Site icon

वास्तवपट: लेखन आणि दखल – डॉ. बापू चंदनशिवे


वास्तवपट: लेखन आणि दखल
पट माहितीचा या पुस्तकात कुंदा प्रमिला निळकंठ यांनी वास्तवपटांचे वर्णन आणि विश्लेषण केलं आहे. यामध्ये जसा मराठी वास्तवपटाचा समावेश आहे, तसेच हिंदी व इतर भारतीय भाषातील आणि अनेक आंतरराष्ट्रीय भाषेतील व देशातील वास्तवपटांचा समावेश आहे. ‘आपले विचार वरुन लादण्यापेक्षा, प्रेक्षकांना संपूर्णपणे त्यांच्या निर्णय क्षमतेवर सोडून संदेश पोहोचविणारे वास्तवपट, हेच २१ व्या शतकातल्या लोकशाही समाजाची मुख्य ताकद असु शकतील हे अनेक वास्तवपट पाहिल्यावर जाणवते. शोषणाविरुध्द आपला आवाज जगापर्यत पोहचविण्याचे ते एक माध्यम आहे’. (पान नं. ४) वास्तवपट माध्यमाने भाषा व प्रातांची सीमारेषा तर ओलांडलीच पण पाहणा-याला वास्तवाच्या अधिक निकट नेले. जीवनाची विविध स्तरावरील अनुभूती दिली. कॅमे-याने टिपलेले वास्तव आणि संकलन तंत्राने जोडून, दिग्दर्शकीय भूमिकेतून निर्माण केलेल्या भौतिक वास्तवाकडे, कोणताही माणूस सहज आकर्षित होतो. वास्तवतेच्या संदर्भात लेखिका आपले मत व्यक्त करताना म्हणतात, “वास्तवाचा खरेपणा एखाद्या सडक नाटकातील नाटयविष्कारापेक्षा अनेक पटीने ख-या वास्तवाच्या अधिक जवळ जाणारा, म्हणून माहितीपट (वास्तवपट) खात्रीलायक वाटतो. त्यामुळेच, निर्मितीचे तंत्र जरी एक असले तरी चित्रपटामधील काल्पनिक वास्तवापेक्षा वास्तवपट वेगळा ठरतो. नव्या माहितीपटकारांनी अवलंबलेल्या ‘सिनेमा व्हरायटे’ सारख्या वास्तववादी संवाद शैलीमुळे, माहितीपटांमधील भौतिक वास्तवाची खात्रीलायकता अनेक पटीने वाढलेली दिसते. म्हणूनच अलिकडच्या काळात इतिहास, सामाजिक शास्त्रे, साहित्य, कला अशा सर्व विद्याशाखामध्ये वास्तवपटांचा एक महत्वाचे अभ्यासाचे साधन म्हणून अपरिहार्यपणे वापर होऊ लागलेला दिसतो. समाज व संस्कृतीशास्त्रांच्या चिकित्सक अभ्यासांमधील एक ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून आज माहितीपटांना वेगळचं महत्त्व प्राप्त झालेलं आहे.” असे कुंदाप्रमिला निळकंठ आपल्या प्रस्तावनेत वास्तवपटाबद्दल आपले मत व्यक्त करतात.
पट माहितीचा या पुस्तकाचे लेखिकेने दोन भाग केले आहेत. पहिल्या भागामध्ये वास्तवपटाचा इतिहास, त्याचे स्वरुप, वास्तवपटाची बदलती भाषा, त्याचा बदलता कॅनव्हास व वास्तवपटातील वस्तुनिष्ठता ही शेवटी “व्यक्तीनिष्ठेचे अर्थात दिग्दर्शकाला काय सांगायचं आहे हेच महत्त्वाचे कसे आहे? याबद्दल चर्चा केलेली आहे. दुस-या भागामध्ये ४१ वास्तवपटाबद्दल लिहिले आहे. यामध्ये वास्तवपटांचे दिग्दर्शकांने दिलेली नावे न वापरता स्वत:च त्या वास्तवपटांचे विश्लेषण करतांना वेगळी शिर्षक दिलेली आहेत. त्यामुळे त्यामध्ये काव्यमयता व सृजनशीलता आलेली दिसते. सदर पुस्तकामध्ये वास्तवपटांचे केवळ वर्णन केलेले नाही, तर त्या त्या वेळची सामाजिक, राजकीय परिस्थिती व वास्तव यांचे विश्लेषण करत माहितीपटांबद्दल लिहिले आहे. वास्तवपटांचे विषय वेगळे आहेत तसेच ते वेगळया भाषातील व वेगळया देश व प्रांतातीलही आहेत.
