Site icon

वास्तवपटाची वास्तविकता – डॉक्टर बापू चंदनशिवे


 

वास्तवपटाची वास्तविकता

२० वे शतक ज्याप्रमाणे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, औद्योगिक क्रांतीचे शतक आहे, त्याचप्रमाणे ते माध्यम क्रांतीचेही शतक आहे. इतर कोणत्याही क्षेत्रापेक्षा माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील बदल, प्रगती व लवचिकता अतुलनीय अशीच आहे. या शतकात मुद्रित माध्यमांनी गाठलेली उंची व चित्रपट, रेडिओ, दूरचित्रवाणी इन्टरनेट व सामाजिक माध्यमांनी मानवी संवाद आणि अभिव्यक्तीला दिलेली चालना ही मानवी विकासातील सर्वोत्तम परिस्थिती असू शकते. दृकश्राव्य माध्यमांनी मानवी जीवनात, वर्तनात आणि अभिव्यक्तीमध्ये बहुमोल व गतीशील कार्य केलेले दिसते. चित्रपट हे एक त्यातील उत्कृष्ट उदाहरण होय. चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नाही तर मानवी अभिव्यक्तीचे ते एक सज्जड व प्रभावी आणि परिणाम करणारे माध्यम आहे. चित्रपटाबरोबरच किंबहुना त्यांच्याही आधीपासून विकसित झालेला प्रकार म्हणजे वास्तवपट होय.

वास्तवपट हे चित्रपटासारखेच सकृतदर्शनी वाटणारे माध्यम असले तरी त्यांच्यामध्ये अनेक साम्य व भेद आहेत. ते सध्या किंवा कदाचित पहिल्या पासूनच चित्रपटाइतके प्रभावी किंवा लोकप्रिय माध्यम नसले तरी परीणामकारक व सत्याची प्रभावी मांडणी करणारे माध्यम मात्र नक्कीचं आहे. मानवी व्यवहारातील अगदी स्थानिक स्तरापासून ते जागतिक पातळीपर्यत एखादी किंवा कुठलीही वस्तुस्थिती मांडण्यासाठी केवळ वास्तवपट हे माध्यम उपयोगी पडते. कोणतीही वस्तुस्थिती चित्र व ध्वनीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न वास्तवपटातून केला जातो. चित्रीकरण, संपादन, विषय इत्यादीमध्ये जसजसे बदल होत गेले, त्याप्रमाणे वास्तवपट निर्मितीमध्ये लक्षणीय बदल झालेले दिसतात. दुरदर्शन, बी.बी.सी., सी.एन.एन. इ. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसारीत होणा-या वृत्तवाहिन्यांनी तसेच नॅशनल जिओग्राफी, हिस्टरी, डिस्कव्हरी, अॅनिमल प्लॅनेट इ. वाहिन्यांनी माहितीपटांना नवीन चेहरा दिला. त्याचप्रमाणे वैयक्तिकरित्या अनेक व्यक्तीनी वास्तवपट निर्मिती केली. समाजातील विविध विषय, दुर्लक्षित घटक, निसर्ग, प्राणी, आंतराळ ते अगदी समुद्र तळापर्यंतचे अनेक विषय वास्तवपटाद्वारे मांडण्यात आले. त्यामुळे संशोधक, शासन यंत्रणा, विचारवंत यांना आपली मते व भूमिका आधुनिक काळामध्ये नव्याने मांडाव्या लागलेल्या आहेत असे दिसून येते.

वास्तवपट: संकल्पना

वास्तवपट हा दृकश्राव्य माध्यमाचा आविष्कार असुन वस्तुस्थितीचे या माध्यमाच्या रुपाने प्रदर्शन करणे हा याचा हेतू असतो. हेनरिक ज्युअल म्हणतात की, “वास्तवपट हा चित्रपटासारखाच प्रकार असुन तो सत्य घटना व ख-याखु-या माणसांवर आधारीत असतो. त्यामध्ये एखादी घटना, ऐतिहासिक बाब खरी व वस्तुनिष्ठ पध्दतीने मांडली जाते. म्हणजेच वास्तवपट हा प्रकार वास्तव मांडण्याचा किंवा दर्शविण्याचा प्रकार असून त्याचे चित्रीकरण हे घटनेच्या ठिकाणी जावून तसेच कोणत्याही प्रकारचे कलावंत न वापरता, कृत्रिमता न आणता किंवा पूर्वनियोजितपणा त्यामध्ये न आणता केले जाते.”

