही प्रमाणात शैक्षणिक संस्थांनी केलेले मार्गदर्शन व दिलेले शिक्षण यामुळे मराठीमध्ये वास्तवपट तयार करणा-यांची संख्या वाढत आहे. गरीबी, शेतक-याच्या आत्महत्या, पाणी प्रश्न, दुष्काळ, पर्यावरण, दलित व स्त्रीयावरील अत्याचार इ. विषय वास्तवपटाच्या माध्यमातून समोर येत आहेत.
-डॉ. बापू चंदनशिवे
माजी विभाग प्रमुख
संज्ञापन अभ्यास विभाग
(Mass Communication)
न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहिल्यानगर

Exit mobile version