हरबर्ट झेटल यांचे ‘टेलिव्हीजन प्रोडक्शन हँडबुक’ हे वास्तवपटाबाबत इत्यंभूत माहिती देणारे पुस्तक आहे. हरबर्ट झेटल हे अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सीस्को स्टेट युनिव्हीसीटीमध्ये ‘ब्रॉटकास्टर अॅण्ड इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन आर्टस’ विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. ते तिथे अनेक वर्ष व्हीडिओ प्रोडक्शन व माध्यमाचे सौंदर्यशास्त्र शिकवत होते. त्यांचे टेलिव्हीजन प्रोडक्शन हॅन्डबुक हे माध्यमात विशेषत: दृकश्राव्य टी.व्ही. माध्यमात काम करणा-यांना उत्तम मार्गदर्शक आहे. सदर पुस्तकामध्ये न्यूज व कोणतेही दृकश्राव्य चित्रिकरण करताना करावयाच्या निर्मितीच्या बाबी स्पष्ट केल्या आहेत. यामध्ये कॅमेरा व चित्रिकरण करताना घ्यायची काळजी, त्याचे वेगवेगळे अॅगल्स, हालचाली (पान १०४ ते १२३), त्यासाठी करावी लागणारी प्रकाशयोजना (१२८-१५४), साउन्ड रेकॉर्डिंग (१९०-२०८) व साउन्ड कंट्रोलींग, वास्तवपटासाठी आवश्यक असणारी अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे पोस्ट प्रोडक्शन व साऊन्ड अस्थेस्टिक्स (२३५-२४१) व एडीटींग (२८६-३१८) त्याचबरोबर व्हीज्युअल इफेक्टस इ. बद्दल लेखकाने सखोल चर्चा केलेली आहे. कोणत्याही दृकश्राव्य माध्यमासाठी निर्मिती करताना लागणा-या मनुष्यबळासंदर्भात प्रकरण १६ मध्ये चर्चा केलेली आहे. यामध्ये दिग्दर्शक, कलाकार, कॅमेरामन, निर्माता इ. बाबत सखोल लेखन केलेले आहे. विशेषत: प्रकरण १६ व १९ मध्ये दिग्दर्शकाची भूमिका तो कशा प्रकारे कलाकार, मानसशास्त्रज्ञ, तांत्रिक सल्ला देणारा व समन्वयक हे सांगितले आहे. तो कोणतीही निर्मिती करताना सर्व निर्मितीचा कसा प्रमुख आहे व त्याच्या जबाबदा-या कोणत्या आहेत? हे उदाहरणासह सांगितले आहे. सदर पुस्तकामध्ये लेखकाने अनेक छायाचित्रे, स्केचेस इ. चा चांगला वापर केलेला आहे. लेखक हरबर्ट झेटल यांनी आपल्या पुस्तकाच्या शेवटी (पान ५०५) म्हटले आहे की, “तुम्ही आता अत्यंत प्रभावी व शक्तीशाली असे संवादक झालेला आहात. त्यामुळे त्याचा वापर अत्यंत जबाबदारीने व समजूतदारपणे करा. तुम्ही तुमच्या प्रेक्षकांना आदरयुक्त व सहानुभूतीपूर्वक वागणूक द्या. तुम्ही निर्मिती प्रक्रियेत दिग्दर्शक म्हणून किवा वायर्स उचलणारे म्हणून जरी काम करीत असाल तरी सुध्दा तुम्ही तुमचा प्रभाव इतरावर टाकू शकता. कारण तुमच्या इतके त्यांनी वाचलेलं नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या व्यावसायिक कौशल्य व त्यांचा उपयोग यावर विश्वास ठेवा त्या विश्वासाला तडा जावू देऊ नका.”
लिझ स्टयुब्बस या लेखकाने संपादन केलेलं ‘डॉक्युमेंटरी फिल्ममेकर्स स्पीक’ हे पुस्तक अनुभव कथन करीत वास्तवपट निर्मितीची कथा सांगते. सदर पुस्तकामध्ये लिझ स्टयुब्बस यांनी एकूण १२ वास्तवपट निर्मितीशी संबधित व्यक्तीच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. यामध्ये अल्बर्ट मायस्लेज, सूसन फ्रोमके, डी. ए. पेन्नबेकर व क्रीस हेजेडस, केन बन्स, रॉस मॅकल्वी, लिझ गार्बस, निक ब्रुमफिल्ड, जॉय बर्लिगंर, ब्रूस सिनोफस्काय, इरविंग सराफ, अली लाइट व बारबरा कोप्पल यांचा समावेश आहे. पुस्तकाच्या प्रास्ताविकामध्ये स्वत:बद्दल, ज्या वास्तवपट निर्मात्यांच्या मुलाखती घेतल्या त्यांच्याबद्दल व वास्तवपटाबद्दल लिहिले आहे. वास्तवपट निर्मिती ही बाब त्या विषयी असलेल्या आवडीशिवाय शक्य नसल्याचे तो सुरुवातीलाच म्हणतो. या पुस्तकामध्ये प्रस्तावनेत “वास्तवपट निर्मिती ही प्रकृतीनुसारच चित्रपट निर्मितीपेक्षा वेगळा प्राणी आहे” असे म्हणतो. “वास्तवपट निर्मितीची सुरुवात व प्रक्रिया ही जगावेगळी गोष्ट आहे. वास्तवपट पूर्ण होण्याची अशी ठरलेली तारीख असत नाही. तुम्हाला अनेक वर्षे तुमच्या कथेवर काम करावे लागते.” असे लिझ म्हणतो.