बील निकोलस आपल्या ‘रिप्रेझीन्टींग रिअॅलिटी’ या पुस्तकात म्हणतात की, “वस्तुस्थिती व सत्यता ही वास्तवपटाची पहिली अट आहे.” ब्रिटीश वास्तवपट चळवळीचे जनक जॉन ग्रीअरसन यांनी १९३० च्या दशकात वास्तवपटाबाबत वस्तुस्थितीला कलात्मकतेची जोड (Creative Treatment to Actuality) असा वाक्यप्रचार वापरला होता. अॅनी फर्ग्युसन या जर्मन लेखकाने त्याच्या ‘मॉडेल्स ऑफ एंगेजमेंट इन थिअटरीकल डॉक्युमेंट’ या संशोधनपर पुस्तकात ‘क्रीटीकल’ वास्तवपट, सिनेमा वास्तवपट, वास्तवपटासाठीचा आवाज, वास्तवपट निर्मितीमागचा कार्यकारणभाव इ. बाबींवर चर्चा केलेली दिसते. याच पुस्तकात त्यांनी शॉबचक्र यांच्या ‘टुवर्ड अ फेनोमेलॉजी ऑफ नॉन फिक्शनल फिल्म एक्सपिरीअन्स इन कलेक्टीव्ह व्हीजिबल इव्हीडन्स’ या पुस्तकातील मत उद्धृत केलेले आहे. शॉबचक म्हणतात की, ‘We must remain ourselves that a documentary is not a thing, but a subjective relationship to a cinematic object.” अर्थात एखादया विषयाशी संबंधित दृकश्राव्य पध्दतीने केलेली मांडणी म्हणजे वास्तवपट हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.

“एखादा चित्रपट किंवा वास्तवपट निर्माण होण्यापूर्वी त्यातील व्यक्ती, घटना किंवा परिस्थितीही चित्रपटाबाहेर ख-या जगामध्ये आधीच उपस्थित असते.” असे महत्त्वपूर्ण मत ब्लॅन्डफोर्ड, हिल्लर व ग्रॅन्ट यांनी मांडलेले आहे. म्हणजेच वास्तववादी व्यवस्था किंवा स्थिती हे जगामध्ये असतेच, ती टिपण्याचे काम चित्रपट किंवा वास्तवपट करत असतात. वास्तवपट हा ज्या स्थितीच्या संबंधाने किंवा माणसाबाबत माहिती देत आहे, त्यांची उपस्थिती चित्रीकरणाच्या वेळी असते. म्हणजेच, कल्पित घटना, व्यक्ती, प्राणी इत्यादीवर वास्तवपट तयार केला जावू शकत नाही. तो वास्तवाचेच चित्रीकरण करतो.

बदलत्या काळानुसार व तंत्रज्ञानानुसार वास्तवपट निर्मितीमध्ये अनेक बदल झालेले दिसतात. अगदी विषय निवडण्यापासून ते प्रेक्षकांपर्यत पोहोचविण्यापर्यंत त्यामध्ये बदल झाले. आणि अधिकाधिक कलात्मकतेवर भर दिला गेला. ‘न्यू मीडिया डॉक्युमेंटरी, एक्सप्लोरेशन्स इन द चेजिंग फॉर्म: थेअरी अॅन्ड प्रॅक्टीस ऑफ डॉक्युमेंटरी’ या पुस्तकात गुंथर हार्डवीग प्रस्तावनेमध्ये म्हणतात की, “बदलते आधुनिक तंत्रज्ञान हे जागतिक वास्तवपट निर्मितीच्या अनुषंगाने एक अत्यंत चांगली संधी आहे. डिजिटल ध्वनीमूद्रण व कागदपत्रे, नोंदी, इन्टरनेट व जागतिक संवादाचे बदलते स्वरुप माध्यमामुळे नवीन, कलात्मक काही करण्याची व दर्शकता पाहण्याची संधी मिळते आहे.”