लिझ आपल्या प्रस्तावनेच्या शेवटच्या परिच्छेदामध्ये म्हणतो की “यातील प्रत्येक वास्तवपट निर्मात्याने आपल्या वास्तवपटातील प्रत्येक फ्रेमवर काम केलेले आहे. त्यांनी त्यांच्या कथा इथे उघड केल्या. त्यामुळे त्यांचा मी आदर करतो. त्यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक मिनिट हा चित्रपट निर्मितीच्या दृष्टीनेच विचार केलेला आहे.”
‘डॉक्युमेंटरी फिल्ममेकर्स स्पीक’ या पुस्तकात लेखकाने वास्तवपटाच्या अनुषंगाने विविध विषयावर फिल्ममेकर्सना बोलते केले आहे. यामध्ये कथा अर्थात विषय सुचणे व निवडणे, त्यांची संहिता, पटकथा, कॅमेरा अर्थात छायाचित्रण, दिग्दर्शन, निर्मिती, प्रक्रिया, निर्मिती पूर्व प्रक्रिया, निर्मितीची प्रक्रिया व एडिटींग (संकलना), व्हाईस ओव्हर, मुलाखती, वापरण्यात आलेले तंत्रज्ञान, चित्रिकरण पध्दती इ. बारीकसारीक / सूक्ष्म विषयावर बोलते केले आहे. वास्तवपटाची जाहिरात, वितरण व्यवस्था, अर्थपुरवठा व प्रत्यक्ष प्रसारण अर्थात पडद्यावर येण्याची प्रक्रियाबाबत मुलाखत दात्यांनी आपली मते व्यक्त केलेली आहेत.
भारतीय अनुबोधपट: काल आणि आज, या पुस्तकाचे लेखक पुरुष बावकर आहेत. त्यांनी नॅशनल फिल्म डिव्हिजन येथे कार्यरत असताना हे पुस्तक लिहिले. ‘भारतीय अनुबोधपट: काल आणि आज’ हे पुरुष बावकर यांचे अनुबोधपट अर्थात वास्तवपटाबद्दल बारकाईने माहिती सांगणारे पुस्तक होय. ‘अनुबोध’ हा शब्द वास्तवपट किंवा इंग्रजीतील डॉक्युमेंटरी शब्दासाठी वापरला जातो. पुरुष बावकर त्याबद्दल म्हणतात, “इंग्रजी शब्द ‘डॉक्युमेंटरी’ याचा मराठी भाषेतील पर्यायी शब्द ज्याच्यामुळे ‘अनुबोध’ मिळतो, तो ‘अनुबोधपट’. समाज शिक्षण, समाज जागृती, समाज सुधारणा इ. समाजाला आवश्यक असणा-या विषयाची माहिती देणा-या विषयांसाठी अनुबोधपट माध्यमाचा उपयोग केला जातो. याच्या सारखे समाज प्रबोधन करणारे दुसरे प्रबळ व प्रभावी माध्यम नाही.”
१९६७ साली भारत सरकारने ‘डॉक्युमेंटरी’ या शब्दाची भारतीय व्याख्या ठरविण्यासाठी त्या वेळचे सेन्सॉर बोर्डाचे चेअरमन एम. डी. भट यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमण्यात आली होती. त्या कमिटीत जीन भावनगरी, गगन मुरारी, बी. डी. गर्ग, किशनलाल खांडपूर इत्यादी सदस्य होते. कमिटीने यावर अहवाल देताना म्हटले की, १९४७ साली ‘वल्ड युनियन ऑफ डॉक्युमेंटरी’ या जागतिक संस्थेने जी व्याख्या केली ती योग्य आहे.
पुरुष बावकर यांनी या पुस्तकामध्ये भारतीय अनुबोधपट निर्माते, राष्ट्रीय फिल्म पुरस्कार, मुंबई  आंतरराष्ट्रीय वास्तवपट महोत्सव, अनुबोधपट संकल्पना व व्याख्या, वास्तवपट आणि लघुपट यांच्या निर्मितीचे अंदाजपत्रक, फिल्म अॅडव्हायझरी बोर्ड तसेच शोधपट, लघुपट निर्मितीसाठी वेगवेगळया संस्थांकडून कशी मदत होऊ शकते याबद्दल चर्चा केलेली आहे. त्यामुळे सदर पुस्तकातुन वास्तवपट नेमकेपणाने वाचकांना समजायला लागतो.
लेखक स्वत: एक उत्तम छायाचित्रकार असल्यामुळे तसेच दीर्घकाळ फिल्म डिव्हीजनमध्ये काम केल्यामुळे त्यांनी जवळपास ५० हून अधिक वास्तवपटासाठी वेगवेगळया पातळीवर काम केलेले दिसते. लेखकाने सावेदादा अर्थात हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर यांना भारतीय वास्तवपटाचे जनक मानले आहे. त्याच्यामते, ‘७ डिसेंबर १९०१ रोजी भारताचे पहिले रँगलर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे केंब्रिज विद्यापीठाचा अभ्यासक्रम पुरा करुन ‘रँगलर’ ही पदवी घेऊन मुंबईला परत आले. त्यांचा सत्कार गोपाळकृष्ण गोखले व मित्रमंडळीने आयोजित केला होता. याचे चित्रण प्रथमच भाटवडेकर यांनी केले. तो भारतातील पहिला वास्तवपट किंवा वार्तापट ठरतो.’
लेखकाने आपल्या सलग तीन प्रकरणामध्ये भारतातील दिग्गज वास्तवपट निर्माते, दिग्दर्शकांबद्दल सखोल लिहिले आहे. यामध्ये नारायणसिंग थापा, बी.डी. गर्ग, जे.एस. भावनगरी, जेम्स बेव्हरीज, रोशनलाल शोहरी, दादासाहेब फाळके, इजरा मीर, एस. सुखदेव, हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर उर्फ सावेदादा, हरिलाल सेन, एस.एन.एस. शास्त्री आणि व्ही. शांताराम यांच्या वास्तवपट व लघुपट निर्मितीच्या कार्याचा सखोल आढावा घेतला आहे.
‘डॉक्युमेंटरी फिल्म: अ व्हेरी शॉर्ट इन्ट्रोडक्शन’ हे पॅट्रेसिया औफडे-हेइडे यांचे बहुचर्चित पुस्तक. पॅट्रेसिया औफडे-हेइडे यांनी ‘डॉक्युमेंटरी फिल्म : अ व्हेरी शॉर्ट इन्ट्रोडक्शन’ या आपल्या पुस्तकात वास्तवपट या संकल्पनेबाबत नव्याने विचार केलेला आहे. आपल्या या पुस्तकात वास्तवपट म्हणजे काय? त्याची संकल्पना व व्याख्या, त्याचे प्रकार, सिनेमा आणि वास्तवपटामधील नेमका फरक, वास्तवपटांचा इतिहास, महत्वाच्या वास्तवपटांची ओळख, वास्तवपट आणि राजकीय प्रचार, तसेच शेवटी जगातील शंभर उत्तम वास्तवपटांची यादी त्यांनी दिलेली आहे.
लेखिका वास्तवपटाची व्याख्या करताना म्हणतात की, “वास्तवपट म्हणजे चित्रपट नव्हे”. किंवा ते एका निबंधाचा दाखला देतांना म्हणतात की, “वास्तवपट म्हणजे असा चित्रपट ज्याच्यामध्ये गंमत नसते, तो गंभीर स्वरुपाचा असतो, तो काहीतरी शिकविण्याचा प्रयत्न करतो”.
लेखिका वास्तवपटाबद्दल पुढे लिहितात की, “वास्तवपट म्हणजे, वास्तव जीवनाचे सादरीकरण असून त्याच्यामध्ये नको तो मानवी हस्तक्षेप झालेला नसतो. चित्रपट मात्र मानवी हस्तक्षेपाशिवाय बनतच नाही. विषय ठरविणे, संकलन, आवाजाचे डब्बींग, इ. ठिकाणीही मोठया प्रमाणात हस्तक्षेप झालेला असतो.” पॅट्रीसिया यांच्या म्हणण्यानुसार १९९० नंतर वास्तवपटाचा व्यवसाय जगभर पसरायला सुरुवात झाली. विशेषत: २००४ मध्ये टी.व्ही. चॅनेल्सनी तयार केलेला जागतिक व्यावसाय हा ४.५ अब्ज डॉलर्स इतका होता.