मागील २०-२५ वर्षात वास्तवपटाला अत्यंत चांगले प्रेक्षक मिळताना दिसतात. वास्तवपट निर्मिती प्रक्रियेत मोठयाप्रमाणात बदल झालेले दिसतात. नवीन तंत्रज्ञान आणि विषय मांडण्याच्या बदलेल्या पध्दती यामुळे वास्तवपट निर्मितीमध्ये कलात्मक बदल झाले. ब-याचवेळा एखादा वास्तवपट हा केवळ माहिती देणारा न राहता तो डॉक्युड्रामा अर्थात वास्तवपटाचे अभियनात्मक रुप पहायला मिळते. म्हणजे अलिकडच्या काळात वास्तवपटावर सौंदर्यीकरण व कलात्मकता यांचा मोठया प्रमाणात प्रभाव पडलेला दिसतो. “दररोज जगामध्ये दहा कोटीपेक्षा अधिक लोक वास्तवपट बघतात. विशेषत: डिस्कव्हरी चॅनेल, हिस्टरी, अॅनिमल प्लॅनेट, नॅशनल जॉओग्राफी वाइल्ड इ. वाहिन्या चोविस तास वास्तवपटच दाखवत असतात.” असे स्पष्ट मत गुंथर हार्टवीग यांनी मांडले आहे.

‘डॉक्युमेंटरी मुव्ही रिव्यूज’ या पुस्तकात वास्तवपट पाहणा-यांचे दोन गटात वर्गीकरण करण्यात आलेले आहे. ज्यांना वास्तवपट पहायला आवडतात असे लोक व दुसरा गट म्हणजे आशय समजून घेण्यासाठी वास्तवपट पाहणारे लोक. पहिल्या प्रकारातील लोकांना वास्तवपट हा प्रकार मूल्याधिष्ठीत वाटतो किंवा तो त्यांना आवडतो. तर दुस-या गटातील लोक हे वास्तवपट हे माध्यम अभ्यासाचा भाग म्हणून वापरतात. तर बिल निकोलस हे वास्तवपट व ललित वाङ्मय यामध्ये फरक करीत नाहीत. मात्र त्यांनी यासाठी दोन संकल्पना वापरल्या आहेत. एक म्हणजे इच्छापूर्ती करणारे वास्तवपट आणि दुसरे म्हणजे सामाजिक प्रतिनिधीत्व करणारे वास्तवपट. इच्छापूर्ती करणा-या माहितीपटांमध्ये निकोलस यांनी काल्पनिक चित्रपटांचा समावेश केला आहे, तर सामाजिक प्रतिनिधीत्व करणारे वास्तवपट यामध्ये ख-या जगाची मांडणी करणा-या चित्रपटांचा समावेश केलेला आहे. वास्तववादी, वस्तुस्थिती व सत्य मांडणा-या चित्रपटांचा त्यांनी दुस-या गटात समावेश केलेला आहे.