टी.व्ही.वरील रियॅलिटी शोज आणि डॉक्युमेंटरी प्रसारणाला गती मिळाल्यामुळे वास्तवपटाचे मोठया प्रमाणात प्रसारण होवू लागले. काही चॅनेल्सच्या सिरिअल्सची जागा वास्तवपटांनी घेतली म्हणून त्यासाठी लेखिकेने ‘डाक्युसोप्स’ असा शब्द वापरला आहे.
राजकीय प्रचारकी वास्तवपटाबाबत पॅट्रेसिया म्हणतात की, “राजकीय वास्तवपट हे विशिष्ट उद्देशाने बनविलेले असतात. त्याच्यामध्ये प्रचारकी आशय असतो. असे वास्तवपट हे नाटकीय सादरीकरणाचे रुप असतात. लोकांना प्रोत्साहित करणे हा त्याचा हेतू असतो.” त्यापुढे म्हणतात की, “वकिल किंवा सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी राजकीय कारणासाठी बनविलेले वास्तवपट हे सुध्दा राजकीय प्रचारासारखेच असतात, फक्त त्यांची हाताळण्याची पध्दत वेगळी असते.” (पान ७७)
पॅट्रीसिया यांनी चरित्रात्मक वास्तवपटाबाबतही आपले मत व्यक्त केले आहे. त्या म्हणतात, “चरित्रात्मक वास्तवपट हा लोकांमध्ये अधिक लोकप्रिय असतो. अशा वास्तवपटामधून एखाद्या व्यक्तीच्या कार्याचा आढावा अशा पध्दतीने घेतलेला असतो की, लोकांना ती व्यक्ती महान वाटायला सुरुवात होते. त्यामध्ये राजकीय व्यक्ती, अभिनेते, कलाकार, खेळाडू, एखादा दबलेला सामाजिक कार्यकर्ता आदी लोकांचा समावेश होतो.” (पान ९५). पॅट्रीसिया वास्तवपटाचे महत्त्व पटवून देतांना म्हणतात की, “वास्तवपट हा वास्तव जीवनाशी निगडीत असून त्याचे महत्त्व कोणालाही नाकारता येणार नाही. कारण तो तुम्ही पाहता आणि ऐकता”. या पुस्तकामध्ये लेखिकेने अमेरिकन व युरोपिय वास्तवपट व वास्तवपटकारांच्या बाबत काही महत्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. वास्तवपटांचे मानवी जीवनातील महत्त्व आणि त्याचा मानवी इतिहास जपण्यासाठी होत असलेला उपयोग याचे महत्त्व नोंदविले आहे.
भारतीय वास्तवपट अभ्यासिका त्रिशा दास यांनी ‘हाऊ टू राइट अ डॉक्युमेंटरी स्क्रीप्ट: अ मोनाग्राफ’ हे पुस्तक लिहिले आहे. त्रिशा दास यांनी या पुस्तकामध्ये वास्तवपटाच्या संदर्भातील वस्तुनिष्ठ आणि सैध्दांतिक पध्दतीने मांडणी केलेली आहे. वास्तवपटाची संकल्पना, वास्तवपट व चित्रपटातील मुलभूत फरक, वास्तवपटाचे विविध प्रकार, वास्तवपटासाठी आवश्यक असणारे घटक, उत्तम स्क्रीप्ट लिहिण्यासाठी आवश्यक असणारी साधने व तपशील, स्क्रीप्टचा फॉरमॅट इ. बाबत त्यांनी सखोल चर्चा या पुस्तकामध्ये केलेली आहे.
त्रिशा दास यांनी सुरुवातीला वास्तवपटाच्या संहितेबाबत चर्चा केली आहे. यामध्ये त्यांना चित्रिकरणाच्या संहितेबाबत किंवा पटकथेबाबत लिहिताना चित्रिकरणाच्या पटकथेची दोन भागात विभागणी केली आहे. एक म्हणजे प्रि- शुट किंवा चित्रिकरणाची पटकथा व दुसरी म्हणजे चित्रिकरणानंतरची पटकथा. प्रिशुट किंवा चित्रिकरणासाठी आवश्यक पटकथेबाबत लेखिका म्हणतात की, “प्रि-शुट स्क्रीप्ट ही चित्रिकरणासाठी आवश्यक दिशा ठरविण्यासाठी मदत करते. न पाहिलेले अडथळे, न पाहिलेला प्रदेश, अचानक समोर येणा-या समस्येपासून प्रि-शुट स्क्रीप्ट दिग्दर्शकाला वाचविते. प्रि-शुट स्क्रीप्ट म्हणजे वास्तवपटाच्या चित्रिकरणाच्या प्रवासाचा अमूर्त असा नकाशा आहे.”
पोस्ट शूट स्क्रीप्टबाबत त्रिशा दास म्हणतात की, “पोस्ट- शुट- स्क्रीप्ट ही चित्रिकरणाच्या पटकथेचा शेवटचा ड्राफ्ट होय. सदर ड्राफ्ट हा एडिटींग किंवा शुटींगच्या दरम्यान सातत्याने बदलत असतो. पोस्ट शुटींग स्क्रीप्ट ही सैध्दांतिक पातळीवरील घटक दृकश्राव्य माध्यमातून एकत्रित करुन त्यामध्ये वेळावेळी भर टाकण्याचे काम करते.”
त्रिशा दास यांनी चित्रपट व वास्तवपट यांच्या पटकथेतील मुलभूत फरक विविध मुद्दयांच्या आधारे स्पष्ट केला आहे. यामध्ये चित्रपटाच्या स्क्रीप्टबाबत लिहिताना त्या म्हणतात की, “चित्रपट हा दृष्यात्मक असतो, त्याच्यामध्ये गती असते. चित्रपट ब-याच वेळा साध्या डोळयांना पाहता येणार नाहीत अशा गोष्टी दाखवतो. चित्रपट वेळ आणि जागेच्या पलिकडे जावू शकतो, चित्रपट हा काल्पनिक व व्यक्तिनिष्ठ असू शकतो, तो आपला प्रेक्षक ठरवतो, चित्रपटामध्ये पुनरावृत्ती होऊ शकते, त्याच्यामध्ये रंग आणि आवाजाचे विशेष महत्त्व असते. चित्रपट हा विशिष्ट घटकावर जोर देतो. तसेच त्याच्यामध्ये भावभावनांचे तरंग असतात.” (पान ५ व ६)
त्रिशा दास वास्तवपटाच्या पटकथेची वैशिष्टये सांगताना म्हणतात की, “वास्तवपट हा वस्तुस्थिती आणि अकाल्पनिकता याचा समन्वय आहे. तो अधिक लवचिक असतो. वास्तवपटातील चित्रित झालेल्या हालचाली व दृष्ये ही प्रेरणादायी असतात. तो चित्रपटापेक्षा कमी प्रमाणात नियंत्रित असतो. वास्तवपटाचा विषयच अधिक महत्त्वाचा असतो. दृष्यांची विश्वासर्हता हाच वास्तवपटाचे प्रमुख घटक असतो. वास्तवपटाच्या साचापेक्षा स्वरुप किंवा त्याची रचना महत्त्वाची असते.”
अशा पध्दतीने लेखिकेने वास्तवपटाच्या संहितेची किंवा एकूणच वास्तवपटाची वैशिष्टये सांगितली आहेत. पुढे त्यांनी वास्तवपटाच्या संदर्भातील संशोधनाचेही महत्त्व सांगून कोणकोणत्या पध्दतीचे संशोधन वास्तवपट निर्मितीसाठी आवश्यक आहे, याबाबत त्यांनी तपशिलवार लेखन केले आहे.
शैला कुर्शन बर्नाड यांनी ३९५ पानांचे वास्तवपटासंदर्भात अत्यंत विस्ताराने मांडणी करणारे पुस्तक लिहिले. ‘डॉक्युमेंटरी स्टोरी टेलिंग’ हे पुस्तक जगातील वास्तवपटकारांसाठी मार्गदर्शक ठरावे इतके महत्त्वाचे पुस्तक आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये शैला बर्नाड म्हणतात, “सध्याचा काळ हा वास्तवपट व वास्तवपटकांरासाठी अत्यंत उत्साहवर्धक आहे. विशेषत: तंत्रज्ञानामध्ये बदल झाल्याने वास्तवपट आणि वास्तवपटकारांसाठी वास्तवपट निर्मितीच्या दृष्टीने नवीन संधी उपलब्ध झालेली आहे. वास्तवपटाचा आशय व विषय हा स्थानिकाबरोबरच जागतिक प्रेक्षकही तयार करताना दिसतो आहे.” (पान १)
शुटींग आणि एडिटींग या प्रकरणामध्ये शैला यांनी शुटींग करताना कोणकोणत्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत याकडे लक्ष वेधले आहे. त्या म्हणतात की, “सुरुवातीला शुटींग करताना डायरेक्टरच्या मनामध्ये कथा पूर्णपणे स्पष्ट असायला हवीच, पण चित्रिकरण करताना आपण कसे संकलन करणार आहोत हेही त्याच्या ध्यानात पाहिजे. तरच हवा तो आशय चित्रित होईल व हव्या तशा पध्दतीने वास्तवपटाचे संकलनही करता येईल.” (पान १७८ ते १८१)