२८ डिसेंबर १८९५ मध्ये ल्युमियर बंधुनी पॅरीस येथील ग्रँड कॅफे हॉटेलमध्ये प्रथमच त्यांनी स्वत: चित्रीत व दिग्दर्शीत केलेले १० चलतचित्र प्रदर्शित केले. हे बघण्यासाठी तिकिटे काढून ३५ प्रेक्षक उपस्थित होते. आणि याच दिवसापासून व्यावसायिक चित्रपटांचा प्रारंभ झाला असे म्हणावे लागेल. पहिले चलतचित्र हे रेल्वे लांबून स्टेशनमध्ये प्रवेश करतेय अर्थात कॅमे-याच्या दिशेने येतेय असा होता. प्रेक्षकांना ते इतके प्रभावी व खरेखुरे वाटले की, रेल्वे आपल्या अंगावर येईल म्हणून पॅरीस येथील ग्रँड कॅफे हॉटेलमध्ये बसलेले पेक्षक उठून बाजूला पळाले होते. याच फिल्मस जेव्हा मुंबईमध्ये १८९९ मध्ये दाखविल्या तेव्हा भारतीय प्रेक्षक मात्र एका जागेवरुन हालले नाहीत. ज्यावेळी ल्युमिअर बंधूनी हया फिल्म बनिवल्या आणि दाखविल्या त्यावेळी सध्या अस्तित्वात असलेल्या दृकश्राव्य माध्यमविषयीच्या कोणत्याच संकल्पना अस्तित्वात नव्हत्या. हलणा-या चित्रांना चित्रपट, फिल्म, मूव्ही, लघुपट किंवा वास्तवपट म्हणायचे किंवा त्यामध्ये कोणता आशय असायला हवा याबाबत २०व्या शतकाच्या मध्यानंतर मतैक्य झालेले दिसते. ल्युमिअर बंधूनी १८९९ पर्यत जवळपास ७५० हून अधिक छोटया छोटया फिल्म बनविल्या होत्या आणि हा एक विक्रमच होता. १९०७ पर्यत तर त्यांनी १००० हून अधिक लघुपट व वास्तवपट बनविले होते. त्यांच्या सर्वच फिल्मना ‘वास्तववादी’ असे संबोधले गेले. कारण त्यांनी बहुतांश वेळा ख-या व वास्तववादी घटनांचेच चित्रण केलेले होते. म्हणून ते वास्ततवादी म्हणजे आताच्या संकल्पनेनुसार ‘वास्तवपट’ होते. त्यामुळे वास्तवपट निर्मितीचे खरे जनक हे ल्युमिअर बंधूनाच म्हणावे लागेल. असे असले तरी पहिला पूर्ण लांबीचा व विषय संपूर्णपणे मांडणारा वास्तवपट म्हणून ‘नानुक ऑफ दी नॉर्थ’ याच्याकडे पाहिले जाते. रॉबर्ट फ्लेहर्टी यांनी १९२२ मध्ये निर्माण केलेल्या या वास्तवपटाला जगातील पहिला पूर्ण लांबीचा वास्तवपट म्हणतात. उत्तर कॅनडातील रेल्वे बांधकाम व्यवसायिक विल्यम मॅकॅन्झी यांनी केलेल्या आर्थिक सहकार्यामुळे फ्लेहर्टी यांनी तीन आठवडयाचा कॅमेरा वापराचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि उत्तर कॅनडातील यापूर्वी खूपच कमी लोकांनी पाहिलेल्या गोष्टी त्याने एकटयाने जावून चित्रित केल्या. त्याची ३०००० फुटाची रिळ बनली. माघारी येवून याच्यावर प्रक्रिया (प्रोसेस) सुरु असतानाच सिगारेट ओढताना रिळांनी पेट घेतला आणि संपूर्ण रिळा जळून खाक झाल्याच, पण हे विझवताना तोही गंभीर जखमी झाला. पण यातून बरे होताच त्याने पुन्हा जावून संपूर्णपणे चित्रण केले व १९२२ मध्ये ‘नाजुक आफ दी नॉर्थ’ हा वास्तवपट प्रदर्शित केला आणि मोठया प्रमाणात तो लोकांनी बघितलाही. अर्थात, ‘वास्तवपट म्हणजे अशी चित्रफित, किंवा दूरचित्रवाणी कार्यक्रम जो राजकीय, सामाजिक किंवा ऐतिहासिक विषय तथ्यात्मक व माहितीप्रदान पध्दतीने सादर केलेली खरी बातमी किंवा कथानात्मक पध्दतीची मुलाखत होय.’

-डॉ. बापू चंदनशिवे
माजी विभाग प्रमुख
संज्ञापन अभ्यास विभाग
(Mass Communication)
न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहिल्यानगर

 


Exit mobile version