शैला बर्नाड यांनी वास्तवपटाची अवस्था किंवा स्वरुप आणि शैली बाबत विशेषत्वाने काही गोष्टी नमूद केल्या आहेत. त्या म्हणतात की, “वास्तवपट चित्रिकरणाला सुरुवात करण्यापूर्वीच वास्तवपटासंदर्भात तो कशा पध्दतीने लोकांसमोर सादर करायचा आहे हे ठरवायला हवे. म्हणजेच कथा सांगण्याची पध्दत, कशा पध्दतीने चित्रिकरण करणार आहोत? प्रकाश योजना कशा पध्दतीने करणार आहोत? म्हणजेच प्रकाश योजना तीव्र प्रकारची किंवा उत्साही पध्दतीची किंवा सर्वसामान्य पध्दतीची यापैकी कायम स्वरुपी कोणती वापरणार आहोत? हे ठरले पाहिजे. याशिवाय पाँईट ऑफ व्युव्ह कसा ठेवणार आहोत? चित्रिकरणामध्ये दिसत असलेल्या गोष्टीपैकी कशास महत्त्व देणार आहोत? इ. गोष्टींचा विचार करतानाच फिल्टर्स, लेन्सेस यांचा वापर, साहित्यामध्ये डॉलीज किंवा क्रेन्स इ. चा वापर जाणीव पूर्वक व ठरवून चित्रिकरणादरम्यान करणार आहोत का? याचा विचार होणे आवश्यक आहे. तरच वास्तवपटाला पहिल्यापासून ते शेवटपर्यत विशिष्ट प्रकारची ट्रिटमेंट मिळू शकते”. (पान १८५)
अशा प्रकारे शैला बर्नाड यांनी वास्तवपटाला चित्रपटाइतकेच चित्रिकरण, शैली इ. बाबतीत महत्व असल्याचे सांगितले आहे. याशिवाय चित्रपटाप्रमाणेच वास्तवपटामध्येही तीन अंकी पध्दतीचा (थ्री अॅक्ट प्ले) वापर करता येऊ शकतो व तो केला पाहिजे असेही नमूद केले आहे.
‘रायटींग, डायरेक्टींग अॅण्ड प्रोडयुसिंग डॉक्युमेंटरी फिल्मस अॅण्ड व्हीडीओज’ हे अॅलन रोसेंथल यांचे वास्तवपटाबद्दल अत्यंत सखोल माहिती देणारे पुस्तक आहे. त्यांनी पहिल्या प्रकरणात वास्तवपटाचा विषय ते पहिला ड्राफ्ट या विषयी लेखन केले आहे. यामध्ये विषय सुचणे, निर्मात्यासाठी प्रोपजल लिहिणे, वास्तवपटाला संहितेच्या रुपाने आकार देणे, पहिला ड्राफ्ट लिहून पूर्ण करणे इ. बाबतीत सखोल लेखन केले आहे.
दुस-या प्रकरणामध्ये अंदाजपत्रक आणि करार, प्री -प्रोडक्शन सर्वेक्षण याबाबतीत सखोल मार्गदर्शन केलेले असून तिस-या प्रकरणात प्रोडक्शन बाबतीत सुचना केलेल्या आहेत. यामध्ये दिग्दर्शकाची तयारी, दिग्दर्शन आणि मुलाखती, आणि प्रत्यक्ष चित्रिकरणाबाबत सूक्ष्म पध्दतीने मार्गदर्शन केलेले आहे. चौथ्या प्रकरणात संकलन, निवेदनाचे लेखन आणि सर्वच बाबतीत वास्तवपट परिपूर्ण पध्दतीने तयार करणे याबाबत लेखन केले आहे. सिनेमा व्हरायटे अर्थात वास्तवपटाची वास्तविकता, डॉक्युमेंटरी ड्रामा, इतिहासावर आधारीत वास्तवपट, कुटुंबावर आधारीत वास्तवपट, औद्योगिक क्षेत्र व जनसंपर्कावर आधारीत वास्तवपट इ. वास्तवपटाच्या विविध प्रकाराबाबत लेखन केले आहे. पुस्तकाच्या शेवटी लेखक अॅलन रोसेथंल यांनी वास्तवपट निर्मितीच्या नैतिक मुल्यांबाबत चर्चा केलेली आहे. ते म्हणतात, “वास्तवपट निर्मितीच्या बाबतीत नैतिक मुल्यांची जपवणूक हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण वास्तवपटकार लोकांचे जीवन वास्तवपटातून उलघडत असतो आणि तीच एक समस्या बनू शकते. शोषणावर आधारीत वास्तव वास्तवपटातून येते आणि त्याची अमानवी तिव्रता असूनही ते चित्रण वास्तवपटामध्ये ठेवले जाते, कारण मानवी हक्क उल्लंघनाचे ते चित्रण असते”. (पान ३६३)
लेखक वास्तवपटाच्या नैतिक बाजुविषयी लिहितांना पुढे म्हणतो की, “वास्तवपटामध्ये मोठया प्रमाणात अवास्तव मानवी हस्तक्षेप वाढीस लागला आहे. काहीतरी अकल्पीत व घबराहट पसविणारे वास्तव दाखविण्यासाठी नाटय घडवून आणण्याकडे वास्तवपटकारांचा कल वाढला आहे.” (पान ३६४)
या दरम्यान एका प्रेक्षकाचे मत लेखकाने उदृधत केले आहे, तो म्हणतो, “आम्हाला माहिती आहे की, वास्तवपटाचे संकलन, चित्रिकरण आणि इतर सर्वच बाबी कशा निर्माण केल्या जातात पण असे असले तरी आम्ही वास्तवपट पाहतो, कारण, इतर कोणत्याही फिक्शन / कथा प्रधान गोष्टीपेक्षा वास्तवपट अधिक प्रमाणात सत्य दाखवितो”. (पान ३६४ व ३६५)
अशा प्रकारे लेखक अॅलन रोसेथंल यांनी वास्तवपटाबाबतीत विविध विषयांना आपल्या पुस्तकामध्ये गांभीर्याने स्पर्श केला आहे.
टीस अर्थात “टाटा इन्स्टीटयूट ऑफ सोशल सायन्सेस” ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामाजिक शाखाचे व विषयाचा अभ्यास आणि त्यासंबंधाने संशोधन करणारी एक अव्वल दर्जाची संस्था आहे. या शिक्षण आणि संशोधन संस्थेमध्ये एस.एम.सी.एस. अर्थात स्कूल ऑफ मीडिया अॅण्ड कल्चरल स्टडीज या विभागाचे कार्य उल्लेखनीय आहे. या विभागातील विभाग प्रमुख व डीन प्रा. के. पी. शंकर व अंजली माँटेरो या दाम्पत्य प्राध्यापकांनी इथल्या माध्यम विभागाला एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. विशेषत: सामाजिक भान निर्माण करणारे अनेक वास्तवपट या विभागाने तयार केले आहेत. विद्यार्थ्याबरोबरच शिक्षकांनीही मोठया प्रमाणात वास्तवपट निर्मिती केलेली आहे. त्यांच्या विद्यार्थ्यांनी मुंबई मधील जातीयतेचे दर्शन घडविणारे ‘कास्टमोपोलिटन मुंबई’ या विषयाअंतर्गत सहा वास्तवपट बनविले आहेत. यामध्ये अंतर भाषा, (अंकिता भातखंडे, दिनेश तुशार महापात्र इ.) सायलन्स प्लीज (इलिशा वालियां, फिनिया रहिमान इ.), मुला विमुत्ती (दिप्ती मूरली, दिशा आर.के. इ.) या माहितीपटांमधून मुंबई सारख्या कास्मोपोलिटन शहरातील जातीयवादाचे चित्र प्रेक्षकांसमोर मांडण्यात आले आहेत.
उपरोक्त उल्लेख केलेल्या सर्व पुस्तकामध्ये वास्तवपट निर्मिती, व्याख्या, संकल्पना, वास्तवपटांचे प्रकार, वास्तवपटाची संहिता, चित्रिकरण, सादरीकरण, मांडणी, प्रकाश योजना, संकलन, संगीत, आवाज, निवेदन, वास्तवपटाची नैतिक बाजू, त्यासाठी करावे लागणारे संशोधन आणि वास्तवपटाचा एकूण जागतिक पातळीवरील व्यवसाय याबाबतीत उहापोह केलेला आहे. ज्या देशातील लेखक आहेत त्या देशातील वास्तवपट निर्मिती, त्याचे स्वरुप आणि वास्तवपटकाराबाबत लिहिलेले आहे. वास्तवाच्या सर्वात जवळ जाणारे माध्यम म्हणून सर्वच लेखकांनी वास्तवपट निर्मितीची व त्याच्या योग्य प्रसाराची अपेक्षाही व्यक्त केलेली आहे.
-डॉ. बापू चंदनशिवे
माजी विभाग प्रमुख
संज्ञापन अभ्यास विभाग
(Mass Communication)
न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहिल्यानगर

Exit mobile version